फक्त ब्रिटनचं नाही, भारतीय लोकं इतर देशांच्या राजकारणातही डंका वाजवतायेत

भारताच्या लोकांची एक खासियत आहे. त्यांच्या देशातील लोक कुठेही असो त्यांनी काही मोठी कामगिरी करून दाखवली की, अक्खा भारत आनंद साजरा करतो. आणि जर त्यांच्यासोबत कुठे काही वाईट झालं तर तेवढीच हळहळ सुद्धा  ते व्यक्त करतात. आता याला त्यांच्या निखळ भावना आपण म्हणू शकतो. बाहेरच्या देशात जर भारतीय लोक एखाद्या मोठ्या पदावर असतील तर मात्र गर्वाने कॉलरचं टाईट होते. अशीच एक कॉलर टाईट करणारी बातमी सध्या ऐकू येतेय.

एका भारतीय वंशाच्या माणसाला ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळू शकते. हे व्यक्ती म्हणजे रिषी सुनक. ते सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत पण लवकरच आपण ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान म्हणून त्यांना पाहू शकतो. ही गोष्ट चर्चेत येताच भारतात जणूकाही आनंदाची लाटच पसरली आहे. पण रिषी सुनक हे काही पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती नाहीये ज्यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे. आतापर्यंत जगभरातील वेगवेगळ्या देशांत अनेक भारतीय व्यक्तींना तिथल्या सरकारमध्ये मोठ्या पदावर जाण्याचं भाग्य लाभलं आहे.

कोणकोणत्या देशांमध्ये भारतीय व्यक्तींनी राजकारणात डंका वाजवला आहे?

कॅनडा, फिजी, गुयाना, पोर्तुगाल, युनायटेड स्टेट्स, आयर्लंड, मलेशिया, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर, साऊथ आफ्रिका, युनायटेड किंग्डम तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगो अशा अनेक देशांचा यात समावेश आहे.

उत्तर अमेरिकन देशामध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा एक मोठा गट आहे. यातील अनेक लोकांना तिथलं मंत्रीपद मिळाले आहे. कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात सध्या त्यांच्यापैकी चार जणांचा समावेश आहे. या लोकांची नावं आहेत, अनिता आनंद, नवदीप बैंस, बर्दीश चगर आणि हरजित सज्जन. यातले सज्जन हे तिथल्या चार मोठ्या मंत्रालयांचा एक भाग असून कॅनडाचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री आहेत. बैंस हे देशाचे विज्ञान, नवीन उपक्रम आणि उद्योग मंत्री आहेत. तर अनिता आनंद या कॅनडाच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या पहिल्या हिंदू महिला असून आता त्या  सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्रालयाचा कारभार सांभाळतात.

दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेटाचा देश असलेल्या फिजीमध्ये अनेक भारतीय वंशाचे मंत्रीच नाहीत, तर पंतप्रधानही आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे फिजीची सुमारे ३८ टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. या देशाचे मजूर पक्षाचे नेते महिंद्र चौधरी हे १९९९ मध्ये पंतप्रधान म्हणून निवडून आलेले पहिले इंडो-फिजियन बनले. तर सात वर्षांनंतर २००६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत चौधरी यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चौधरींच्या आधी विजय रघुबर सिंग आणि अहमद अली हे दोन मुख्य इंडो-फिजीयन राजकारणी होते ज्यांनी १९६० ते ९० च्या दशकात अनेक मंत्रीपदे सांभाळली होती.

फिजी प्रमाणेच, उत्तर लॅटिन अमेरिकन प्रजासत्ताक देश गुयानामध्ये सुद्धा चार भारतीय वंशाचे राजकारणी आहेत जे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनले आहेत. भारत-गुयानी हिंदू पालकांच्या पोटी जन्मलेले भरत जगदेव यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती म्हणून काम करत होते. गुयानचे विद्यमान पंतप्रधान मोझेस नागमूटू हे तमिळ भारतीय वंशाचे आहेत. ते १९९२ मध्ये संसदेत निवडून आले आणि २०१५ मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी अनेक मंत्रिपदाच्या मुख्य भूमिका पार पाडल्या आहेत.

आफ्रिकन बेट राष्ट्र मॉरिशसच्या राजकारणावर ऐतिहासिकदृष्ट्या इंडो-मॉरिशियन राजकारण्यांचे वर्चस्व राहिले आहे. याच कारण म्हणजे तिथं सुमारे ५२ टक्के नागरिक हिंदू धर्माचे पालन करतात. स्वातंत्र्यानंतर मॉरिशसमध्ये भारतीय वंशाचे सात राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान झाले आहेत. मॉरिशसचे सध्याचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे उच्चवर्गीय हिंदू-यादव कुटुंबातील आहेत. २०१७ मध्ये पंतप्रधान झाले. इतकंच नाही तर त्यांचे  वडील अनिरुद जगन्नाथ यांनीही पंतप्रधान आणि राष्ट्रपती म्हणून काम केले आहे.

युनायटेड किंग्डमबद्दल बोलायचं झालं तर १८९२ पासून ब्रिटिश संसदेत निवडून आलेल्या प्रतिनिधींमध्ये भारतीयांचा समावेश आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात दोन भारतीय वंशाचे मंत्री आहेत. त्याचं नाव म्हणजे प्रिती पटेल आणि आलोक शर्मा. प्रिती पटेल या विथमच्या खासदार आहेत आणि सध्या गृहसचिव आहेत. तर शर्मा पूर्वी आंतरराष्ट्रीय विकास विभागाचे राज्य सचिव होते. आणि आता ते व्यवसाय, ऊर्जा आणि औद्योगिक धोरणासाठी राज्य सचिव म्हणून काम बघताय.

ही तरी काही मोजकीच पाच राष्ट्र आपण बघितली. पण वरती सांगितलेल्या सगळ्या देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांनी मोठमोठ्या पदांवर आपला शिक्का लावला आहे, तिथल्या राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि आहे. अशाच व्यक्तींमुळे भारतीय लोकांची छाती गर्वाने फुगते.

आणि ते म्हणतात ‘माज आहे आम्हाला भारतीय असल्याचा’.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.