कॅनडाच्या संरक्षण मंत्रिपदी एका भारतीय वंशाच्या महिलेची निवड झाली आहे

परदेशात राहून भारतीय नावाचा डंका पिटणारी अनेक मंडळी आहेत. कोणी मोठ्या कंपनीत उच्च पदावर राहून मार्केट कंट्रोल करत, तर कोणी थेट मंत्रिमंडळात राहून तो देश बॅलन्स राखण्यात मदत करत. या यादीत आता अनिता आनंद यांचंही नाव जोडलं गेलंय.

भारतीय वंशाच्या कॅनडाच्या नेत्या अनिता आनंद यांना कॅनडाचे नवे संरक्षण मंत्री बनवण्यात आले आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बदलात ही जबाबदारी आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अनिता आनंद यांनी कॅनडाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री बनून इतिहास रचला आहे.

गेल्या महिन्यातच ट्रुडोचा लिबरल पक्ष निवडणूक जिंकून सत्तेत परतला. यावेळी आपल्या नव्या मंत्रिमंडळात ट्रूडो  यांनी तीन इंडो-कॅनडियन मंत्र्यांची निवड केली. ज्यात सहा महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. आणि महत्वाचं म्हणजे या सहापैकी २ महिला मंत्री भारतीय-कॅनडियन  आहेत.

अनिता आनंद या भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक हरजित सज्जन यांची जागा घेतील. लष्करातील लैंगिक छळाच्या आरोपांची दखल न घेतल्याने हरजित सज्जन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

तर सज्जन यांना आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री करण्यात आले आहे. सोबतच ब्रॅम्प्टन वेस्टमधील  खासदार असलेल्या आणखी एक इंडो-कॅनडियन महिला कमल खेरा यांनीही ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मंत्री म्हणून शपथ घेतली.

अनिता आनंद यांच्या आधी, कॅनडाच्या एकमेव महिला संरक्षण मंत्री माजी पंतप्रधान किम कॅम्पबेल होत्या, ज्यांनी १९९३ मध्ये ४ जानेवारी ते २५ जून या सहा महिन्यांसाठी पोर्टफोलिओ सांभाळला होता.

संरक्षण मंत्री बनल्यानंतर आनंद म्हणाल्या,

“लष्करातील प्रत्येकाला सुरक्षित वाटेल आणि त्यांना आवश्यक असलेला पाठिंबा मिळेल याची खात्री करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे.”

अनिता आनंद यांच्याविषयी सांगायचं झालं तर, टोरंटोजवळील ओकविले येथून अनिता आनंद खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अनिता यांना सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्रीपदाची जबाबदारी दिली. कोरोना साथीच्या आजारादरम्यान, कॅनडाला लस मिळवून दिल्याबद्दल आणि लसीकरण कार्यक्रमासाठी त्यांचे खूप कौतुक झाले.

आनंद या अभ्यासक, वकील आणि संशोधक आहेत. त्यांनी क्वीन्स युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल स्टडीजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स), ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून न्यायशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स), डलहौसी युनिव्हर्सिटीमधून लॉ बॅचलर आणि टोरंटो युनिव्हर्सिटीमधून लॉ ऑफ लॉची पदवी घेतली आहे.

त्या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापकही होत्या. आनंद यांनी वित्तीय बाजार, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि शेअरहोल्डर हक्कांचे नियमन यावर विस्तृत संशोधन पूर्ण केले आहे.

आता अनिता यांच्या भारतीय कनेक्शन बद्दल बोलायचे झाले तर, अनिता यांचा जन्म १९६७ मध्ये नोव्हा स्कॉशियाच्या  कॅंटविले येथे झाला. त्यांची पंजाबी आई आणि वडील तमिळ होते. त्यांची आई सरोज डी. राम एनेस्थिसियोलॉजिस्ट आणि वडील एस. व्ही. आनंद हे जनरल सर्जन होते.

अनिता याना दोन बहिणी आहेत.  गीता आनंद, टोरंटोमधील इंप्लॉयमेंट वकील आहे तर सोनिया आनंद, मॅकमास्टर विद्यापीठातील वैद्यकीय डॉक्टर आणि रिसर्चर आहे.  अनिता आनंद यांच्या पतीचे नाव जॉन असून दोघांना चार मुले आहेत.

आता, भारत आणि कॅनडाचे तर संबंध चांगलेच आहे. मात्र अनिता यांच्या संरक्षण मंत्री पदी निवड झाल्यांनतर ते आणखी पुढे जातील असा विश्वास व्यक्त केला जातोय. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.