पंजाबचे महाराज स्पेनला लग्नाला गेले, आणि तिथून राणीसाहेब घेवून आले.

खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे तशी म्हणायची पद्धत आहे म्हणून. गोष्ट आहे तशी शंभर वर्षापूर्वीची .

कपुरथला राज्याचा राजा होता नाव जगतजीतसिंग.

राजा होता पंजाबी पण शौक होते युरोपीयन. अहं फ्रेंच!

जगतजीतसिंगला फ्रेंच भाषेपासून फ्रेंच मदिरेपर्यंत सगळ्याचा नाद. त्याला फ्रँन्कोफाइल नावाचा रोगच होता असं म्हटल तरी चुकीचं ठरणार नाही. कपुरथला शहर त्याला पंजाबचं पॅरीस बनवायच होतं. फ्रान्सहून उत्तमोत्तम आर्किटेक्ट बोलवून त्याने अनेक सौंदर्यपूर्ण इमारती बनवून घेतल्या होत्या.

या सर्वाचा मुकुटमणी होता जगतजितसिंग पॅलेस.

सुप्रसिद्ध व्ह्वर्सायच्या राजवाडयाचा मॉडेलसमोर ठेवून बांधलेला हा राजवाडा. तर या राजवाड्याची निर्मिती आठ वर्षे चालू होती. पण हा राजवाडा बांधला कोणासाठी होता माहिती आहे का?

राजाची लाडकी राणी “अनिता डेल्गाडो”.

राणीसाहेब होत्या स्पेनच्या. फ्रेंचची आवड असणाऱ्या पंजाबी राजाच्या भल्या मोठ्या जनानखान्याची  पट्टराणी होती स्पॅनिश. सगळच आक्रीत वाटत ना?

झालं असं की एकदा राजा जगतजितसिंग यांना लग्नाचं आमंत्रण आलं होत. स्पेनचे महाराज अल्फोन्सा १३ यांच. लग्न होत माद्रिदला. जगतजितसिंग स्पेनला आले लग्न अटेंड करण्यासाठी पण एका रात्री त्यांना जीवाची माद्रिद करायची हुक्की आली. पाऊले वळली माद्रिद मधल्या सुप्रसिद्ध नाईटक्लबकडे .

नाईट क्लबमध्ये मन रिझवण्यासाठी अनेक नृत्यांगना होत्या. पण राजेसाहेबांना सगळ्यात शेवटी नृत्य करायला आलेली नर्तिका खूप आवडली. अवघ्या सोळा वर्षाच्या त्या गोऱ्या अनितावर महाराज एवढे फिदा झाले की दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या घरी आपल्या लवाजम्यासकट ते जाऊन पोहचले.

डोक्यावर पगडी अंगावर हिरेमोतीनी लगडलेले दागिने घातलेला बग्गीतून उतरलेला भारतीय राजा आपल्या घरी कशासाठी आला आहे हेच अनिताच्या आईवडिलाना कळेना. जगतजितसिंगनी अनिताला लग्नासाठी रीतसर मागणी घातली. भांबावलेल्या अनिताच्या घरच्यांनी लग्नाला चक्क नकार दिला.

पुढे ज्या स्पॅनिश राजाच्या लग्न समारंभासाठी जगतजितसिंग माद्रिद ला आले होते त्याच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला. यामुळे जगतसिंग कपुरथलाला लगेच परत आले. मात्र अनिताला महाराज विसरू शकत नव्हते. त्यांनी तिला अनेक प्रेमपत्रे पाठवली. तिला पॅरीसला भेटायला येण्याची विनंती केली.

शेवटी जेव्हा तिच्या वडीलांना एक लाख पाऊंडचा नजराणा दिला तेव्हा अनिताने जगतजितसिंगच्या प्रेमाच्या हाकेला साद दिली.

अनिताने लग्नाला होकार दिला खरा मात्र ती फ्रेंच कुठे होती? ती होती स्पेनची. महाराजांनी तिला फ्रेंच राणी बनवण्याचा विडा उचलला. तिला फ्रान्समध्ये बेस्ट टीचर्स कडून फ्रेंचभाषा, फ्रेंच एटीकेट, तिथली पाककला, फ्रेंच संगीत प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग देण्यात आलं. पॅरीस मधलं प्रशिक्षण संपल्यावर खास जहाजाने अनिता भारतात आली.

मोठ्या जल्लोषात शीख पद्धतीने त्यांच लग्न झालं. प्रेम कौर असं तीच भारतीय नामकरण सुद्धा झालं.

अनिता भारतीय वातावरणात चांगलीच रुळली. राजवाड्यात फक्त फ्रेंच कुक जेवण शिजायचे. अक्षरशः पिण्याचं पाणीसुद्धा पॅरीसहून यायचं. राजेशाही थाट ती पहिल्यांदाच अनुभवत होती. राजासोबत युरोपला सारख्या वाऱ्या व्हायच्या.

भारतातही मसुरीमध्ये तिच्यासाठी विशेष राजवाडा बांधला होता तिथं बरेच दिवस तीच वास्तव्य होत. याकाळात तिन भरपूर वाचन केलं, युरोपभ्रमंतीवर पुस्तक लिहिलं. त्यांना एक मुलगा झाला. नाव ठेवलं अजितसिंग.

सगळ कसं छान चालल होत. पण कोणाची तरी नजर तिच्या संसाराला लागली.

अनिताच्या सौंदर्याची चर्चा भारतभर होती. भारतातले इतर राजकुमार कपुरथलाच्या राजावर जळायचे. अनेकजण तिच्याशी फ्लर्ट करायला उत्सुक असायचे.

असं म्हणतात की एकदा मसुरीच्या पॅलेसमध्ये एका डिनरवेळी हैद्राबादच्या नवाबाने तिला प्रपोज केले. जगातला सगळ्यात श्रीमंत पण तितकाच कंजूष असलेल्या नवाबाने म्हणे तिला कागदात गुंडाळून हिऱ्यांचे दागिने दिले होते. काही जण असंही म्हणतात की दागिने खोटे होते.

इकडे राजेसाहेबांच ‘दिल’ सुद्धा अनेक स्त्रियांवर घुटमळत होत.

दोघांच्यात भांडणे सुरु झाली. एकदा स्वतः मोहम्मद अली जिनानी त्यांच्यात मध्यस्ती केली. महाराणी अनिताच तिच्या सावत्र मुलासोबत अफेअर सुरु आहे अशा अफवा राजाच्या कानापर्यंत पोहचवण्यात आल्या होत्या. शेवटी तिला जगतजीतसिंगनी घटस्फोट दिला.

अनितानंतर आणखी एका युरोपियन मुलीशी त्यांनी लग्न केलं. हे महाराजा जगतजितसिंगचं सहाव लग्न होत. पण का कुणास ठाऊक हे लग्नही टिकलं नाही. त्यांच्या नव्या राणीनं आपल्या लाडक्या दोन कुत्र्यासहित कुतुबमिनार वरून उडी मारून आत्महत्या केली.

इकडे अनिता फ्रान्समध्ये आपली लाखो रुपयांची पोटगी आणि करोडोच्या किमतीचे दागिने घेऊन खुश होती. तिला घातलेल्या अटीप्रमाणे तिने कधीच लग्न केले नाही. पॅरीसमधल्या सिक्रेट महालात सत्तराव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या या उत्कंठापूर्वक आयुष्यावर अनेक कादंबर्या लिहिल्या गेल्या.

हॉलीवूड मध्ये पेनेलोप क्रुझला घेऊन अनितावर एक चित्रपटही बनत होता मात्र कपुरथला संस्थानच्या वंशजांनी आक्षेप घेतल्याने सिनेमा गुंडाळण्यात आला. पण हा लेख लिहण्यापासून ते आम्हाला गुंडाळू शकले नाहीत हे नशिब. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.