तिच्यावर बंदूक रोखून उभ्या असलेल्या 12 सैनिकांच्या दिशेने तिने ‘फ्लायिंग किस’ फेकले.

जगभरातल्या रंगेल स्वभावाच्या माणसांची राजधानी असलेल्या पॅरिसच्या जादुई दुनियेवर राज्य करायची माताहारी. ज्याला आता ‘स्ट्रीप डान्स’ म्हणून ओळखल जातं त्याचा शोध माताहारीने लावला अस मानलं जातं.

भारतीय नारीच्या वेशातील माताहारी जेव्हा नृत्य करत एकेक कपडे काढायची तेव्हा भलेभले धनदांडगे, राजकारणी, सैन्यातले अधिकारी पागल होऊन जायचे. फक्त दागिने घातलेले तीचे मादक फोटो आजही प्रसिद्ध आहेत. स्वतः भोवतीच कामुकतेचं वलय गडद करण्यासाठी ती आपण मूळ इंडोनेशियाची आहे असं सांगायची. माताहारी ह्या शब्दाचा अर्थच होता ‘डोळे दिपवणारा सूर्य’. ती तिच्या नावाप्रमाणेच जगली.

मार्गेटा ट्सेला हे तीचं खरं नांव.तीचा जन्म नेदरलँडमध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला.

मात्र वडिलांच्या दिवाळखोरीनंतर सावत्र आईच्या जाचाला कंटाळून ती घर सोडून पळाली. पुढे ‘डच इस्ट इंडिया कंपनी’मध्ये काम करणाऱ्या ‘रुडोल्फ मक्लोय्ड’ या आर्मी ऑफिसरशी तीने लग्न केलं आणि त्याच्या सोबत इंडोनेशियामध्ये संसार सुरु केला. तो काही सुखद नव्हता. रुडोल्फचा बाहेरख्यालीपणा, दारू पिऊन मारझोड ही नेहमीची गोष्ट होती. त्यांचा एक मुलगा दुर्धर आजाराने मरण पावला. मग मात्र तीने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

ह्या इंडोनेशियातील वास्तव्यामुळे तीला फक्त दोन गोष्टी मिळाल्या. ‘माताहारी’ नाव आणि भारतीय स्टाईलची उत्तेजक नृत्यकला(exotic dance) ह्याच नृत्यकलेच्या जोरावर तीने युरोपमधल्या उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश मिळवला. आयुष्यात झेललेल्या सगळ्या दुःखाचा बदला घेत असल्याप्रमाणे बेधुंदपणे ती जगू लागली. मात्र तीच्याकडे येणाऱ्या सेलिब्रिटी गिऱ्हाईकांमुळे ‘ड्युजीएम ब्युरो’ ह्या फ्रांसच्या गुप्तहेर संघटनेचे लक्ष वेधले गेले.

पहिल्या महायुद्धात फ्रान्सचं शत्रू राष्ट्र असणाऱ्या जर्मनीचा युवराज विल्यम माताहारीवर फिदा होता. ह्याचा वापर करून जर्मन सैन्याचे सिक्रेटस गोळा करायचं काम तीला देण्यात आलं. त्यासाठी 1लाख फ्रँक्स देण्याचं अमिष दाखवण्यात आलं. अत्यंत चलाख असणाऱ्या माताहारीने बरेच जर्मन सिक्रेटस आपल्या विविध आशिकांकडून गोळा केले.

याचदरम्यान फ्रान्स सैन्यात काम करणाऱ्या रशियन वैमानिक मास्लोववर तीचं प्रेम जडलं.

युद्धात झालेल्या अपघातात तो जायबंदी झाला. त्याला भेटायचं निम्मित करून माताहारी युद्धफ्रंटवर देखील जाऊ लागली. तीचं जन्मराष्ट्र नेदरलँड हे तटस्थ असण्याचाही तीला फायदा झाला. युरोपातील वेगवेळ्या शहरांमध्ये तीचा वावर ऐन युद्धात सुरू होता.

मात्र पुढे एकदा स्पेनला जात असताना ब्रिटिश गुप्तहेर संघटना MI6 ने फालमौथ या बंदरावर तीचं जहाज अडवलं आणि तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तीच्यावर जर्मनीसाठी ‘डबल एजंट’ (दुहेरी गुप्तचर) म्हणून काम करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला. जर्मन हेराबरोबर तीच्या सांकेतिक संभाषणाचा टेलिग्राफ पुरावा म्हणून सादर करण्यात आला. तीने ठामपणे हे आरोप नाकारले. तीला सोडण्यात आलं मात्र तीचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी तीला मुद्दामहून खोटी माहिती देण्यात आली आणि तीच्यावर पाळत ठेवण्यात आली.

खोट्या माहितीच्या आधारे जर्मन गुप्तहेरांनी एका बेलजीयन एजंटला ठार केले त्यावेळी ती जर्मनीची डबल एजंट आहे ह्यावर शिक्कामोर्तब झालं. असं म्हणतात की तीच्यावर कच खाऊन असलेल्या जर्मन गुप्तहेर खात्याने तिच्यावर शंका उपस्थित व्हावी, म्हणून ‘फ्रेंच ब्युरो’च्या हाती लागावे असे खोटे पुरावे मागे सोडले होते. गुप्तहेर खात्यांच्या चाली-प्रतीचाली मध्ये प्यादं असलेल्या माताहारीचा बळी गेला.

wikipedia

फ्रान्स सरकारने तीला अटकेत टाकलं.

अटक करण्यात आल्यावर तिच्यावर खटला चालवला गेला. यावेळी तीला कोणीही साथ दिली नाही. डच सरकारने तीची जबाबदारी झटकली. तीच्या मास्लोव या बॉयफ्रेंडने देखील तीच्यासाठी साक्ष देण्यास नकार दिला. युद्धात शहीद झालेल्या ५००००  सैनिकांच्या मृत्यूला तीला जबाबदार धरण्यात आले. शेवटपर्यंत तिने देशासाठी दगाबाजी केल्याचा इन्कार केला. सबळ पुरावे सापडले नाहीत तरीही तिला गोळ्या घालून मृत्युदंडाची शिक्षा झाली.

ह्या शिक्षेला सामोरे जाताना तीच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिने तोंडावर काळे कापड घालून घेण्यास देखील नकार दिला. तिच्यावर बंदूक रोखून उभ्या असलेल्या 12 सैनिकांच्या दिशेने तिने ‘फ्लायिंग किस’ फेकले. तिचे शेवटचे शब्द होते “I am ready”. गोळ्यांनी तिच्या शरीराची चाळण करण्यात आली.

मरणानंतरही तिच्या शरीराची दुर्दशा थांबली नाही.

तीच मृतशरीर स्वीकारण्यास नातेवाईक मित्र परिवारमधून कोणीही पुढे आला नाही. वैद्यकीय कॉलेजमध्ये अभ्यासासाठी तिचा देह देण्यात आला आणि तिचे मस्तक जतन करून म्युझियममध्ये ठेवण्यात आले. पुढे 2000 साली त्याची चोरी झाली.

अनेक इतिहासकार तिला निर्दोष मानतात.ती खरंच निर्दोष होती का? मृत्युला निर्भीडपणे सामोरे जाण्याचं धाडस तिच्याकडे कुठून आलं असेल? तिच्या भोवतीच गूढ वलय अजूनही कायम आहे.

जगभरातल्या फिल्ममेकरना तिच्या स्टोरीने भुरळ घातली. ‘माताहारी’ नावानेच ४ चित्रपट हॉलीवूडमध्ये आले आहेत. तीच्या कथेवर प्रेरित होऊन बनलेल्या विविध भाषेतल्या फिल्म्सची, नाटकांची तर मोजदादच होऊ शकत नाही. जगप्रसिध्द लेखक पाउलो कोएलो पासून ते पॉर्न लेखकांपर्यंत अनेकांनी तिची कथा आपल्या कादंबरीमध्ये वापरली. जिवंतपणीच दंतकथा बनलेली ही रुपगर्विता १८७६ साली आजच्याच  दिवशी जन्मली होती.

हे ही वाच भिडू.