देशभक्तीसाठी राष्ट्रध्वज बनवला पण त्यांच्यावरच हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली

देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एका उपक्रमाची घोषणा केली होती. ती म्हणजे हर घर तिरंगा..!! या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशातील करोडो घरांवर तिरंगा फडकावला जाणार आहे..

मात्र हर घर तिरंगा पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटची डीपी बदललीय. डीपीवरील स्वतःच्या फोटोला काढून तिथे तिरंग्याचं चित्र ठेवलय. 

कारण आज भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझायनर पिंगली व्यंकय्या यांची १४६ वी जयंती आहे. 

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटची डीपी तर बदललीच सोबतच देशातील सर्व नागरिकांना डीपीवर तिरंगा ठेवण्याचं आवाहन केलंय.

आज पिंगली व्यंकय्या यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने एका टपाल तिकिटाचे प्रकाशन सुद्धा केले जाणार आहे. परंतु राष्ट्रध्वजासाठी संघर्ष करून राष्ट्रध्वज बनवणाऱ्या पिंगली व्यंकय्यांचे स्वातंत्र्यांनंतरचे आयुष्य मात्र हलाखीत गेले होते. 

सामान्य तेलगू कुटुंबात जन्माला आलेले पिंगली व्यंकय्या..

पिंगली व्यंकय्या यांचा जन्म आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळच्या भातलापेनुमारू गावात झाला. मद्रासमधल्या हायस्कुल मध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उसाचं शिक्षणासाठी ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले. त्यात भूविज्ञान व कृषीचे शिक्षण घेतले आणि अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले.

पिंगली व्यंकय्या आर्मीत भरती होऊन आफ्रिकेत गेले..

पिंगली व्यंकय्यांनी शिक्षण जरी भूविज्ञानाच्या घेतले होते तरी ते नोकरीसाठी १९ व्य वर्षी ब्रिटिश आर्मीत जॉईन झाले. ब्रिटिश आर्मीमध्ये असतांना पिंगली व्यंकय्या यांना दुसऱ्या बोअर युद्धासाठी आफ्रिकेत पाठवण्यात आलं होतं.

आफ्रिकेत असतांना २३ वर्षीय पिंगली व्यंकय्या यांची महात्मा गांधींबरोबर भेट झाली. ते महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावीत झाले आणि आयुष्यभराचे गांधीवादी बनले. 

महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झालेल्या पिंगली व्यंकय्या यांनी आर्मीतली नोकरी सोडली व ते भारतात परतले आणि भारतात रेल्वेमध्ये गार्डची नोकरी करायला लागले. यासोबतच ते भारतीय राष्ट्रीय काँगेसच्या सुद्धा संपर्कात होते. 

व्यंकय्यांनी आर्मीची नोकरी सोडली मात्र आर्मीतली एक गोष्ट त्यांच्या मनात सारखी घुटमळत होती..

पिंगली व्यंकय्या साऊथ आफ्रिकेत ब्रिटिश आर्मीत असतांना आर्मीतल्या एका गोष्टीने भारावून गेले होते. ती गोष्ट होती ब्रिटिशांचा राष्ट्रद्वाज युनिअन जॅक. आर्मीचे सैनिक दररोज युनिअन जॅकला सलामी द्यायचे त्या युनिअन जॅकमधून त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळायची.

भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी लढणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुद्धा एक ध्वज असावा असं त्यांना वाटत होतं. त्यामुळेच पिंगली व्यंकय्या यांनी एक ध्वज असावा अशी मागणी अनेकदा काँग्रेसकडे केली. तसेच त्यासाठी ध्वजाचे अनेक डिजाईन सुद्धा बनवले होते. 

तिरंग्याच्या जन्माला सुरुवात झाली..

आर्मी सोडली व रेल्वेत गार्डची नोकरी केली. गार्डची नोकरी सोडली आणि प्लेग निर्मूलन इन्स्पेक्टरची नोकरी केली. मात्र या सगळ्यामध्ये भारताला एक राष्ट्रध्वज असावा ही त्यांची इच्छा काहीही केल्या सुटत नव्हती. 

त्या इच्छेतून १९१६ साली पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली. त्यांच्या या उपक्रमाला साथ मिळाली ती एस.बी. बोमन आणि उमर सोमानी यांची. या तिघांनी मिळून “नॅशनल फ्लॅग मिशन” ची स्थापना केली.

भारताच्या राष्ट्रध्वजाचासाठी तुयांनी १९१९ ते २१ या काळात अनेकदा आवाज उठवला. त्यांच्या या कामाची गहाळ महात्मा गांधी यांनी आपल्या यंग इंडिया वृत्तपत्रातून सुद्धा घेतली. अखेर व्यंकय्या यांच्या प्रयत्नांना यश आलं. 

त्यापूर्वी १९१६ मध्ये व्यंकय्या यांनी इतर देशांच्या राष्ट्रध्वजांवर एक पुस्तिका लिहिली होती. ज्यात इतर राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजाच्या अभ्यासासोबत भारताच्या राष्ट्रध्वजसंदर्भात एकूण ३० डिजाईन सादर केल्या होत्या. 

पहिला ध्वज तयार झाला..

१९२१ मध्ये पिंगळी व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची पहिली डिजाईन तयार केली. त्यात लाल आणि हिरव्या पट्ट्यांवर चरखा काढलेला होता. मात्र महात्मा गांधी यांनी त्यात पांढरी पट्टी जोडण्याचा सल्ला दिला.

महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतर त्यात वर पांढरी पट्टी, मध्ये हिरवी पट्टी आणि खाली लाल पट्टी व तीनही पट्ट्यांमध्ये पसरलेला ध्वज तयार करण्यात आला. 

त्या झेंड्याला औपचारिक मान्यता मिळाली नव्हती. मात्र अनौपचारिक पद्धतीने काँग्रेसच्या बैठकीत आणि संमेलनात तो झंडा वापरण्यात येत होता.

तिरंग्याची पुनर्रचना करण्यात आली.. 

तिरंगा तयार झाला होता मात्र त्यावर अनेक वाद विवाद व्हायला लागले. तसेच झेंड्याच्या विविध पैलूंना तपासण्यात आलं. त्यामुळे झेंड्याची परत एकदा रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

झेंड्यात सगळ्यात वर असलेली पट्टी आकाशाच्या रंगात एकरूप होते त्यामुळे फक्त दोनच रंग उठून दिसतात असं मत मांडण्यात आलं. त्यामुळे पांढरी पट्टी मधल्या भागात ठेवण्यात आली.

लाल रंगाऐवजी भगव्या रंगाची निवड करण्यात आली व भगवी पट्टी सगळ्यात वर ठेवण्यात आली. तर आधीपासून अस्तित्वात असलेली हिरवी पट्टी खालच्या भागात आली.

तसेच तीनही पट्ट्यांमध्ये पसरलेला निळ्या रंगाचा चरखा लहान करून फक्त पांढऱ्या पट्टीमध्ये टाकण्यात आला. या पुनर्रचनेमधून आजच्या तिरंग्यासारखा दिसणारा तिरंगा ध्वज अस्तित्वात आला. 

देशाला स्वातंत्र्य मिळतांना झेंड्यातून चरखा गेला आणि अशोक चक्र आला.. 

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची राजमुद्रा म्हणून सरनाथाच्या अशोक स्तंभावरील त्रिमुखी सिंहाची निवड कारण्यात आली. त्यामुळे त्या मुद्रेच्या खाली असलेला अशोक चक्र झेंड्यात समाविष्ट करण्याचा निर्णय झाला.

आधीच्या तिरंग्यातील चरखा काढून त्याजागी अशोक चक्र ठेवण्यात आलं आणि स्वतंत्र भारताचा तिरंगा झाड तयार करण्यात आला. तिरंग्याच्या या प्रवासात त्याचे डिझायनर पिंगली व्यंकय्या हे वेळोवेळी द्वाजाची बांधणी करत होते.

पिंगली व्यंकय्यांचे शेवटचे दिवस फार हलाखीत गेले.

पिंगली व्यंकय्या हे उच्चशिक्षित होते. त्यांनी देशसेवेसाठी वेळोवेळी नोकऱ्यांचा त्याग केला आणि स्वतःपेक्षा देशाला महत्व दिले. परंतु आयुष्याच्या शेवटच्या दिवसात मात्र फार त्रास सहन करावा लागला.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पिंगली व्यंकय्या हे ७१ वर्षाचे होते. वृद्धपकाळात उत्पन्नाचे साधन संपले. १९६३ मध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी गरिबी आणि अतिशय कष्टाच्या काळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

पिंगली व्यंकय्या जिवंत असतांना आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाने सुद्धा असेच गरिबीत दिवस काढले. ज्या माणसाने देशातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी आणि स्वातंत्र्य मिळावे यासाठी राष्ट्रध्वज तयार केला. त्या व्यक्तीकडे देशातील सर्वांनीच दुर्लक्ष केले. 

आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी टपाल तिकीट काढले होते..

आज पिंगली व्यंकय्यांच्या १४६ व्या जयंती दिनी केंद्र सरकारकडून व्यंकय्या यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशित केले जात आहे. मात्र २००९ मध्ये पिंगली व्यंकय्यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्य आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री वय एस चंद्रशेखर रेड्डी यांनी टपाल तिकीट प्रकाशित केलं होतं.

आज पंतप्रधानांसह देशातील अनेक जण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा ठेवत आहेत. तेव्हा तिरंग्याची डिझाईनिंग करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांना लक्षात ठेवायला हवे हे नक्की.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.