रेल्वेमध्ये गार्डची नोकरी केलेल्या स्वातंत्र्यसैनिकाने भारताचा राष्ट्रध्वज बनवला.
तिरंगा म्हणजे देशाची आन-बान शान. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी तिरंगा हा किती महत्त्वाचा आहे हे चांगलेच माहितेय. शाळेत असताना पासून आपल्याला यात तिरंग्याचा आणि त्याच्या त्या रंगांचं महत्त्व पटवून दिलं जातं. त्यानुसार या तिरंग्याच्या वरच्या भागात असणारा गडद केशरी रंग त्याग, धैर्याचं प्रतिक आहे. मधल्या पांढऱ्या रंगातून शांती आणि पावित्र्याचा बोध होतो, तर खालच्या हिरव्या रंगातून निसर्गाचा.
तिरंग्याच्या मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर असणार अशोक चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. या तिरंग्याबद्दल आपल्याला नेहमीच सन्मान आदर वाटतो. पण हा तिरंगा बनवण्यामागे नेमकी कोणती व्यक्ती होती हे फार कमी लोकांना माहिती आहे.
तर ही व्यक्ती होती पिंगली वेंकय्या ज्यांनी हा तिरंगा डिझाईन केला होता. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 चा आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातला.
त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण भटाला पेनमरू आणि मछलीपट्टणम इथे घेतलं. त्यानंतर एकोणिसाव्या वर्षी ते मुंबईत आले होते. 19 वर्षाचे असताना पिंगाली वेंकय्या यांनी ब्रिटिश आर्मी जॉईन केली. 1899 ते 1902 या दरम्यान आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धात त्यांनी भाग घेतला होता.
तिथेच त्यांची भेट महात्मा गांधींशी झाली. त्यांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले आणि मुंबईत परतल्यानंतर ते रेल्वे मध्ये गार्डच्या नोकरीत लागले.
या दरम्यान, मद्रास ( सध्याची चेन्नई) मध्ये प्लेग नावाच्या साथीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले आणि त्यांनी ती नोकरीही सोडली. आणि मद्रासमध्ये प्लेग रोग निर्मूलन इंस्पेक्टरच्या पदावर तैनात झाले.
ते भूगर्भशास्त्रातील डॉक्टर होते. त्यांनी हिऱ्याच्या संशोधनातही प्रभुत्व मिळवले. म्हणून त्यांना ‘डायमंड वेंकय्या’ असेही नाव देण्यात आले.
1916 साली पिंगली व्यंकय्या यांनी एका अशा ध्वजाचा विचार केला जो सर्व भारतीयांना एका धाग्यात जोडेल. त्यांच्या या उपक्रमाला साथ मिळाली ती एस.बी. बोमन आणि उमर सोमानी यांची. या तिघांनी मिळून “नॅशनल फ्लॅग मिशन” ची स्थापना केली.
व्यंकय्या महात्मा गांधींपासून खूप प्रेरित होते. अशा परिस्थितीत त्यांनी राष्ट्रध्वजासाठी त्यांच्याकडून सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. या ध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्र ठेवण्याचा सल्ला गांधीजींनी दिला, जे संपूर्ण भारताला एका धाग्यात बांधून ठेवेल.
पिंगली वेंकय्या यांनी लाल आणि हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अशोक चक्र असणारा ध्वज आणली होता, पण गांधीजींना तो पटला नाही. कारण त्यांच्यामध्ये संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करू शकणारा हा ध्वज नव्हता. दरम्यान, राष्ट्रध्वजाच्या रंगाबाबत आधीपासूनचं अनेक वादविवाद चालू होते.
1916 मध्ये त्यांनी भारतीय झेंड्याच्या डिजाईन संदर्भात एक पुस्तकही लिहिले.
पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांना भारत सोडावा लागला होता. देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या काही दिवस आधी पुन्हा काँग्रेससमोर प्रश्न पडला की, राष्ट्रध्वजाला कोणते स्वरूप द्यावे, यासाठी पुन्हा डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली.
तीन आठवड्यांनंतर 14 ऑगस्टला या समितीने अखिल भारतीय काँग्रेसच्या ध्वजालाच राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित करण्याची शिफारस केली. हा तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचे आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक बनला.
15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी म्हणजे 22 जुलै 1947 रोजी झालेल्या भारतीय संविधान सभेच्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय ध्वज त्याच्या वर्तमान स्वरूपात स्वीकारण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 दरम्यान हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेला.
भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली वेंकय्या यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने त्यांच्या नावाने एक टपाल तिकीट जारी केलेत. राष्ट्रध्वज बनवल्यानंतर पिंगळी वेंकय्याचा ध्वज “झंडा वेंकय्या” या नावाने लोकांमध्ये लोकप्रिय झाला. पिंगली वेंकय्या यांचे 4 जुलै 1963 रोजी निधन झाले.
हे ही वाच भिडू.
- स्वातंत्र्यलढ्यात सर्वात कमी वयात फासावर चढलेला क्रांतिकारक !
- कशी बदलली आता, आपली भारतमाता?
- भगतसिंग वाचले ! चंद्रशेखर आझाद आझाद झाले. ते फक्त यांच्यामुळे.