कोर्लई किल्ला आजही निजामशाही आणि पोर्तुगीज साम्राज्याचा साक्षीदार बनून थाटात उभा आहे

गडकिल्ल्यांच्या संपत्तीने संपन्न असलेल्या महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत ज्यांची अजूनही ओळख देशाला आणि जगाला झालेली नाहीये. मात्र त्यांचा इतिहास हा अत्यंत ज्वलंत आहे आणि भारताच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार बनून आजही हे किल्ले उभे आहेत. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, मुघल यांच्या किल्ल्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील मात्र निजाम आणि पोर्तुगीजांची साक्ष देणारे किल्ले आणि त्यांच्या गोष्टी क्वचितच कानी पडतात.

अशा किल्ल्यांच्या मांदियाळीत क्रमांक लागतो तो ‘कोर्लई’ किल्ल्याचा.

हा किल्ला आहे महाराष्ट्राच्या कोकण भागात. कोकणात एक गाव आहे ‘कोर्लई’. कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास १०० मीटर उंच टेकडी आहे. आणि या टेकडीवर आहे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार असलेला हा किल्ला. या ठिकाणाला ‘मारो दे चौल’ (Morro De Chaul) म्हणजे ‘चौलचा डोंगर’ असं पोर्तुगीज नाव होतं. किल्ल्याच्या पायथ्याशी हे कोर्लई गाव वसलेलं असल्याने याच गावावरून या गडाला ‘कोर्लई किल्ला’ नाव पडलं असावं 

गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचमुळे कोर्लई गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. या किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक जो कोर्लई गावातून जातो तर दुसरा दीपगृहावरून पायऱ्यांच्या मार्गाने. 

कोणताही मार्ग निवडा मात्र तिथे पोहोचण्याआधी तुम्हाला एका मार्गावरून जावं लागतं. या रस्त्याला लागलं, की ठिकठिकाणी तुम्हाला मासोळी व्यवसाय करणारे लोक दिसतील. मासोळी वाळवणाऱ्या बायका आणि समुद्रातून मासोळी घेऊन येणाऱ्या पुरुषांची चांगलीच लगबग दिवसभर इथे चालू असते. त्यात समुद्राच्या लाटांचा आवाज राहून राहून आपलं लक्ष वेधून घेत असतो. 

जर तुम्ही दीपगृहावरून पायऱ्यांचा मार्ग अवलंबला तर समुद्राच्या बाजूने एका लांबसडक रस्त्यावरून तुम्ही पायऱ्यांजवळ पोहोचता. अत्यंत अरुंद अशा या पायऱ्या तुम्हाला किल्ल्याच्या बाह्य तटबंदीत असलेल्या छोटेखानी दरवाजा जवळ घेऊन जातात. तिथून प्रवेश केला तर तब्बल पाच दरवाजे ओलांडून तुम्ही मुख्य किल्ल्याजवळ पोहोचता. या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला आहे. ज्याला पोर्तुगीजांनी फोर्टलेझा रियल (राजेशाही दुर्ग) असं नाव दिलं होतं. 

किल्ल्याच्या उत्तर टोकाला बुरुजांची मालिका आणि समुद्राकडे उघडणारं दार आहे. या दोन भागांना  दगडी तटबंदी जोडते जी बालेकिल्ला ते समुद्र अशी सहा भागांमध्ये उतरत गेली आहे. या बाजूने मुख्य द्वाराकडे जात असताना तुम्हाला ठिकठिकाणी तोफा आणि पोर्तुगीज भाषेत लिहिलेले शिलालेख आढळतील. 

तसंच या भागाच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून दूरवर पसरलेला निळा समुद्र आणि त्यातील बोटी दिसतात, सोबतच गडाच्या तटबंदीवर असलेली फुलाची झाडं इतकी सुंदर दिसतात की तिथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत ते दृश्य कैद होतं.

जलदुर्गांची खासियत असते ‘त्यांची भक्कम तटबंदी’. कोर्लई किल्ल्यावरही हे बघायला मिळतं. दोन्ही बाजूने रुंद असलेली ही वाट भक्कम तटबंदीने बांधून काढलेली दिसते. किल्ल्याच्या उतरत्या सोंडेवर टेहाळणी बुरुज आहे. समुद्रमार्गावरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा. तर इथे एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. चहुबाजूने समुद्र असूनही या विहिरीचं पाणी अतिशय गोड आहे. 

सेंट इनॅसिओ, सेंट फ्रान्सिस्को अशा विविध संतांची नावं इथल्या बुरुजांना दिलेली आहेत आणि काही ठिकाणी कोरलेले दगडी लेखही आपल्याला दिसू शकतात. इथं कोरलेल्या लेखानुसार फिलिपे मस्कारेन्हास या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या आदेशाने इसवी सन १६४६ मध्ये या किल्ल्याचं बांधकाम सुरु करण्यात आलं. मे १६५० मध्ये किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला.

जर तुम्ही गावाचा मार्ग निवडला तर काही पायऱ्या आणि पायवाटेच्या साहाय्याने तुम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतात. त्याचं बांधकाम अतिशय दणकट आहे शिवाय मुख्यद्वारावरच पोर्तुगीज भाषेत शिलालेख आढळतो ज्यावर लिहिलेलं आहे ‘किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आधी लढा द्यावा लागेल’. यावरून पोर्तुगीजांची युद्ध क्षमता आपल्या लक्षात येते. स्वतःच्या साम्राज्याच्या रक्षणासाठी ते किती तत्पर होते याची जाणीव होते.

या किल्ल्यावरील कमानी इतर किल्ल्यांवरील कमानींपासून अगदीच वेगळ्या आहेत. अर्धगोलाकार कमानीचा आकार पाहता निजामशाही काळात हे बांधकाम झालं असावं असा आभास होतो. तर या दारावरच गोलाकार साओ पेद्रो बुरुज बांधलेला दिसतो. तसंच या ठिकाणच्या कात्रीच्या आकारातील बुरुजांच्या रचनेला ओर्हेल्ला दे लिब्रे (Orelha De Libre) म्हणजे ‘सशाचे कान’ असं नाव ठेवण्यात आलंय.

या किल्ल्यावर एक चर्च देखील बांधण्यात आलं आहे. उत्तराभिमुख असलेल्या या चर्चची डागडुजी पुरातत्व खात्याने केलेली दिसते. चर्चच्या मागे गेल्यावर दरवाजा लागतो. तो ओलांडून पंचकोनी बुरुजाला वळसा मारून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आपण पोहोचतो. किल्ल्याच्या माथ्यावर चाफ्याच्या झाडाला बहर आलेला पाहताना खूप छान वाटतं. तिथेच रत्नेश्वराचे ठिकाण आणि तुळशी वृंदावनही दिसतं.

दो कुटो याने १६०० च्या काळात या किल्याच्या मजबुतीचं वर्णन करताना त्या काळात इथे ७० तोफा आणि ८००० शिबंदी असल्याचं वर्णन केलंय.

निजामशहा आणि पोर्तुगीजांची या परिसरात भयानक लढाई झाली. निजामाचं ‘हुसैनी’ नावाचं गलबत मक्केवरून येत होतं. ते पोर्तुगीजांनी बुडवलं म्हणून निजामाचा त्यांच्यावर राग होता. त्यांनी या रेवदंडाच्या परिसरात पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडलं. पण हार मानतील ते पोर्तुगीज कसले. त्यांनी रेवदंडा बंदरामध्ये बेसावध निजामाच्या सैनिकांवर हल्ला केला. फक्त ४०० पोर्तुगीजांनी १२०० निजामांच्या सैन्याचा खात्मा केला.

रेवदंडाचा किल्लेदार आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेऊन पोर्तुगालला नेलं आणि धर्मपरिवर्तन करून त्यांना ख्रिश्चन केलं. १७४० पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश लाभलं नाही. त्यानंतर वसईच्या मोहिमेच्या सुमारास मराठ्यांनी कोर्लई जिंकून घेतला.

हा किल्ला जितका इतिहासाने समृद्ध आहे तितकंच कोर्लई गावदेखील परंपरेने समृद्ध आहे. आजही या गावातील लोक पोर्तुगीज भाषा वापरतात. तसंच त्यांनी ख्रिश्चन धर्म देखील जपला आहे.

पोर्तुगीज, मराठी, इंग्लिश अशा विविध भाषांच्या संगम इथे दिसतो. यातून घडलेल्या भाषेला ते ‘नो लिंग’ म्हणजे ‘आमची भाषा’ असं म्हणतात. विशेष म्हणजे लिपी म्हणून ते देवनागरी वापरतात. तसंच इथल्या खाद्यसंस्कृतीत एक विशिष्ट प्रकार आहे ज्याला ‘पोपटी’ असं म्हणतात. एकदा ही चव चाखली की तुम्ही कधीही विसरू शकत नाही, असं इथले लोक गर्वाने सांगतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.