जे गाणं मुकेशने गावं अशी दिलीपकुमारांची इच्छा नव्हती शेवटी त्याच गाण्याला फिल्म फेअर मिळाला

आज २७ ऑगस्ट ! लोकप्रिय गायक मुकेश यांचा स्मृती दिन. हे वर्ष मुकेश यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. २२ जुलै १९२३ या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि २७ ऑगस्ट १९७६ रोजी अमेरिकेत डेट्राइट इथे त्यांचे निधन झाले. 

रसिकांच्या लाडक्या मुकेश ने तशी खूपच कमी गायली. त्यांच्या गाण्याची एकून संख्या एक हजाराच्या आत आहे! आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांचे दोन किस्से आणि छोट्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली लाजवाब गाणी याचा आढावा घेऊयात…

संगीतकार शंकर जयकिशन हे भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अशी जोडी होती. १९५८ साली बिमल रॉय यांचा एक सिनेमा आला होता ‘यहुदी’. बिमलदाच्या फक्त याच सिनेमाला एस जे यांच संगीत होतं.

याच सिनेमातील एका गाण्याचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. ‘ये मेरा दिवानापन हैं…’या गाण्याची संगीतरचना केली होती शंकर यांनी. हे गाणं मुकेशने गायला हवं असं त्यांच्या डोक्यात पक्क होतं. या गीतातील दर्द मुकेशच्या स्वरातून जास्त प्रभावीपणे व्यक्त होईल असे त्यांना वाटत होते.

पण सिनेमाचा नायक दिलीप कुमार आणि दिग्दर्शक बिमलदा यांना हे गीत तलत कडून गावून घ्यायचे होते. शंकरच्या मनात तलतच्या स्वराबाबत काहीच शंका नव्हती फक्त त्यांना हे गीत मुकेशला द्यायचं होतं. सर्व जण आपापल्या चॉईसवर कायम राहिल्याने मोठा पेच निर्माण झाला. 

शेवटी अक्षरश: मुकेश की तलत हा निर्णय ‘टॉस’ करून  घेण्यात आला. ‘टॉस’ मुकेशने जिंकला खरा पण नायक दिलीप कुमार मात्र मुकेशचा टेक ऐकूनच या निवडीला मान्यता देणार होता. 

शंकरने दिलीपला दुसर्‍या दिवशी दुपारी १ च्या नंतर रेकॉर्डींग स्टुडीओत बोलावले. कारण त्या पूर्वी त्यांना मुकेशकडून भरपूर रिहर्सल करून घ्यायची होती! झालं…ठरल्या प्रमाणे मुकेशकडून घासून पुसून चाल बसवून घेतली.

दिलीप दुपारी १.३० वाजता आला. मुकेशच्या पहिल्याच शेर (दिल को तुझको बेदिली है..) आणि मुखडा ऐकून दिलीप उठला व त्याने मुकेशला आनंदाने मिठीच मारली!

शंकरच्या मनाप्रमाणे गाणं मुकॆश अगदी भावोत्कटतेनं गायला. या गाण्यासाठी शैलेन्द्रला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. पुढे बिमल रॉय यांनी त्यांच्या मधुमती साठी मुकेश कडून दोन गाणी गावून घेतली जी दिलीप वर चित्रित झाली. ती गाणे म्हणजे ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी’ आणि ‘ दिल तडप तडप के कह रहा है…’ या गाण्याची आणखी एक गंमत आहे. हि चाल  शंकर यांना सी. रामचंद्र यांच्या त्याच वर्षी आलेल्या ‘अमर दीप’ या सिनेमातील ‘देख हमे आवाज न देना…’ या गीतावरून सुचली होती असं म्हणतात.

कोरस मध्ये गाणार्‍याला प्रत्येकाला आपण कधीतरी मुख्य़ स्वरात गावं असं त्याचं स्वप्न असतं. प्रत्येकाचंच ते पूर्ण होतं अशातला भाग नाही पण अनपेक्षीतरित्या संधी मिळून काहींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेली दिसतात. त्याचाच हा किस्सा.

बर्‍याचदा प्रतिथयश गायकाकडे त्याने गावयाच्या गाण्याचे डमी (इतरांकडून गाऊन घेतलेले) सॉंग पाठवले जाते. अशा डमी आवाजातल्या गायकांना कधी कधी अचानक पणे संधी मिळते आणि त्याची व्यावसायिक करीयर सुरू होते.

गायक मनहर उधास यांना ’विश्वास’या चित्रपटात  अशीच अनपेक्षीत पणे संधी मिळाली. ’आपसे हमको बिछडे हुये एक जमाना बीत गया’ या गाण्यात सुमन कल्याणपूर सोबत मुकेशच गाणार होता पण त्या वेळी नेमका तो व्यस्त असल्याने संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी ऐन वेळी मनहरला सुमन सोबत गायला बोलावले.

नंतर मुकेशच्या स्वरात गाणं रेकॉर्ड करूत किंवा डब करू असा विचार केला. काही दिवसांनी मुकेश आल्यावर त्याने हे गीत ऐकले व तो कल्याणजीला म्हणाला ’यार ये बच्चे ने तो कमाल कर दिया है…बहुत अच्छा गाया है. यही ट्रॅक रहने दो!’ मुकेशचा दिलदारपणा बघा. त्याच्या कृतीने मनहर पार्श्वगायक बनला.

सिनेमाच्या संगीताच्या सुवर्णयुगातील महत्वाचा शिलेदार होता मुकेश!

रूपेरी पडद्यावर राजकपूरचा स्वर म्हणून त्याने राजमान्यता मिळवली असली तरी त्याची अन्य कलाकारांवरील गाणी तितकीच किंबहुना त्याहून अप्रतिम आहेत. रफी प्रमाणेच मुकेशने कधीच छोटा संगीतकार मोठा संगीतकार असा भेद केल नाही.

मुकेश ने तशी कमीच गाणी गायली.त्याने गायलेल्या गीतांची संख्या हजाराच्या आत आहे.शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी यांच्याकडेच त्याच्या गाण्याची संख्या शंभराहून अधिक आहे.

आज २७ ऑगस्ट . मुकेशचा स्मृतीदिन.या निमित्ताने त्याच्या गाजलेल्या गीतांच्या आठवणी जागविण्यापेक्षा त्याने छोट्या संगीतकाराकडे गायलेल्या रचनांकडे बघू यात.

संगीतकार ब्रिजभूषण यांच्याकडे १९७२ साली त्याने एक गीत गायले होते. जे शत्रुघ्न सिन्हा वर चित्रीत होते गीताचे बोल होते ’कई सदियों से, कई जन्मों से तेरे प्यार को तरसे मेरा मन आ जा, आ जा के अधूरा हैं अपना मिलन ’ नक्श लायलपुरी यांच्या या गीतात त्याचा आवाज टिपेला पोचतो तरी बेसुरा होत नाही(जो आरोप त्याच्यावर वारंवार केला जायचा.)

सपनजगमोहन यांच्या संगीतातील चेतना (१९७०) मध्ये त्याचे एक अप्रतिम गाणे होते ’ मैं तो हर मोड़ पर तुझ को दूँगा सदा मेरी आवाज़ को, दर्द के साज़ को, तू सुने ना सुने’ १९७४ साली उषा खन्ना यांनी ‘सबक’ या सिनेमाला संगीत दिलं होतं त्यात एक गीत होतं ’बरखा रानी जरा जमके बरसो मेरा दिलबर जा न पाये झूमकर बरसो’ दुर्दैवाने हे मुकेशच उषा कडचे शेवटचे गाणे ठरले.

१९७० साली एल.पी ने संगीत दिलेला ‘पुष्पांजली’ हा किशोर साहूने दिग्दर्शित केलेला सिनेमा कुणाला आठवण्याची सुतराम शक्यता नाही पण यातील मुकेशचे ’जाने चले जाते हैं कहां दुनियासे जाने वाले’कोण विसरू शकेल? ’आंसू भरी है ये जीवन की राहे’(परवरीश-दत्ताराम), ज़िक्र होता है जब कयामत का तेरे जलवों की बात होती है तू जो चाहे तो दिन निकलता है तू जो चाहे तो रात होती है (माय लव्ह- दान सिंग) आ लौट के आजा मेरे मीत (रानी रूपमती-एस एन त्रिपाठी) भूली हुयी यादो मुझे इतना ना सताओ (संजोग-मदन मोहन)तुमसे ही घर घर (भाभी की चूडीयां-सुधीर फडके)हां मैने ही प्यार किया(बूंद जो बन गई मोती- सतीश भाटीया)हिया जरत रहत दिन रैन (गोदान-पं.रविशंकर) सोचता हूं ये क्या किया मैने(हमारी याद आयेगी-स्नेहल भाटकर)संसार है इक नदिया सुख दुख दो किनारे (रफ्तार)वो तेरे प्यार का गम इक बहान है सनम मेरी किस्मत हि कुछ ऐसी है के दिल टूट गया (माय लव्ह- दान सिंग)

सुवर्ण युगातील चॊटीच्या संगीतकारांनी मुकेशला फार कमी गाणी दिली. किती ते पहा ओपी नय्यर(४) अनिल विश्वास (२४) सलील चौधरी (२४)मदनमोहन(९)सी रामचंद्र (४) हेमंतकुमार(८) नौशाद (२५) सचिनदेव बर्मन(१२) नौशाद यांनी तर अंदाज (१९४९) नंतर तब्बल २० वर्षांनी ’साथी’ करीता त्याचा स्वर वापरला. असं असतानाही मुकेशने स्वराचं मोठं नंदनवन उभं केलं.

जेष्ठ गायक मुकेश यांना ‘बोल भिडू’ परिवाराकडून आदरांजली !

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.