‘सिनेमा फ्लॉप झाला तरच लग्न करेन’ अशी विचीत्र अट ट्विंकलने अक्षयला घातली..अन तो पिक्चर…….
आपल्या हिंदू संस्कृती मध्ये ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात’ असे म्हटले जाते. हे जरी खरे असले तरी कधी कधी मात्र लग्नाच्या गाठी ‘स्वर्गा’ च्या ऐवजी ‘स्टुडिओत’ पडतात असे म्हटले पाहिजे. कारण सिनेमाच्या या दुनियेत कलावंतांचे निम्मे आयुष्य स्टुडिओत जात असते तिथेच त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना घडत असतात.
अशीच एक महत्वपूर्ण घटना अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या बाबतीत घडली.
ट्विंकल खन्ना अभिनेता राजेश खन्ना आणि डिंपल कापडिया यांची मुलगी. जन्म २९ डिसेंबर १९७४ चा. कलावंताच्या घरात जन्म घेतल्यानंतर सहाजिकच अभिनयाच्या क्षेत्रात ती येणार हे ठरलं होतं पण ट्विंकलला खरंतर चार्टर अकाउंटंट व्हायचं होतं. त्यासाठी तिने तयारी देखील सुरू केली. तिचे शालेय शिक्षण पाचगणीला झाले. त्यानंतर तिने मुंबईला तिने कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली.
या सर्व घडामोडी घडत असताना अचानक अभिनेता धर्मेंद्र यांच्याकडून तिला सिनेमात येण्याची ऑफर आली. हा चित्रपट होता १९९५ सालचा ‘बरसात’! यात बॉबी देवल सोबत ती पडद्यावर आली. पहिलाच चित्रपट ठीक चालला.
तिला पदार्पणातच फिल्मफेयरचा पुरस्कारदेखील मिळाला.
पुढे तीन चार वर्षे तिने आघाडीच्या सर्व अभिनेत्यांसोबत म्हणजे अजय देवगण (जान, इतिहास) सैफ अली खान(दिल तेरा दिवाना) अक्षय कुमार ( इंटर नॅशनल खिलाडी, जुल्मी )आमिर खान (मेला), सलमान खान (जब प्यार किसीसे होता है) शाहरुख खान (बादशहा)गोविंदा (जोरू का गुलाम) यांच्यासोबत भूमिका केल्या होत्या. काही चित्रपट चालले काही अपयशी ठरले.
पण एकूणच अभिनयात तिला फारसे करिअर करता आले नाही हि वस्तुस्थिती आहे.
दुसरीकडे अक्षय कुमार याचे करियर देखील सुरुवातीला संथ चालले होते. काही प्रेम प्रकरणानंतर त्याच्या मनात ट्विंकल खन्ना भरली. तिच्यासोबत त्याने दोन चित्रपट देखील केले. आपल्या आयुष्याची जोडीदार हीच असावी अशी त्याने मनोमन तयारी केली.
एकदा धाडस करून त्याने स्टुडिओत ‘मेला’ च्या सेटवर ट्विंकल खन्ना समोर ‘अपने प्यार का इजहार किया.’ आणि तिला प्रपोज केले!
ट्विंकल सुरुवातीला गोंधळून गेली लग्नाचा विचार तिच्या मनात तोवर नव्हता. पण आपल्या अभिनयाची करिअरवर ती फारशी खूष नव्हती.
प्रपोजल नंतर तिने अक्षय कुमारला विचित्र अट घातली! “माझा ‘मेला’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट जर फ्लॉप झाला तरच मी तुझ्याशी लग्न करेल!” हा चित्रपट धर्मेश दर्शन दिग्दर्शित करीत होते.
यात तिच्या नायकाच्या भूमिकेत आमिर खान होता. आमिर खानचे होम प्रॉडक्शन होते. आमिर खान सोहेल खान अशी तगडी स्टारकास्ट होती. तिकडे अक्षय कुमार ला आता पेच पडला. कारण जर हा चित्रपट फ्लॉप झाला तरच ट्विंकल त्याची पत्नी होणार होती. अशा विचित्र अटीने हा सिनेमा फ्लॉप व्हावा अशीच प्रार्थना करीत असणार!
आमिर खान ट्विंकल खन्ना यांचा बहुचर्चित मेला हा चित्रपट ७ जानेवारी २००० या तारखेला प्रदर्शित झाला आणि पिक्चरच्या स्टार कास्ट आणि निर्मात्यांच्या दुर्दैवाने अन अक्षयच्या सुदैवाने सिनेमा सुपरफ्लॉप झाला.
अक्षय कुमारचे नशीब चांगले चित्रपट अयशस्वी ठरला. आता ट्विंकल खन्ना आपला शब्द पाळणे गरजेचे होते. तिने ॲक्टिंग करिअरला बाय-बाय करत १७ जानेवारी २००१ या दिवशी अक्षय कुमार सोबत लग्न केले.
मागच्या बावीस वर्षात त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय उत्तम चालले असून ट्विंकलने देखील इंटेरियर डेकोरेशन, लेखिका आणि डिझायनर म्हणून आपले नाव कमावले आहे. तसेच तिने अनेक चित्रपट प्रोड्यूस करून त्या क्षेत्रात आपल्याला सिद्ध केले आहे!
काहीही असो तिने अक्षयला घातलेली लग्नासाठीची अट जरा विचित्रच होती म्हणायला हरकत नाही.
- भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू :
- महाभारतावर ढिगानं मालिका आल्या पण पिक्चर काढण्याचं जिगर राजामौलींनीच दाखवलंय
- झी न्यूज ते आजतक… सुधीर चौधरी एवढे फेमस का आहेत ?
- या वर्षात येणारे हे ६ पिक्चर साऊथ इंडियन सिनेमांचे रिमेक असणार आहेत..