मोठ्या पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हा भारतातला सर्वात ट्रॅजेडी सिनेमा ठरला.

मुघल ए आझम बनवणारा के.असिफ. त्याने आयुष्यात फक्त अडीच सिनेमे बनवले. त्याने फक्त मुघल ए आझम बनवली असती तरी तो भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधलं सर्वात महान दिग्दर्शक राहिला असता.

पण त्याने अडीच सिनेमे बनवले. आता अडीच कसं काय हे सांगतो.

असिफचा मुघल ए आझम दुसरा सिनेमा होता. मूळचा युपीचा असिफ करीम मुंबईला आला आणि त्याचा फुल हा पहिलाच सिनेमा प्रचंड हिट झाला. ऐतिहासिक विषयावर बनवलेल्या या सिनेमाच्या यशानंतर असिफने आपलं आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न म्हणजे मुघल ए आझम बनवायची तयारी सुरू केली.

१९४६ ला मुघल ए आझम बनायला सुरू झाला आणि तो रिलीज झाला १९६० साली. दरम्यान च्या काळात सिनेमाचा मुख्य हिरो चंद्रमोहन वारला, आर्थिक गणित फिस्कटले, सिनेमावर प्रचंड संकटे आली.

पण तरी के असिफने मुघल ए आझम बनवला आणि रिलीज करून दाखवला.

त्याकाळी जगातल्या महागड्या सिनेमापैकी एक असा हा सिनेमा असेल. के असिफन सगळं आयुष्य या पिक्चर साठी पणाला लावलेल.

मुघल ए आझम सुपरहिट झाला. साधा सुपरहिट नाही तर भारतीय सिनेमातील एक मानदंड. ताजमहलच्या सौन्दर्याप्रमाणे या सिनेमाला जगात तोड नव्हती.

पण आता महत्वाकांक्षा वाढलेल्या असिफने त्याहून ही मोठा सिनेमा बनवायचं ठरवलं. त्याची तयारी देखील सुरू केली.

त्याच नाव होतं “लव्ह अँड गॉड” लैला मजनूच्या अजरामर स्टोरीवर हा सिनेमा आधारित होता.

मुघल ए आझम सर्वांग सुंदर होता फक्त त्यात एक कमी राहिली होती म्हणजे तो सिनेमा संपूर्ण रंगीत नव्हता. भारतात अजून ती टेक्नॉलॉजी आलेली नसल्यामुळे असिफने फक्त गाणी व छोटा पार्ट रंगीत बनवला होता. पण लव्ह अँड गॉड त्याला संपूर्ण रंगीत बनवायचा होता.

मुघल ए आझम च्या यशा नंतर प्रत्येक जण असिफ यांच्या बरोबर काम करण्यासाठी उत्सुक होता. यामुळे बजेटच टेन्शन नव्हतं.

सिनेमाचा हिरो होता ट्रेजेडी किंग गुरू दत्त आणि हिरॉईन निम्मी

स्वतः प्यासा सारखे शोकात्मक काव्यमय सिनेमा बनवणारा दिग्दर्शक गुरू दत्त मजनूच्या दर्दभऱ्या रोल साठी परफेक्ट होता. पण त्याकाळात गुरू दत्तच्या आयुष्यात वेगळीच ट्रॅजेडी सुरू होती. त्याच आणि त्याच्या बायकोचं पटत नव्हतं, वहिदा रहमान सोबतची खऱ्या आयुष्यातली लव्हस्टोरी फसली होती.

दारूने त्याला संपूर्णपणे पोखरले होत.

१९६३ ला सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. जवळपास अर्धा सिनेमा शूट झाला आणि अचानक बातमी आली की गुरुदत्त ने आत्महत्या केली. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला झटका बसला. गुरुदत्त तेव्हा फक्त ३९ वर्षांचा होता.

झोपेच्या गोळ्या खाऊन त्याने आत्महत्या केली होती.

यापूर्वी देखील त्याने नैराश्यातून दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण दैव दयेने तो वाचला होता पण यावेळी तसं घडलं नाही.

गुरू दत्तच्या अकाली मृत्यूमुळे सगळ्यात मोठा फटका के असिफच्या लव्ह अँड गॉड या सिनेमाला बसला. जवळपास निम्मे शूटिंग झालेलं असूनही असिफला संपूर्ण सिनेमा गुंडाळावा लागला.

हे त्याच्या बाबतीत दुसऱ्यांदा घडलं होतं.

या पूर्वी मुघल ए आझमचा हिरो सुद्धा अचानक वारल्यामुळे सिनेमा बंद पडला होता पण असिफने दिलीपकुमारला घेऊन उत्तुंग सिनेमा बनवून दाखवला होता.

हीच जिद्द बाळगून असिफने सहा वर्षांनी म्हणजे १९७० साली लव्ह अँड गॉडचं शूटिंग परत सुरू केलं. या वेळी हिरो होता संजीवकुमार. हिरॉईन परत निम्मीच होती.

गुजराती नाटकांच्यामधून आलेला हरिभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार एक तयारीचा अभिनेता होता.

आपल्या कलेवर त्याची जबरदस्त पकड होती. मुंबईत छोटे मोठे साईड रोल करता करता आता स्वतःच्या जीवावर सिनेमा चालवावा एवढा तो मोठा झाला होता.

असिफने त्यांच्यातील टॅलेंट हेरलं होतं. संजीव कुमार, निम्मी, प्राण यांना घेऊन त्याने परत सिनेमाचं शुटिंग सुरू केलं. गुरुदत्त चे सगळे सिन परत शूट केले.

पण लव्ह अँड गॉडच दुर्दैव परत आड आलं,

यावेळी सिनेमाचा दिग्दर्शक के असिफ याच निधन झाल, सिनेमा परत अर्धवट राहिला.

असिफच वय देखील फार जास्त नव्हतं. तो फक्त ४७,४८ वर्षांचा होता. या काळात त्याने फुल, मुघल ए आझम आणि हा अर्धा लव्ह अँड गॉड हा सिनेमा बनवला होता. आपलं स्वप्न, आपला मास्टरपीस निम्म्यावर ठेवून तो जग सोडून निघून गेला.

लव्ह अँड गॉड परत बंद झाला.

के असिफने आयुष्यात तीन लग्ने केली. पहिलं लग्न अख्तर खान म्हणजेच सुपरस्टार दिलीप कुमारची छोटी बहीण हिच्याशी केलेलं. दुसरं लग्न सितारा देवी या सुप्रसिद्ध सिंगरशी केलं, ते फार काळ टिकल नाही मग शेवटी निगार सुलताना या हिरॉईनशी शेवटच लग्न केलं.

असिफच्या मृत्यू नंतर त्याच्या दोन बायका आणि सात आठ मुलं एवढं कुटुंब मागे राहील. यातली त्याची मोठी बायको म्हणजेच अख्तर खान ही सुद्धा महत्वाकांक्षी होती.

तिने आपल्या नवऱ्याचं अधुर स्वप्न म्हणजे लव्ह अँड गॉड पूर्ण करायचा चंग बांधला.

निर्माते दिग्दर्शक के सी बोकडीया यांची मदत घेतली. तिच्या जिद्दीमुळे आणि तिचा भाऊ दिलीपकुमार याच्या आग्रहामुळे सगळे तयार झाले. निम्मीने आता जवळपास पन्नाशी गाठली होती पण तिनेही कंबर कसली.

नव्या दमाने पुन्हा शुटींग सुरू झाली. काही महिने व्यवस्थित शूटिंग चालली पण तेवढ्यात बातमी आली की

सिनेमाचा हिरो संजीव कुमार चा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

तशी त्याची तब्येत काही दिवस झाले नरमच होती. नुकतीच अमेरिकेत त्याच्यावर बायपास सर्जरी झाली होती. यातूनही त्याने शूटिंग सुरू केली होती पण मृत्यूने त्याला गाठलेच. तो गेला तेव्हा त्याच वय ४७ वर्षे होतं.

लव्ह अँड गॉडने आपल्या शूटिंगच्या २२ वर्षांच्या काळात तीन मोठे मृत्यू बघितले.

अख्तर असिफने अखेर हार मानली. जेवढा सिनेमा तयार झाला होता तसा अर्धा कच्चा सिनेमा रिलीज केला. लैला मजनूच्या ट्रॅजेडी पेक्षाही कमनशिबी हा सिनेमा ठरला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.