रात्रभर जागं असणारं गोवा, एका माणसाच्या भितीमुळं संध्याकाळीच चिडीचूप व्हायचं…

ही गोष्ट सुरू होते १९९५ मध्ये. गोव्यात. गोवा हे कित्येकांचं आवडतं ट्रॅव्हल डेस्टिनेशन. इथं लोकं चिल करायला, निवांत राहायला येत असतात. गोव्यातलं वातावरणही मस्त असतं, लोकंही अगदी शांत आणि पार्टी कल्चर एंजॉय करणारी. आत्ताच्या तुलनेनं, ९५ सालातलं गोवा आणखी निवांत असणार.

ना समुद्रकिनाऱ्यावर गर्दी, ना नियमांची शाळा, गोव्याच्या भाषेत सांगायचं झालं, तर सगळं काही ‘सुशेगाद’…

त्याचवेळी गोव्यात एक घटना घडली. एका माणसाला मुलीच्या किडनॅपिंगच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली, पण पुरावे नसल्यामुळं सखोल तपास न करताच सुटकाही केली. पुढं पोलिसांकडून असंही सांगण्यात आलं की, रिक्षावाल्यांनी काढलेल्या मोर्चामुळं आम्ही त्या माणसाला सोडून दिलं. १९९५ मध्ये गायब झालेल्या मुलीचं काय झालं, हे मात्र कुणालाच कळलं नव्हतं.

किडनॅपिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आणि मग सुटलेल्या त्या माणसाचं नाव होतं…

महानंद नाईक.

आता गोष्टीचा दुसरा अंक सुरु होतो, १४ वर्षांनंतर २००९ मध्ये.

आपल्या बायकोच्या मैत्रिणीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी फोंडामधल्या एका माणसाला अटक करण्यात आली. त्याची बायको सरकारी कर्मचारी होती, तिनंच आपल्या नवऱ्याची आणि पीडित महिलेची ओळख करुन दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. पोलिस चौकशीत त्या माणसानं कबूल केलं, की ‘मागच्या पंधरा वर्षात मी ५ बायकांचे खून केले.’

तपासात पुढं आलं की, या माणसानं अपहरण आणि खुनाचं पहिलं प्रकरण १९९४ मध्ये केलेलं आणि दुसरं १९९५ मध्ये.

या माणसाचं नाव होतं… महानंद नाईक.

लिंक लागली नसेल तर सांगतो, १९९५ मध्ये किडनॅपिंगच्या केसमधून सुटलेला… हाच तो महानंद नाईक.

पोलिसांनी पकडल्यावर त्यानं धडाधडा आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आणि समोर आलं, की महानंद नाईकनं पाच नाही, तर १६ महिलांची हत्त्या केलीये आणि बलात्कारही. हा साधासुधा माणूस नाही, तर थंड डोक्याचा सिरीयल किलर आहे. ही बातमी जशी गावात पसरली, तसं चिडलेल्या लोकांनी त्याचं घर जाळून टाकलं.

पण महानंद नाईकनं या महिलांना कसं मारलं? का मारलं? कधी मारलं?

नाईक उजेडात आला होता, बलात्काराच्या केसमुळं. पण पहिला गुन्हा उघड झाला तो १९९५ चा वासंती गावडे किडनॅपिंग केस. झालं असं होतं की, वासंती आणि नाईकचे प्रेमसंबंध जुळले. त्यानं तिला लग्नाचं अमिष दाखवलं. वासंती अनाथ होती आणि आपल्या नातेवाईकांसोबत राहायची.

नाईकनं एकदा तिला ‘माझ्या घरच्यांना भेटायला जायचंय. छान आवरुन, दागिने घालून आणि बँकेचं पासबुक घेऊन ये,’ असं सांगितलं. वासंती जाताना आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन गेली. मात्र नाईकनं तिला बँकेत नेण्याच्या नावाखाली एका निर्जन स्थळी नेलं.

तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढले, तिचे कपडे काढले, तिच्याच ओढणीनं तिचा गळा दाबला आणि चेहरा विद्रुप करुन, तिचा मृतदेह तिकडेच टाकून नाईक पसार झाला. ओढणीनं गळा दाबण्याचा त्याच्या या पद्धतीमुळं नाईकला नाव मिळालं…

दुपट्टा किलर.

पोलिसांना त्यानंच दिलेल्या माहितीनुसार, नाईकनं वासंती गावडेला मारण्याच्या आधीही दोन खून केले होते. २५ ते ३५ वयाच्या मुलींना लग्नाचं वचन द्यायचं, माझ्या घरच्यांची ओळख करुन देतो सांगून दागिने घालून बोलवायचं. दागिन्यांच्या हव्यासापोटी त्यांचाओढणीनं गळा दाबून खून करायचा, मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून कपडे काढायचा, चेहराही विद्रुप करायचा आणि बलात्कार करुन आपली विकृत भूकही भागवायचा.

नाईकनं पोलिसांपुढं अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनीही त्याच्याकडून अनेक गुन्हे उलगडले. त्याला अटक झाल्यानंतर अनेक पालकांनी आपली मुलगी हरवल्याच्या तक्रारी नोंदवल्या. पण अनेक पालक बदनामीच्या भीतीनं पुढे आलेच नाहीत.

२००५ पर्यंत रिक्षा चालवत असलेल्या नाईकनं नंतर रिक्षा चालवणंही बंद केलं. २००७ मध्ये त्यानं ७ महिलांचा खून केला होता. 

अंगावरचं सोनं तो सोनाराला विकायचा आणि त्याचे पैसे घरी द्यायचा. गुन्हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं त्याला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, नाईकला पॅरोल मिळणार असल्याचं जाहीर झालं तेव्हा, गोव्यातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा ज्या पीडितेमुळं दाखल झाला, तिच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे,

त्या पीडितेनं नाईक आपल्याला जेलमधून मेसेज पाठवून त्रास देतो असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. तो तिला मेसेजवर, सतत ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, जेलमधून सुटल्यावर लग्न करू,’ हीच गोष्ट सांगायचा.

या सगळ्या प्रकरणात लोकांनी नाईकच्या बायकोवरही आरोप केले होते

बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांनी नाईकच्या बायकोनेच हा आपला नवरा असल्याचं लपवत दोघांची ओळख करुन दिली, असा आरोप केला होता.

विशेष म्हणजे या दोघांची भेट, दोघंही तुरुंगात असताना झाली होती. 

तिथूनच मग प्रेम फुललं. पूजा नाईकनं आपण कुठल्या गुन्ह्यात आत होतो हे मात्र सांगितलं नाही. ती माध्यमांशी बोलताना म्हणाली, “मला वाटत नाही माझा नवरा असं काही करेल. तो साध्या मुंगीलाही मारणारा नाही. जर तो खरंच दोषी असेल तर मी घटस्फोट देईल. दोषी असला तर त्याला फाशी द्यावी.”

पूजा नाईकच्या मते मुंगीही न मारु शकणार तिचा नवरा १६ जणींचा खून पचवून बसला होता. त्याला २००९ मध्ये अटक झाली, तेव्हा परिस्थिती अशी होती की नुसतं महानंद नाव घेतलं, तरी लोकं घराची दारं बंद करायची आणि गोव्यातल्या मुली ओळखीच्या लोकांशी बोलतानाही घाबरायच्या…

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. Djdh says

    Murder 2 chi story khaki ahe ka govyamadhali yavar ekhada blog liha

Leave A Reply

Your email address will not be published.