मोहाची दारू भले बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक वाईन म्हणतात

गेल्या आठवड्यापासून आपल्या राज्यात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार. आता हा निर्णय प्रत्यक्षात यायला अजून किती वेळ लागणार हे अजून तरी निश्चित नाही. जेव्हापासून राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तेंव्हापासून राज्यात टीका-टिपण्या, आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. तर काहींनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. 

दरम्यान, या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाईनप्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन आणि मोहाच्या फुलांची वाईन विकण्यासाठी मॉल व किराणा दुकानांमध्ये परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. 

सदाभाऊ खोत यांनी मागणीसाठी काढलेले पत्रक खाली दिले आहे, 

ecea2f446d38fb678d2a3f4f57b3796f originalखोत यांनी या पत्रात म्हणल्याप्रमाणे, गुळ व्यवसाय मोठ्या अडचणीत आहे, जर का गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला परवानगी दिली तर गुळ उत्पादक शेतकर्‍यांसाठी चांगले दिवस येतील. तसेच आदिवासी शेतकऱ्यांनाही आपणास न्याय द्यावा लागेल.  मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्याच्या विक्रीला परवानगी द्यावी, असे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

छोट्या-मोठ्या मद्यनिर्मिती करणाऱ्या ग्रामीण भागातील पारंपारिक मद्य निर्मात्यांना आर्थिक बळकटी मिळावी, म्हणून मोहफुलांच्या दारूला देखील परवानगी द्यावी अशी जी मागणी त्यांनी केली आहे ते म्हणजे अगदीच महत्वाची मागणी आहे…

अगदी जेंव्हा लॉकडाऊन चा काळ चालू होता आणि मद्यप्रेमींनी वाईनशॉप बंद असल्या कारणाने मोठी अडचण निर्माण झाली होती. आणि नेमकं मद्यप्रेमींना मोहाच्या फुलांची भुरळ पडली होती. व्हिस्की नको, रम नको, बियर तर नकोच नको पण मोहाची हवी असं म्हणत अचानक मोहाच्या दारूची मागणी वाढली होती. वाढत्या मागणीमुळे दोनशे रूपयांची बाटली एक-दीड हजाराला विकली जात होती.  इतकंच नाही तर मोहाच्या दारूसाठी पुण्या-मुंबईतील मद्यप्रेमींनी लॉकडाउन असतानाही अकोल्यासारख्या दुर्गम भागात चकरा सुरू केल्या होत्या.

पण २०२० मध्येच दिल्ली सरकारने जाहीर केलं होतं कि,  सरकारच आता ‘मोहाची दारू’ बाजारात लाँच करणार

साधं आहे दारूच्या विक्रीतून मिळणाऱ्या टॅक्सद्वारे कोणत्याही राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो. पण सरकारच दारू बाजारात आणणार आहे असं म्हटलं जात होतं. तसेच या पेयाच्या निर्मितीसाठी महामंडळानं राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेशी करार केला अशी माहिती मिळते. त्यासाठी या पेयाच्या निर्मितीचं तंत्रज्ञानही दिलं जाणार आहे असं मागील वर्षी सांगण्यात येत होतं.

भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या साह्याने आयआयटी-दिल्लीने दोन वर्षांच्या संशोधनानंतर या पेयाची निर्मिती केली जाणार आणि पेयासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर दिल्लीतील पाच ठिकाणी हे पेय विकले जाणार असं २०२० पासून सांगण्यात येतंय. शिवाय त्या दारूच्या बॉटलची किंमत ७५० एमएलच्या बॉटलसाठी ७५० रूपये इतकी ठरली होती आणि या दारूचं नाव देखील ठरलं होतं ते म्हणजे ‘महुआ न्युट्रिबेव्हरेज’ !  या मोहाच्या दारूत अल्कोहोलचे प्रमाण ५ टक्क्यांच्या आसपास असेल, तसेच यात पोषण तत्वे असतात, असा दावा केला जातो. 

या आधी देखील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले नेते अन् कीर्तनकार ह.भ.प. बबनराव पाचपुते हे जेंव्हा महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री झाले होते तेंव्हा त्यांनी आदिवासी भागातून ५० हजार टन मोहफुले गोळा करून त्याची दारू (‘हर्बल लिकर’) बनविण्याची मोठी योजना आखली होती तेंव्हा त्यांच्या वर टीका झालेली कि, आदिवासींची निरक्षरता, अंधश्रद्धा, गरीबी, दारूचे व्यसन, नक्षलवाद, कुपोषण, बालमृत्यू, भ्रष्टाचार, जंगलावरील अधिकार, आरोग्यसेवा व आश्रमशाळांची वाईट अवस्था, हे सर्व प्रश्न न दिसता फक्त मोहाच्या दारूचाच मुद्दा का बरं दिसला असो..कायम चर्चेत येणारी हि मोहाची दारू अन हे मोहफुले कशी असतात ?

पण ज्याच्यापासून मोहाची दारू बनवली जाते ती मोहफुले काय असतात ?

मोह नावाचे झाड जे आदिवासी भागात, रानावनात दिसून येते. महाराष्ट्रात काही ठिकाणी याला शेळवट म्हणतात तर काही ठिकाणी याच्या फळाची भाजी करतात, ही फळे भेकरासारखी दिसतात म्हणून याला भोकर, भोकूर म्हणतात. मोहवा, मोहव्रा, मोहा असं देखील याला नावं आहेत. कुठं काहीही म्हणत असतील पण खरं तर हि मोहफुले च !

खरं तर आदिवासी जमातीसाठी हे सोनं मानलं जातं. कारण हि मोहफुले आदिवासींच्या कमाईचे साधन मानले जाते. काही आदिवासी जमाती तर मोहाच्या झाडांना देवच मानतात.  तसेच या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासी जमातींचे सण मोहाच्या दारूशिवाय पूर्ण होत नाहीत. या झाडाला दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुले येऊ लागतात. याचा हंगाम म्हणजे होळी सण साजरा करून झाला कि आदिवासी जमातीचे लोकं पहाटच्या वेळेला रानावनात जाऊन हि फुले गोळा करायला सुरुवात करतात. हि फुलं तोडून आणली कि, वाळवून, साठवून ठेवतात आणि गरजेनुसार ती बाजारात विकली जातात. 

पण हि हातभट्टीची मोहाची दारू कशी बनवली जाते ? नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातील एका आदिवासी भिडूने नाव न सांगण्याच्या अटीवर हातभट्टीची रेसिपी सांगीतली, 

“हातभट्टीच्या दारूला २ किलो गूळ आणि २ किलो मोह लागतो. या ४ किलोच्या प्रमाणासाठी ५ रुपयाची तुरटी. यापासून दारू बनवण्यासाठी एक मोठा पिप्पा (पिंप) लागतो. तसेच वेळूच्या झाडाचा एक पाईप लागतो. हि दारू बनवण्यासाठी २ घंटे विस्तु लावल्याच्या नंतर त्यातून १ लिटर दारू तयार होते. मोहापासून बनवलेल्या या अगदी स्ट्रॉंग दारूत एक कळशी पाणी टाकल्यावर ती दारू होते राशीची म्हणजेच पिण्यायोग्य होते. एका भट्टीमध्ये एकच लिटर दारू बनते”. 

यापासून दारू बनते इतकंच आपल्यातल्या काही जणांना माहिती असेल पण हे देखील माहिती असू द्या कि, या मोहाच्या फुलांपासून दारू सोडून इतर औषधी देखील बनवल्या जातात.

दारु ही आपल्या आरोग्याला कितीही घातक असली तरी ह्या मोहाच्या फुलांपासून दारु बनवतात जितकं खरं आहे तितकंच खरंय कि, हे मद्यार्क काही औषधांमधे वापरतात. तसेच या मद्यार्काचा इंधन म्हणून वापर करण्यावर संशोधन चालू आहे. मोह हे अत्यंत उपयुक्त झाड असून या झाडाची साल, पाने, फुले आणि बिया असे सर्वच भाग औषधी म्हणून वापरली जातात. सालीचा काढा खरुज, हिरड्‌यांमधून रक्त येणे आणि क्षत बरे करण्यासाठी लवले जाते. मधुमेहात ते सेवन केलं जातं. फुलापासून तयार कलेले स्पिरिट शक्तिवर्धक व पोषक समजण्यात येते. फुले काही प्रकारच्या जीवाणू विरोधी गुणधर्मांनी युक्त असल्याचे समजण्यात येते.

मोहाची फुले कच्ची किंवा शिजवून खाण्यात येतात. त्यांचा जास्त वापर केल्यास दुष्परिणाम होतात. अल्कोहोल, सिकरा, सरबते, मुरंबा वगैरे तयार करण्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. मोहाच्या फुलात साखर, व्हिटॅमिन व कॅल्शिअम खूप असते. टॅनिन, कातडी कमावणे तसेच जखमा लवकर भरून येण्यासाठी या झाडाच्या सालीचा उपयोग केला जातो. ही फुले भातात शिजवून तो भात मिष्टान्न म्हणून खाण्याची प्रथा आहे .मोहाच्या बिया घाण्यामध्ये टाकून तेल काढले जाते. आदिवासी भागातील बहुतेक लोक या तेलाचा वापर खाण्यासाठी करतात. साबण तयार करण्यात, स्वयंपाक वगैरेत मोहाचे तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मोहाची पेंड खत म्हणून वापरण्यात येते. तसेच ते पाळीव जनावरांना खाऊ घालतात. 

मोहाच्या फुलात साखर, व्हिटॅमिन व कॅल्शिअम खूप असते. ही फुले भातात शिजवून तो भात मिष्टान्न म्हणून खाण्याची प्रथा आहे .मोहाच्या बिया घाण्यामध्ये टाकून तेल काढले जाते. आदिवासी भागातील बहुतेक लोक या तेलाचा वापर खाण्यासाठी करतात.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.