ममता दीदींचा राजकीय इतिहास पाहता, दीदींसाठी ‘दिल्ली अभि भी बहोत दूर है’

देशाचं नेतृत्व करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या इच्छुक उमेदवार आहेत. त्याप्रमाणे त्यांचे देशभरात दौरे देखील सुरु आहेत. त्यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची भेट घेतली. हारतुरे, साभार आभार स्वीकारले. भाजपविरोधी एकजूट करण्याची गरज ही त्यांनी नेत्यांकडे बोलून दाखवली. लढायचं असं ठरवलं. पण

काँग्रेस शिवाय…

मग काय. आजच्या सामनाच्या संपादकीय मधून ममता बॅनर्जी यांच्यावरच निशाणा साधत दे धक्का देण्यात आला आहे. सामना मध्ये म्हंटल्याप्रमाणे,

काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. २०२४ साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही.

ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.

काँग्रेसची पडझड होतेच आहे पण यातून हात धुऊन घेताना ममता दीदी दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सिब्त अली सबा यांच्या चार ओळी आठवतात,

दीवार क्या गिरी मिरे
खस्ता मकान की
लोगों ने मेरे सेहन में
रस्ते बना लिए

आता सगळा सीन सांगायचा झाला ना तर, संपूर्ण पार्श्वभूमी बघावी लागेल.

तर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसमुळे रिक्त झालेली राष्ट्रीय पक्षाच्या जागेची जाहिरात देशाच्या राजकारणात दिसू लागली. मग यात अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत सर्वजण पुढे आले. रिक्त जागेवर भरती करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेऊन अर्ज भरायला सुरुवात केली.

पण खरं सांगायला गेलं ना तर स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे काँग्रेसची मूळ इमेज राष्ट्रीयच राहिली आहे. त्याची जागा इतर पक्षांनी घेणं संयुक्तिक वाटतच नाही. म्हणजे केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष शहरी मध्यमवर्गाच्या सार्वजनिक सोयीपुरता मर्यादित आहे. त्यांची भ्रष्टाचारविरोधी चळवळही लाच घेणे पाप आहे या मुद्द्यावरच संपते.

तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीने केंद्रातील सत्तेचा मुकाबला केला, त्यामुळे त्यांची प्रतिमा बंगालमध्ये उंचावली आहे. पण बंगालच्या विजयानंतर भाजप आणि काँग्रेसी नेते ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत आहेत, त्यावरून तरी असं दिसत की ही समांतर राजकारणाची सुरुवात नसून हा तर पर्याय आहे.

म्हणजे कसं ?

तर आपल्या मजबूत अशा राजकीय अस्तित्वावर ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या विजयाने शिक्कामोर्तब केला आहे. बंगालच्या विजयाचे वर्णन देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरले. पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले गेले. साहजिकच त्यांच्या राजकीय अपेक्षांना पंख फुटले.

त्यामुळेच तर तृणमूलने गोव्यापासून मेघालय त्रिपुरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

कालपर्यंत ममता बॅनर्जी सोनिया गांधींना भेटत होत्या. आणि आज त्या सोनिया गांधींचंच नेतृत्व नाकारतायत. काँग्रेस नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. तृणमूलच्या वतीने प्रशांत किशोर काँग्रेस आणि राहुल गांधींना नाकारतायत.

तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्याच अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे.

काँग्रेसला फक्त तृणमूलनेच नाकारलंय असं नाही, तर आप ने सुद्धा याआधी चाचपणी केली होती.

तृणमूलपूर्वी आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपला ‘आप’ पर्याय असल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय मुद्दे मांडून आम आदमी पक्ष राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ अशी इमेज घेऊन आला होता. देशातल्या अनेक जागांवर त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा पंजाबमध्ये त्यांना फक्त चारच जागा जिंकता आल्या. केजरीवाल स्वतः निवडणूक हरले होते. तर दुसरीकडे दिल्लीतील विजयानंतर ही उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाला वाईटरित्या नाकारण्यात आले.

ममता बॅनर्जी जर स्वतःला काँग्रेसचा पर्याय मानत असतील तर त्या अनुषंगाने त्या राजकीय गणित मांडतील. पण पुन्हा आणि त्याच गणितासाठी त्यांना काँग्रेस आणि त्यांची पुढे जाण्याची धोरण हवी असतील.

एक काळ असा होता जेव्हा लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, मायावती ते शरद पवार हे पंतप्रधानपदाचे चेहरे म्हणून पुढे आणले गेले. कारण त्यांनी आपापल्या राज्यात काँग्रेस आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांशी स्पर्धा केली होती. बसपाने तर अनेक राज्यांत आपले उमेदवार उभे करून राष्ट्रीय पक्षाचा टॅग देखील मिळवला होता. पण आज उत्तर प्रदेशात म्हणजे स्वतःच्या राज्यातच बसपा गेमच्या बाहेर आहे.

भाजप, काँग्रेस आणि डावे यांच्याशिवाय कोणताही राष्ट्रीय इमेज असलेला पक्ष नाही.

भाजपने हिंदुत्वाच्या नावाखाली राष्ट्रीय स्तरावर आपली इमेज तर तयार केली आहे. पण हिंदुत्वाच्या एका विशिष्ट चौकटीमुळे आजही ते दक्षिण भारतात नीट एन्ट्री मारू शकलेले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यलढ्यामुळे काँग्रेसला सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालय. वसाहती काळापासून स्थापन झालेल्या या पक्षाला भारतीय राजकारणातील सर्वात मोठा इतिहास लाभला आहे.

२०१४ मध्ये भाजपच्या विजयानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली होती. भाजपशी निगडित विचारवंतही स्वातंत्र्यलढ्याची पुनर्व्याख्या करत होते. अजूनही काँग्रेसची मक्तेदारी नाकारून पर्यायी इतिहास घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तर यात ममता बॅनर्जी पण मागे नाहीत.

काँग्रेसच्या काळात विविधतेत एकता, सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचे उदात्तीकरण केल्याचा दावाही ममता बॅनर्जी करतात. पण त्याच बरोबर त्यांना हे पण माहीत आहे की राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या विरोधात येण्यासाठी त्यांना त्यांची इमेज थोडी का होईना काँग्रेससारखी बनवावीच लागेल.

मग आता त्या महाराष्ट्रात येऊन गेल्या….

कारण महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक पक्ष आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयुक्त ठरतील, अशी आशा ममता दिदींना होती. त्याच अपेक्षेने त्यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. पण या दोन्ही पक्षांचे हात दगडाखाली आहेत. कारण त्याच काँग्रेससोबत ते महाराष्ट्रात सत्तेत आहेत, ज्यांच्या विरोधात ममता दिदींना आघाडी उघडायची आहे.

दिदींच्या या अटी या दोन्ही पक्षांना मान्य होणार नाहीत. कारण त्यांच पहिल प्राधान्य राष्ट्र नाही तर महाराष्ट्राला आहे. काँग्रेसने हात वर केले तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडू शकते. त्यामुळे काँग्रेस सोडून ममतासोबत जाण्याचा विचार देखील शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस करणार नाहीत.

राहता राहिला प्रश्न तृणमूलच्या राष्ट्रीय पक्षाच्या इमेजचा तर

भारतात आजही राष्ट्रीय इमेजचे दोनच संदर्भ येतात. पहिली तर विविधतेतील एकता आणि दुसरी म्हणजे शेतकरी-कामगार, बेरोजगारी, महागाई सारखे संदर्भ. काँग्रेसने आणलेल्या नवउदारवादी धोरणाचे पहिले बळी तर शेतकरी, मजूर आणि गरीब झाले. या जनविरोधी धोरणांमुळे भ्रष्टाचाराचा सारा प्रकार झाला आणि काँग्रेस बदनाम झाली. काँग्रेसच्या विरोधात पर्याय त्याच लोकांनी आणला होता ज्यांना वाटत होते की आपल्याकडे गमावण्यासारखं काही उरणार नाही.

पण आप असो किंवा मग तृणमूल त्यांना बरंच काही गमावण्याची भीती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नायक निर्माण करण्यापेक्षा सामान्य पर्यायी राजकारणाची सध्या गरज आहे.

हे हि वाच भिडू :

English summary: Mamata Banerjee has a long way to go to establish herself in national politics. Mamata Banerjee has to rise her as a strong alternative.

 

web title: Mamata Banerjee has to take a lot of efforts to establish her in national politics

Leave A Reply

Your email address will not be published.