लोहियांनी खासदार बनवलेला नेता, रेल्वेच्या फरशीवर बसून दिल्लीत पोहोचला! 

भारतीय राजकारणात एक काळ होता, जेव्हा राजकारण तत्वांसाठी केलं जायचं. त्यासाठी प्रसंगी राजकीय फायद्या-तोट्याची गणितं बाजूला ठेवली जायची. तत्वांसाठी राजकीयदृष्ट्या तोट्याचा ठरणारा कुठलाही निर्णय घेताना देखील राजकारणी कचरायचे नाहीत. तो एक वेगळा काळ होता.

१९५२ साली जेव्हा देशात सर्वप्रथम निवडणुका पार पडल्या.

त्यावेळीच बिहारमधील भागलपूर-पूर्णिया मतदारसंघातून सोशालिस्ट पार्टीकडून किराय मूसहर यांना पक्षाचं तिकीट देताना समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी निवडणुकीच्या आखाड्यात देखील तत्त्वनिष्ठ राजकारण केलं जाऊ शकतं, याचा वास्तुपाठच घालून दिला होता.

किराय मूसहर हे काही राजकीय नेते वैगेरे नव्हते. बिहारच्या कोसीजवळच्या मुरहो गावात दलित समाजात जन्मलेले मूसहर आपल्या रोजच्या पोटा-पाण्यासाठी जमीनदारांच्या जमिनीत मजुरी करत असत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. बाकी पन्नासच्या दशकातल्या बिहारमधील दलितांच्या सामाजिक स्थितीविषयी तर इथं वेगळं काही सांगायलाच नको.

किराय मूसहर याचं शिक्षणही अगदीच जेमतेम. अक्षर ओळखीपुरतं मर्यादित. असं असलं तरी एक उपजतच असलेलं शहाणपण त्यांच्यात होतं. राममनोहर लोहियायांच्या विचारामुळे प्रभावित झाल्याने ते लोहीयांशी जोडले गेले. सोशालिस्ट पार्टीचं काम करायला लागले. अर्थात आर्थिक तंगीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मजुरी देखील सुटली नव्हतीच.

१९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्यावेळी लोहियांनी सोशालिस्ट पार्टीकडून मूसहर यांना उमेदवारी द्यायचं ठरवलं, त्यावेळी देखील ते एका शेतात मजुरी करत होते.

पार्टीतल्या इतर अनेक नेत्यांसाठी लोहीयांचा हा निर्णय केवळ अनपेक्षितच नव्हता , तर धक्कादायक होता.

अनेकांनी तर या निर्णयाविरोधात आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. पण ते लोहीया आणि त्यांची लोकशाही मुल्यांवरील निष्ठाच होती, ज्याआधारे ते आपल्या पक्षातील इतर नेत्यांना मुहसर यांच्या नावावर राजी करू शकले.

निर्णयामागे लोहीयांची अशी भूमिका होती की,

निवडणुका फक्त जिंकण्यासाठीच लढायच्या हे धेय्य समोर ठेऊन राजकारण करता कामा नये.समाजातल्या शोषित आणि वंचितांच्या सामाजिक स्थितीत काही एक बदल घडवून आणायचा असेल तर त्यांना पुरेसं राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्याशिवाय भारतीय लोकशाही देखील सशक्त होऊ शकणार नाही.

खुद्द मुसहर यांना देखील असं काही होईल, असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्यामुळेच आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते लोहीयांना भेटायला गेले आणि म्हणाले,

“डॉक्टरसाहेब मला २ वेळा कुटुंबांची गुजराण करण्यात अडचणी आहेत, त्यामुळे कृपया निवडणूक लढवायला लावून माझ्या अडचणी अजून वाढवू नकात”

मुसहर यांच्या या प्रश्नावरचं डॉ.लोहियांचं उत्तर महत्वाचं होतं. त्यांची भूमिका अधिक स्पष्ट करणारं होतं. डॉ.लोहिया म्हणाले,

“कित्येक वर्षांच्या गुलामीनंतर देशात निवडणुका होताहेत. अशा स्थितीत समाजवादासाठी मी तुमचा बळी देतोय असं समजा. निवडणुकीत जर तुम्ही विजयी झालात, तर शोषित-वंचितांच्या राजकीय प्रक्रियेतील सहभागाचा संदेश बिहारच्या गल्लीबोळातून देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि जरी तुम्ही हरलात तरी या घटनेची देशभरात चर्चा होईल.

या निर्णयाचे २ परिणाम मला सुस्पष्टपणे दिसताहेत. पहिला असा की या निर्णयामुळे सरंजामी वृत्तीचे लोक सोशालिस्ट पार्टीपासून दुरावले जातील. पण त्याचवेळी सोशालिस्ट पार्टी देशातील सामन्यांचा पक्ष म्हणून उदयास येईल. यातला दुसरा परिणाम मला अधिक प्रिय आहे.”

निवडणुका पार पडल्या आणि किराय मूसहर निवडून देखील आले. समाजाच्या शोषित-वंचित घटकातून आलेल्या मूसहर यांना लोहियांनी खासदार बनवलं. देशात लोकशाही व्यवस्था रुजविण्यासाठी आणि वंचितांचा राजकीय सहभाग वाढविण्यासाठी लोहियांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेनं मान्यतेची मोहर उमटविली.

लोकसभेचे खासदार म्हणून ज्यावेळी मूसहर दिल्लीला जायला निघाले त्यावेळी ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण पार्टीने त्यांच्या तिकीटाची व्यवस्था केली. 

ते ज्यावेळी ट्रेनमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांना उच्चवर्णीयांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे व्यथित झालेले मूसहर तिकीट काढलेल्या आपल्या सीटवर देखील बसू शकले नाहीत.

बिहारमधून दिल्लीपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी ट्रेनच्या फरशीवर बसून पूर्ण केला. या प्रकरणाची माहिती खुद्द लोहीयांनीच मूसहर यांच्या मृत्यूनंतर संसदेत बोलताना दिली होती.

संसद सदस्य म्हणून काम करत असताना एकदा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विचारलं की,

“तुमच्या मतदारसंघात काही अडचणी आहेत का..?”

नेहरूंच्या या प्रश्नावर उत्तर देताना मूसहर यांनी सांगितलं की,

“आमच्या भागात अजूनही दलितांना त्याच ठिकाणचं पाणी प्यावं लागतं, जिथलं पाणी कुत्रे आणि डुकरं पितात.”

असं सांगितलं जातं की पुढे चालून बिहारमध्ये जो कोसी प्रकल्प सुरु करण्यात आला, त्याची कल्पना नेहरूंना मूसहर यांच्या या हृद्यद्रावक प्रतिक्रियेनंतरच सुचली आणि तो प्रकल्प हाती घेण्यात आला.

ऑगस्ट १९६५ साली दीर्घ आजाराने त्याचं निधन झालं. अतिशय गरिबीत राजकारणात आलेल्या  मूसहर यांनी खासदार झाल्यानंतर देखील कुठलीही धन-संपत्ती गोळा केली नाही. जे काही जवळ होतं, ते शोषितांसाठी लढण्यात खर्ची झालं.

शोषित आणि वंचितांसाठी झटणाऱ्या आपल्या या ‘साथी’स डॉ. लोहिया जन्मजात समाजवादी म्हणत असत.

पैसे जमवणं तर सोडाच त्यांनी आपला राजकीय वारसा देखील तयार केला नाही. त्यामुळे आज बिहारच्या राजकारणात त्यांचं नाव देखील बघायला मिळत नाही, ही एक राजकीय शोकांतिकाच. आजही त्याचं कुटुंब आर्थिक विपन्नावस्थेतच आपलं जीवन व्यतीत करत आहे.

हे ही वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.