तेलंगणा गाजवणारं महाराष्ट्रीयन नाव IPS महेश भागवत

भारतासारख्या महाकाय देशावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी एक नोकरशाहीच्या माध्यमातून एक सनदी अधिकाऱ्यांची साखळी तयार केली त्यालाच आपण “स्टील फ्रेम” असा शब्द वापरतो. या स्टील फ्रेमच्या भारतीय पोलीस सेवेमध्ये एक असं महाराष्ट्रीयन नाव आहे की ज्या नावाची चर्चा देशभर होत आलेली आहे आणि होत आहे, त्याच कारण म्हणजे त्यांनी संपूर्ण पोलीस सेवेत केलेलं आणि चालू असलेलं त्यांचं काम…

महेश भागवत अस त्यांच नाव. 

महेश भागवत हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील आहेत. पाथर्डीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं प्राथमिक आणि आणि तिलोक जैन विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केले. शिक्षण तर पूर्ण झाले, आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांच पडतो तसा त्यांनाही पडला होता.

आपल्या आवडीच्या क्षेत्राचा उपयोग भविष्यात होऊन व्यक्तिमत्त्व विकासाला उपयोग होईल या विचारातून त्यांनी इंजिनिअरिंग सुरू असतानाच अनेक प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांमध्ये समाजकार्याला सुरुवात केली होती, यामध्ये पाणी पंचायतीचे विलासराव साळुंखे, जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, मेधा पाटकर, मोहन धारिया अश्या लोकांच्या संस्थाचां समावेश होता. या लोकांच्या संस्थाबरोबर त्यांनी पाणलोट क्षेत्र, पश्चिम घाट विकास योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, नर्मदा बचाव मोहीम, ग्रामीण विकास या क्षेत्रात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या स्वीकारत अनेक प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले.

या लोकांचा, संस्थांचा आणि केलेल्या कामांचा फायदा त्यांना समाज, समस्या, व्यवस्था हे सर्व समजून घेण्यासाठी झाला आणि एक कार्यकर्ता म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व विकसित झाले.

हे १९९० ते १९९३ च्या दरम्यान समाजकार्य सुरू असताना नोकरी व पुढील भविष्याची चिंता तर होतीच. त्यावर उपाय म्हणून काही काळ टेल्को कंपनीत नोकरी स्वीकारली पण थोड्याच काळात नोकरीचा राजीनामा दिला आणि यूपीएससीच्या अभ्यासाला सुरवात केली. SIAC मुंबई आणि इतर लोकांच्या मार्गदर्शनाखाली यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात ते भारतीय पोलीस सेवेसाठी निवडले गेले.

पोलीस क्षेत्राच्या नकारात्मक प्रतिमेमुळे सुरवातीला ते स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यासाठी परत यूपीएससी दिली परंतु त्यात यश मिळाले नाही. दरम्यान किरण बेदी, ज्युलिओ रिबेरो यांसारख्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी १९९६ साली पोलीस सेवेत जाण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला.

हैदराबाद येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मणिपूर-त्रिपुरा केडरमध्ये इंफाळला सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली. त्यानंतर त्यांना आंध्रप्रदेश केडरमध्ये नियुक्ती देण्यात आली आणि येथूनच त्यांच्यातील कार्यकर्ता अधिकारी जागा झाला आणि महेश भागवत नावाच्या अधिकाऱ्याच्या डोक्यातील परिवर्तनाच्या कल्पनांना नवी पालवी फुटली.

आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद येथे SP म्हणून नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त असणारा हा भाग, येथील चार वर्षाच्या काळात १४५ नक्षलवादी शरण आले तेही कोणत्याही दंडुकशाही शिवाय. या काळात एकसुध्दा पोलीस नक्षलवादी मोहिमेत शहीद झाला नाही हे आतापर्यंतच्या नक्षलवादी मोहिमेतील सर्वात मोठं यश होतं. नक्षलवाद भागात सवांदाच्या रुपात विश्वास निर्माण करणं, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणं, तिथल्या संस्कृती आणि परंपरा याच्याशी समरस होत त्या लोकांना आयुष्याच्या नव्या रस्त्यावर घेऊन येत आपलेपणचा सेतू त्यांच्याशी जोडून त्यांच्यातला माणूस जिवंत करण्याचं काम महेश भागवत यांनी केलं.

या कामांमुळे आंध्रप्रदेश पोलिसांच्या आत्मविश्वास कक्षा प्रचंड वेगाने रुंदावत होत्या.

सामाजिक भान आणि मनात जिवंत असणारा कार्यकर्ता या बळावर भागवत यांनी अश्या कामाला सुरुवात केली की ज्यामुळे भारताचं व जगाच्या पोलीस क्षेत्राचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. समाजाच्या नजरेला नवी दृष्टी देणारं हे काम म्हणजे ह्यूमन ट्राफिकींगची सायकल थांबविण्याचे. नलगोंडा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख असताना वेश्या व्यवसायातील महिला आणि त्यांच्या मुलांचे पुनवर्सनाचा प्रयोग “आसरा” या नावाने जगभर गाजला आणि स्वीकारला गेला.

जिल्ह्यातील सर्व प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था यांना एकत्र करत वेश्या व्यवसायातील अनेक महिलांना जीवनाची नवी दिशा दाखवली. त्यांच्या मुलांसाठी शाळा उघडल्या गेल्या, शेकडो महिलांना बचतगटाच्या माध्यमातून व्यावसायिक स्वरूप दिलं गेलं, तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केलं गेलं. वेश्या व्यवसायातून अनेक महिला बाहेर पडून नव्या आयुष्याची सुरवात करू लागल्या. ह्यूमन ट्रॅफिकमधील साखळीला मोठं खिंडार पडून नलगोंडा जिल्ह्याच्या मार्गक्रमणाचा नवा रस्ता निर्माण झाला.

ह्यूमन ट्रॅफिकींगच्या क्षेत्रात महेश भागवत यांनी जवळपास तेरा वर्षे अभ्यास केला, काम केलं, भारताला उज्वल महासत्तेची स्वप्नं दाखवणारे तक्तालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी महेश भागवत यांच प्रत्यक्ष भेटून कौतुक केलं.

Trafficking In Person Report Hero, Human Right Protection Award, International Police Association अश्या अनेक पुरस्कारांनी महेश भागवत यांना आणि त्यांच्या Human Trafficking मधील अतुलनीय कार्याला जगभरातून गौरविण्यात आले. जगातील शंभर मान्यवर लोकांमध्ये समावेश करण्यात आला, भारतीय राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक इत्यादी पुरस्काराने आंध्रप्रदेश व भारत सरकारने त्यांचा गौरव केला.

हे सर्व होत असताना भारताबरोबरच महाराष्ट्राच्या अभिमानाची पताका उत्तुंग फडकत होती. सामान्य जनतेच्या मनात पोलीस प्रतिमा बदलणं हेच कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचे सेवेचं सर्वात मोठं यश असतं..नेमकं हेच काम भागवत यांच्या रूपाने आंध्रवासीय अनुभवत होते. या सर्व कामात आंध्रप्रदेश सरकार आणि पोलीस त्यांच्या पाठीशी उभे होते.

त्यानंतर एलुरु, कडप्पा इत्यादी ठिकाणी काम करताना अनेक कल्पनांचा उदय भागवत यांच्या अभ्यासातून बाहेर पडत होता. त्यामध्ये “प्रजादरबार, मी कोसम्” अशा योजनांचा समावेश होता. देशतील युवकांना यूपीएससीचे मार्गदर्शन देण्यासाठी ते कधीही हजर असतात. पोलीस सेवेला मानवी चेहरा देण्याचं, माती, संस्कृती, परंपरा यांच्याशी समरस होत सामान्य जनतेला पोषक वातावरण निर्माण करणं हे काम महेश भागवत आजही करत आहेत.

बाहुबलीमध्ये चित्रपटाच्या आधी त्यांच्या नावाचे धन्यवाद येतात, IPL २०१९ अंतिम सामन्याची सुरक्षा जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाते, असं बरंच काही आहे..तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यावर त्यांना IGP – Security हे महत्वाचे पद देण्यात आले, तेही त्यांनी  कार्यक्षमतेने सांभाळले, त्यानंतर सायबराबादचे पोलीस आयुक्त आणि सध्या राचकोंडा या शहराचे पोलिस आयुक्त म्हणून ते काम पाहत आहेत.

जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश या उक्तीप्रमाणे महेश भागवत यांची पोलीस सेवा सूरु आहे. यांच्यासारख्या लोकांमुळे समाज भक्कमपणे उभा आहे आणि परिवर्तनाची आशा जिवंत ठेवतो आहे. भारतच्या स्टील फ्रेममधील आयडॉल म्हणून भागवत सरांचं नाव आदराने घेतलं जातं.

ही माणसं कॉमन मॅनच्या उद्याविषयीची सकारात्मकता जिवंत ठेवतात. युवकांना प्रेरक ठरतात..महाराष्ट्राच्या मातीची मान देशात आणि जगात अभिमानाने उंचवणाऱ्या लोकांमध्ये महेश भागवत यांच नाव आदराने घेतलं जातं. तेलंगणा सारख्या राज्यात आपल्या कामामुळेच ते प्रचंड लोकप्रिय आहेत. एका भूमीपुत्राप्रमाणे तेलंगणाचे नागरिक त्यांच्यावर प्रेम करतात म्हणूनच वाटतं ते राजकारणात असते तर ते आज तेलंगणाचे मुख्यमंत्री देखील झाले असते.

 •  भिडू संदिप तिकटे. 

हे ही वाच भिडू.

2 Comments
 1. V B Khedkar says

  I am from Pathardi .It would have been better if his parents name was there.

 2. श्री सोमनाथ अरुण बुगड. says

  मा.श्री महेश मुरलीधर भागवत साहेब.
  सलाम तुमच्या कार्यास..!
  आम्हांंला आपला सार्थ अभिमान वाटतो !!

Leave A Reply

Your email address will not be published.