ज्या माकडामुळे मराठवाड्यात गॅंगवॉर चालू झालं त्याला शेवटी अटक झालीच !

हेडलाईन वाचून तुम्हाला वाटत असेल कदाचित आम्ही पुणे-मुंबईच्या कोणत्या टोळीच्या गॅंगवॉर बद्दल बोलतोय, तर असं काहीही नाहीये तर मराठवाड्यात एक आगळा वेगळा गॅंगवॉर चालू झालाय.  जे गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चेत आहे. माकडांचं आणि कुत्र्यांचं युद्ध…होय, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये कुत्र्यांच्या आणि माकडांच्या दहशतीने कहर केला आहे.

तेथील गावकऱ्यांचं जिणं हराम केलेल्या या आणि जवळपास २५० कुत्र्यांना मारणाऱ्या दोन माकडांना वन विभागाने पकडले आहे. 

या विचित्र घटनेत, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या माजलगावात सुमारे २५० कुत्रे मारल्याच्या आरोपात दोन माकडांना पकडण्यात आले आहे. या माकडांना  अटक करून जवळच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.

या टोळी युद्धाची सुरुवात नेमकी कधी झाली ???

माजलगाव तालुक्यातलं लवुळगावामध्ये एका कुत्र्याने वानराचं पिल्लू मारलं होतं. तेंव्हा पासून जंगलातून शेतात फळे आणि पिके खाण्यासाठी आलेली ही माकडे भयानक आणि हिंस्र  बनलीत असं गावकरी सांगतायेत. ज्या दिवशी हि घटना घडली त्या दिवशीपासून वानर आणि कुत्र्यांमध्ये चक्क गॅंगवॉर चालू झालं आहे. कुत्र्याचं एखादं पिल्लू दिसलं रे दिसलं की ती वानरं ती कुत्र्याचं पिल्लं झाडावर नेत असायची आणि झाडावर नेऊन उंचावरून ती पिलं खाली फेकून देत असायची. 

माकडे अगोदर कुत्र्यांच्या पिल्लांचे अपहरण करायचे आणि त्यांना उंच छतावर, झाडावर किंवा इमारतीत घेऊन जायचे अन उंचावरून खाली फेकून द्यायचे. सुरुवातीला गावकऱ्यांना वाटले कि, हा प्रकार साधारण असेल पण, दररोज कितीतरी कुत्र्याचे पिल्लू मरायला लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सुरुवातीला, गावकऱ्यांनी या माकडांचा पाठलाग केला आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, पण  ते शक्य होत नव्हते कारण, माकडे खूप वेगाने झाडांवर चढायचे अनेक वेळा लोकांनी झाडांवर किंवा छतावर चढलेल्या माकडांवर दगडफेक सुद्धा केली, जेणेकरून ते पिल्लांना वाचवू शकतील, परंतु ते त्यांना वाचवू शकले नाहीत.

आत्तापर्यंत या माकडांनी एक-दोन नव्हे तर तब्बल २५० पिल्ले मारली आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. एवढेच नाही तर हे भयंकर माकडे मनुष्यांवर देखील हल्ले करत आहेत. ते घरांच्या गच्चीवर, घराच्या अंगणात बसलेल्या लोकांवर हल्ले करत आहेत. जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातल्या या गावकऱ्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या माणसावर सुद्धा या वानरांनी हल्ले केलेत त्यामुळे लोकं लहान मुलांना तर एकटे घराबाहेर लोक सोडत नाहीत. अख्खं गाव या माकडांच्या दहशतीखाली आहे . 

शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या माकडांनी उचलून नेल्यामुळे गावात घबराट पसरली होती आणि शेवटी  या ग्रामस्थांनी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट धारुर येथील वन विभागाशी संपर्क साधला. 

त्यानंतर बीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कंद यांनी माध्यमांना सांगितलेय कि, “कुत्र्यांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूर वनविभागाच्या पथकाने बीडमध्ये पकडले आहे. दोन्ही माकडांना जवळच्या जंगलात सोडण्यासाठी नागपूरला हलवण्यात येत आहे.”

पण या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेक मिम्स पाहायला मिळालीत…#MonkeyVsDoge हॅशटॅगसह काही मिम्स पाहून तुम्हालाही हसू कंट्रोल होणार नाही.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.