देशातील सर्वात मोठ्ठी आंब्याची बाग कोणाच्या मालकीची आहे..? उत्तर आहे मुकेश अंबानी
शेती आणि इंडस्ट्री या दोन्ही दोन टोकाच्या एकदम विरुद्ध गोष्टी. म्हणजे शेतीच्या जागेवर इंडस्ट्री उभी केल्यावर होणारा वाद आपल्या सगळ्यांना माहितेय. पण इंडस्ट्रीच्या जागेवर शेती म्हणजे कशाच्याही, काहीही नसलेला संबंध.
पण भिडू देशातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असण्याचा रेकॉर्ड बनवणाऱ्या मुकेश अंबानी यांनी या दोन्ही विरुद्ध गोष्टींच एकत्र समीकरण करून अनोखा रेकॉर्ड करत आहेत.
तर तुम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च केलं की, भारतातली सगळ्यात मोठी आंब्याची शेती कोणाच्या मालकीची आहे, तर उत्तर मिळेल मुकेश अंबानी.
जरा आश्चर्याची गोष्ट आहे, कारण मुकेश अंबानी म्हंटल की, रिलायन्स ग्रुप ज्याच्या अंडर कित्येक भल्या मोठ्या कंपन्या आणि शेती म्हणजे गटात न बसणारा शब्द. पण तुमच्या माहितीसाठी मुकेश अंबानी यांच्या गुजरातच्या जामनगरमध्ये असलेल्या सगळ्यात मोठ्या इंडस्ट्रीच्या भागात देशातली सगळ्यात मोठी आंब्याची शेती आहे.
धीरूभाई अंबानी लखीबाग आमराई असं या अंबानींच्या बागेचं नाव.
जवळपास ६०० एकरात पसरलेल्या या आंब्याच्या बागेत तब्बल १ लाख ३० हजार पेक्षा जास्त आंब्याची झाड आहेत. इथल्या आंब्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, जे भारतातल्या वेगवेगळ्या भागात तर एक्स्पोर्ट होतातचं, पण भारताबाहेरही त्याची मोठी मागणी आहे.
या बागेमागचा किस्सा सुद्धा मोठा इंटरेस्टिंग आहे, म्हणजे झालं काय १९९७ मध्ये गुजरातच्या जामनगरमधल्या रिलायन्सच्या पेट्रोल आणि रिफायनरीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण व्हायचं. आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांनी याबबत कित्येक वेळा तक्रार केलेली. इंडियन पोल्युशन कंट्रोल बोर्डाने कंपनीला नोटीस पाठवली आणि वॉर्निंगसुद्धा दिली होती. त्यामुळ या प्रदूषणाच्या प्रोब्लेमवर सोल्युशन काढणं कंपनीला भाग होत, त्यातूनच या आंब्याच्या बागेची आयडिया सुचली आणि जामनगरच्या वेस्ट लाईनमध्ये असलेल्या ६०० एकरात ही धीरूभाई अंबानी लखीबाग आमराई उभी केली.
या नावामागची स्टोरी अशी कि,
१६ व्या शतकात बादशहा अकबरानं बिहारच्या दरभंगामध्ये १ लाख आंब्याची झाडं लावली होती, ज्याला लखीबाग असं नाव देण्यात आलं होत, अकबराचा हा रेकॉर्ड मोडला गेला, ज्यामुळे रिलायन्स कंपनीने धीरूभाई अंबानी यांच्या नावावरून आणि अकबराच्या लखीबागवरून याला धीरूभाई अंबानी लखीबाग आमराई असं नाव देण्यात आलं.
पण ही भली मोठी आमराई उभी करण्यात मोठ्या अडचणी होत्या, कारण जामनगर एरियात पाण्याचा मोठा दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची मारामारी व्हायची, त्यात एवढी मोठी बाग उभी केल्यावर पाण्याचा प्रश्न तर होता.
पण असं नाही कि पाणी अजिबात नव्हतं, समुद्रामुळं त्या भागात खार पाणी होत, तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीने या पाण्याचा वापर आपल्या आंब्याच्या बागेसाठी करायचा ठरवला, त्यासाठी डी-सॅलिनेशन प्लांट उभा केला. ज्याच्यामदतीने समुद्राच्या या खाऱ्या पाण्यावर प्रोसेस करून ते वापरण्याजोगं केलं जायचं आणि हेच पाणी रिलायन्सच्या आमराईला दिलं जायचं.
आता पाण्याचा प्रॉब्लम तर सॉल्व्ह झाला, पण समुद्रामुळं येणारा सुसाट वारा मोठी अडचण होती, त्यामुळे आंब्याच्या झाडांना नुकसान होणार होत, त्यामुळे यावरही रिलायन्सने शक्कल लढवली आणि आंब्याच्या बागेच्या कडेने सुरुची झाड लावण्यात आली, जेणेकरून समुद्राचा वारा अडवला जाईल.
इंडस्ट्रियल भागात शेतीचा हा पहिलाच प्रयोग होता. आणि या सक्सेफुल प्रयोगानंतर जामनगर रिफायनरीची वेस्ट लाईन ग्रीन बेल्टमध्ये बदलली. आज तिथे आंब्याच्या १२७ पेक्षा जास्त व्हरायटी आहेत.
या आमराईतले ५० टक्के आंबे हे बाहेरच्या देशांमध्ये एक्स्पोर्ट होतात. त्यामुळं रिलायन्सही देशातली सगळ्यात मोठी आंबा एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे. एवढंच नाही तर रिलायन्स कंपनी या बागेतल्या आंब्यांचा गर काढून तो रेल्यूर ब्रँड नावाने सुद्धा विकते.
त्यामुळं खराब वातावरण आणि नापीक जमिनीत सुद्धा सक्सेसफुल शेतीच उदाहरण मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने ठेवलंय. असं म्हणतात कंपनी दरवर्षी १ लाख आंबे शेतकऱ्यांना फुकट देते आणि आपल्या आमराईला भेट देऊन त्या बागेतल्या इनोव्हेटिव्ह आयडियांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देते.
महत्वाचं म्हणजे फक्त भारतातीलच नाही तर एरियाच्या दृष्टिन अंबानी यांची ही आंब्याची बाग अख्ख्या आशिया खंडात सगळ्यात मोठी आहे. आणि फक्त शेतीचं नाही तर रिलायन्स इंडस्ट्री भारतात आंबे एक्स्पोर्ट करणारी सुद्धा सगळ्यात मोठी कंपनी आहे. सध्या या आमराईची कमान मिसेस मुकेश अंबानी म्हणजेच नीता अंबानी यांच्या हातात आहे. त्यामुळ असं म्हणायला हरकत नाही कि, इंडस्ट्री बरोबर आंब्याच्या शेतीत सुद्धा मुकेश अंबानी टॉपला आहेत.
हे ही वाच भिडू :
- देशातील धनाढ्य मुकेश अंबानी सध्या अनमोल अंबानींमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेत
- टाटा आणि अंबानी, दोघांच्यात श्रीमंत कोण आहे..?
- जेव्हा विमानात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या शेजारी धीरूभाई अंबानी येऊन बसतात.