अडचणीत असणाऱ्या मित्राला मदत करण्यासाठी, नाना पाटेकरांनी स्वतःचं घर गहाण ठेवलेलं

मुंबईतल्या फिल्मी दुनियेबद्दल लोकांची समजूत आहे की तिथं फक्त ग्लॅमर चालतं. नुसत्या चांगल्या ॲक्टिंगवर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये टिकू शकत नाही असा एक समज. पण काहींनी नुसत्या ॲक्टींगवर आपली वेगळीच जागा निर्माण केलीय. त्यातलंच एक नाव म्हणजे नाना पाटेकर. खडा आवाज, डायलॉग डिलिव्हरी आणि क्लास ॲक्टींगवर नाना पाटेकरांनी एक काळ गाजवला होता.

आपल्या ॲक्टींग बरोबरच नाना पाटेकर अजून एका कारणासाठी इंडस्ट्रीमध्ये फेमस होते ते म्हणजे त्यांच्या जिवाभावाच्या मैत्रीसाठी.

नाना पाटेकर आणि अशोक सराफांची मैत्री आणि नानांनी वाचवलेला अशोक मामांचा जीव याचे किस्से तुम्ही ऐकलेच असतील. शाहरुख खान अजून पण नाना पाटेकरांची आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या माणसांमध्ये गिणती करतो. एकदा जेलमध्ये गेल्यानंतर, नानांनी आपल्याला बेलवर कसं बाहेर काढलं असा किस्सा शाहरूखनं बऱ्याचदा सांगितला आहे. मात्र याच्यापण पुढं जाऊन नानांनी अशी एक गोष्ट केली होती की नानांसाठी आपसूकच तोंडातून ‘दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस’ असं बाहेर पडतं.

तर हा किस्सा आहे नाना पाटेकर आणि एन.चंद्रा यांच्या दोस्तीचा. आता एन. चंद्रा म्हटल्यावर कोणीतरी साऊथ इंडिअन असेल असा तुम्ही विचार केला असेल, तर थोडं थांबा. तर पहिलं एन. चंद्रांबद्दल सांगतो. एक लेखक, डायरेक्टर आणि मग प्रोड्युसर म्हणून बॉलीवूडमध्ये एन. चंद्राचं तसं मोठं नाव. मसाला पिच्चर बनवण्यात त्यांचा हातखंडा. अंकुश, प्रतिघात हे ब्लॉकबस्टर त्यांनी दिले.

एन. चंद्रा यांचा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर ठरला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांना घेऊन केलेला ‘तेजाब’.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या हिट जोडीबरोबरच त्यांनी ‘एक दोन तीन’ सारखा एक हिट आयटम नंबर पण दिला.

तर नाना पाटेकर आणि एन. चंद्रा यांची दोस्ती घट्ट होण्यामागचं कारण म्हणजे ज्या अंकुश या चित्रपटातून नाना पाटेकर यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली तो चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा यांनीच बनवला आहे. 

दुसरं अजून एक कारण म्हणजे एन. चंद्रा मुंबईतल्या वरळी नाका परिसरात वाढलेले चंद्रशेखर नार्वेकर. त्यामुळं या दोन कट्टर मुंबईकरांचा याराना  चांगलाच वाढला होता. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या नानांनी आपल्याला बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या उपकाराची नेहमीच जाण ठेवली.

एकदा एन. चंद्रा एका मोठ्या आर्थिक समस्येत अडकले होते. त्यांना पैशाची नितांत गरज होती. पडद्यावर ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे… तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ असं म्हणणाऱ्या बॉलीवूडमधनं त्यांना काही मदत मिळण्याची शक्यता दिसली नाही. तेवढ्यात त्यांना आपला जिगरी नानाची आठवण झाली.

एन. चंद्रानी नानांना आपल्या पैशाच्या निकडीबद्दल सांगितलं. नाना एका पायावर मदत करण्यास तयार झाले. मात्र त्यातही एक सीन झालाच. चंद्रांना जेवढी रक्कम पाहिजे होती तेवढी नानांकडे नव्हती. मात्र काही केल्या मित्राची मदत तर करायची होती. नानांनी मग सरळ आपल्या घराचे पेपर काढले आणि  एन. चंद्रांना जेवढी मदत पाहिजे होती तेवढी केली.

नानांनी केलेल्या मदतीमुळं एन. चंद्रा संकटातून बाहेर पडले. पुढे जाऊन त्यांनी नानाची सगळी रक्कम परत केली. आपल्या मित्राची ही मदत लक्षात ठेवून त्यांनी नानांना स्कुटरही गिफ्ट केली. आज नानांचा अभिनय, त्यांची खुंखार डायलॉग डिलिव्हरी जितकी लक्षात राहते, तितकीच नानांची दोस्तीही.   

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.