कोहिनुर पेक्षाही मौल्यवान ‘नासिक हिरा’ त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातून इंग्रजांनी पळवलाय
जगभरात हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता तो म्हणजे भारत देश. साधारण हजारो वर्षांपासून संपूर्ण जग हिऱ्यांसाठी भारतावर अवलंबून होते. कोहिनुर, द ऑरलॉफ, द ग्रेट मुगल, सेंसी होप, फ्लोरटाइन, रिजेंट, पिटली, निजाम या व यांसारख्या असंख्य हिऱ्यांनी जगाला मोहिनी घातली.
असाच एक हिरा आहे जो कोहिनुर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान असून इंग्रजांनी भारतातून पळवून इंग्लंडला नेला. त्या हिऱ्याचं नाव आहे नासिक हिरा ‘आय ऑफ गॉड शिवा’
या नासिक हिऱ्याची गोष्ट सुरु होते १८१८ सालात. पण त्या आधीचा ही इतिहास आहे या हिऱ्याला. म्हणजे मराठेशाहीच्या अस्तापासूनच नव्हे तर त्यापूर्वी ही सहाशे सातशे वर्षांपूर्वी केव्हातरी हा हिरा अस्तित्वात आला.
केव्हातरी म्हणजे पक्के साल सांगायला तो इतिहास आता काळाआड गेला आहे. इतिहासाच्या स्मृतीपटलावर त्या खाणाखुणाही आता दिसेनाशा झाल्या आहेत.
नक्की साल माहित नसले तरी हा नासिक हिरा हा १३ ते १४ व्या शतकात तेलंगाणातल्या महबूबनगरजवळ अमरागिरी खाणीत सापडला असे म्हंटल जातं. त्यानंतर तो म्हैसूर राजाच्या खजिन्यात दाखल झाला. म्हैसूरचा खजिना हिऱ्यांनी भरलेला होता. पुढं मुघल आक्रमकांनी म्हैसूरचा खजिना लुटला. त्यानंतर नासिक हिरा मुघलांच्या खजिन्याची शान बनला.
पुढं पेशव्यांनी दिल्लीवर ताबा मिळवल्यानंतर मुघलांचा जामदारखाना पेशव्यांच्या ताब्यात यावा म्हणून पेशव्यांचे सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वरला नवस केला होता. त्र्यंबक गड ताब्यात आल्यावर नवसाची परतफेड म्हणून पेशव्यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराला मुघलांच्या खजिन्यातला सोन्याचा रत्नजडित मुकुट आणि हिरे जडजवाहिर शिवाला अर्पण केले.त्यावेळी नासिक हिरा त्र्यंबकेश्वरच्या खजिन्यात दाखल झालं.
नाशिकचा शिरपेच असलेल्या त्र्यंबकराजाच्या मुकुटात हा हिरा विराजमान झाल्याचे म्हंटले जाते. त्यामुळेच इंग्रजांनी नासिक हिऱ्याला शिवाचा तिसरा डोळा ‘आय ऑफ गॉड शिव’ असे म्हंटले असावे. या मुकुटात हा हिरा होता, मात्र आता त्र्यंबकेश्वराच्या मुकुट पहिला तर त्यात कुठेही हिरा बसेल अशी जागा दिसत नाही.
याचा अर्थ हा हिरा त्र्यंबकेश्वरच्या खजिन्यात नव्हता. मात्र नासिक हिरा त्र्यंबकेश्वरमध्ये म्हणजे शिवाच्या नगरीत मिळाल्याने इंग्रजांनी त्याची नोंद ‘आय ऑफ गॉड शिवा’ अशी केलेली दिसते. हा हिरा मिळण्याची दुसरी शक्यताही व्यक्त केली जाते ती म्हणजे शेवटच्या पेशव्यांच्या खजिन्यात हा मिळाला असावा. पेशव्यांच्या खजिन्याची जबाबदारी त्र्यंबकेश्वरमधील ज्या व्यक्तीकडे होती त्याच्याकडून तो इंग्रजांनी लुटला.
इंग्रजांच्या दफ्तरीनुसार त्यांनी एका व्यक्तीच्या घरातून जी संपत्ती जप्त केली त्यात हा हिरा होता. म्हणजे हा खजिना पेशव्यांचा होता आणि तो त्र्यंबकेश्वरमध्ये मिळाल्याने इंग्रजांनी बहुधा ‘आय ऑफ गॉड शिव’ अशी त्याची ओळख निर्माण केली. इंग्रजांनी हा हिरा लुटला खरा पण नासिक हिरा लुटण्याचा प्रकार मुघलांनी म्हैसूरच्या खजिना लुटल्यापासून सुरु झाला होता.
आणि इंग्रजांनी हा हिरा पळवला..
१८११ मध्ये पुण्यात ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट म्हणून दाखल झालेल्या माउंटस्टुअर्ट एल्फिस्टनने मराठ्यांच्या नसा आणि बळ नेमके कशात आहे हे शोधायला सुरवात केली. सरदारांमध्ये फूट कशी पडता येईल, विश्वासू माणसांना कस नामोहरम करता येईल आणि त्याचबरोबर मराठ्यांकडे नेमकी किती संपत्ती आहे? कोठे आहे? हेही हेरण्याचं काम सुरु होत.
याचदरम्यान नाशिकमध्ये असणाऱ्या कॅप्टन ब्रिग्जच्या हाती नाशिकमध्ये एक मोठा खजिना लागला. हा खजिना होता त्रिंम्बक डेंगळे, म्हणजे दुसऱ्या बाजीरावांच्या सेनापतींचा. या खजिन्यात सोन्याचांदीचे ६५ हजारांचे दागिने मिळाले.
पुढे २९ एप्रिल १८१८ रोजी कर्नल मॅक्डोवेलने कॅप्टन ब्रिग्जला बाजीरावांचे काही लोक जंगलातून काही घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याचा निरोप दिला. मात्र ब्रिग्जने या करवाईतून आपल्याला बक्षीस मिळणार नाही म्हणून ती टाळली. त्यानंतर १ मे १८१८ रोजी एलफिन्स्टनने खासगी पत्राद्वारे नाशिकमध्ये बाजीरावाची संपत्ती असल्याची माहिती दिली.
बाजीरावांची संपत्ती राजकीय मालमत्ता होती. याप्रमाणे कॅप्टन ब्रिग्ज स्वतःच त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आणि त्याने ताम्हणकारांच्या घरातून संपत्ती ताब्यात घेतली. त्यांच्या घरातून प्रचंड खजिना मिळाला. यात शुद्ध सोन्याची साधारण ४ किलो म्हणजे ३५० तोळे वजनाची शेषशायी विष्णूची प्रतिमा, कमरबंद, बांगड्या, मौल्यवान पाचू, रत्ने, सोन्याचे हार, पूजेची चांदीची भांडी, एक चौरंग इत्यादी गोष्टी होत्या.
याव्यतिरिक्त अनेक पेटारे होते, की जे खोलण्यात आले नव्हते, ज्यात एवढ्या सोन्याच्या मोहरा व रत्ने होती. ज्याची मोजदाद करणे शक्य नव्हते. इंग्रजांनी लुटलेल्या संपत्तीत ९० कॅरेटचा एक हिराही होता. हा हिरा नासिकमध्ये मिळाल्याने कॅप्टन ब्रिग्जने या हिऱ्याची नोंद करताना त्याला नासिक हिरा असे म्हंटले.
लुटीच्या या नासिक हिऱ्याची गणना १९३० मध्ये जगातल्या प्रमुख २५ हिऱ्यांमध्ये केली गेली.
ह्या हिऱ्यानं अख्खी जगभ्रमंती केली.
१६ मार्च १८२१ च्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांमध्ये नासिक हिरा इंग्लंडला दाखल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण नासिक हिऱ्याचा प्रवास इथेच संपला नव्हता. ३ जुलै १८३७ मध्ये जे. जी. मेसर्स अँड जी. ए. शार्प यांनी या हिऱ्याच्या लिलावाचे आयोजन केले. २० जुलै १८३७ या दिवशी लंडनच्या रुंदेल आणि ब्रिज या जोहोरींनी नासिक हिरा ३०००० पाउंडला विकत घेतला.
त्यानंतर २५ मे १८३८ मध्ये इंग्लंडच्या राजघराण्यातल्या महत्वाची व्यक्ती असलेल्या मार्क्विस ऑफ वेस्टमिनिस्टर रोबेर्ट ग्रॉसव्हेनोर यांनी तो विकत घेतला. त्यांनी तो हिरा आपल्या तलवारीच्या मुठीत बसवला. त्यांच्या मृत्युनंतर न्यूयॉर्कच्या ३३० पार्क अव्हेन्यू वरील श्रीमंत ज्वेलरी, एम. माऊबॉसिन यांनी विकत घेतला.माऊबॉसिन हे मूळचे पॅरिसचे होते. त्यांनी तो आपल्या स्टोअर मध्ये विक्रीला ठेवला.
१९४० साली हॅरी विन्स्टन यांनी हा नासिक हिरा विकत घेऊन त्याला पुन्हा पैलू पाडले. या मधल्या काळात हा हिरा चोरीला गेला. पण विन्स्टन यांनी तो पॅरिस मधून पुन्हा मिळवला. १९७० मध्ये हा हिरा पुन्हा लिलावात मांडण्यात आल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले. १६ एप्रिल १९७० रोजी न्यूयॉर्कमधील उद्योगपती एडवर्ड जे हॅन्ड यांनी आपल्या पत्नीसाठी हा हिरा ५,००,००० डॉलरला विकत घेतला. अन जगातला हा सर्वात महागडा हिरा ठरला. त्यांची पत्नी टेनिस स्टार गासी मोरन होती. त्यानंतर हा हिरा अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी राजा खालिदबीन यांच्याकडे गेला.
शेवटी २०१६ मध्ये या हिऱ्याचा प्रवास थांबला तो वर्ल्ड हिस्ट्री अर्काइव्ह येथे येऊन दाखल झाला.
हा मूळ हिरा ९० कॅरेट म्हणजे १८ ग्राम वजनाचा होता. पुढं त्याला पैलू पडले गेले. १८३७ मध्ये मिस्टर शार्प यांनी या हिऱ्याला पैलू पडले आणि त्याचे वजन ९० कॅरेटवरून ७८.६२५ कॅरेट झाले.
विशेष म्हणजे या हिऱ्याच्या नावाची विमान आकाशात भरारी घेतात. नासिक हिऱ्याच्या प्रेमापोटी मिडलँड एअरवेजने मॅक्डोनेल डग्लसडी जी-९ या विमानाला ‘द नासिक डायमंड’ असं नाव देऊन हिऱ्याच्या आकर्षणावर मोहोर उटवली.
असं म्हणतात की, हिरा हा उत्कंठा आणि प्रेम याचा अनोखा संगम असतो. तो वारंवार लुटला गेल्याने तो शापित होतो. आणि जो माणूस हा हिरा घेतो त्याच कर्म शापित ठरत. नासिक हिऱ्याच्या बाबतीत असच काहीस घडलं असेल का?
संदर्भ-नासिक हिरा एक शोध , चेतन राजापूरकर
भिडू हे ही वाचा
- इंग्लंडमधल्या नदीमध्ये देवनागरी लिपी कोरलेला गूढ खजिना सापडला आहे.
- निजामाला गंडवून जौहरीने खजिना साठवला पण बँकेने त्यालाच गंडा घातला.
- असा होता थरार, साडेपाच लाखांच्या खजिना लुटीचा..
- दुसऱ्या बाजीरावाने रायगडावर लपवलेल्या खजिन्याचं काय झालं ?