मराठमोळ्या नेव्ही पायलटने बांबूची सायकल बनवून आत्तापर्यंत लाखभर लोकांना विकलीये.

मुंबई आणि मुंबईच्या ट्रॅफिकचे किस्से ऐकावे तेवढे थोडे असतात. एरव्ही शाईन मारत फिरणारे फोर व्हिलरस्वार ट्रॅफिकमध्ये अडकले की कडेकडेनं निसटणाऱ्या बाइक वाल्यांकडे लय दवनीय नजरेने बघत राहतात.

मुंबईच कशाला हल्ली कुठल्या पण शहरात गेलं तरी हेच चित्र दिसतं. आणि अशावेळी बाइक वाल्यांपेक्षा पण जास्त हेवा वाटतो तो सायकल वाल्यांचा. त्यांना तर ट्राफिक किंवा ट्राफिक पोलिस काय, देव पण अडवू शकत नसतोय. अगदी निसटता येत नसलंच तर हे भिडू लोकं सरळ सायकल हाताने ओढत स्वॅगमधे डायरेक्ट फुटपाथवरुनच चालायला सुरवात करतात.

परवा असाच एक सायकलस्वार आपली सायकल मिरवत, आपल्याकडे कोण बघतय का हे बघत, रस्त्यावरून चालला होता. सगळं कौतुक त्याच्या सायकलचं होतं. कारण त्याची सायकल जरा खास दिसत होती. एरवी काळ्या, पिवळ्या निळ्या किंवा राखाडी रंगाची जशी रेग्युलर सायकलची बॉडी दिसते तशी त्याच्या सायकलची दिसत नव्हती.

त्याच्या सायकलची बॉडी झाडाच्या खोडासारखी दिसत होती. त्यावर तिरक्या ओळीत काहीतरी लिहिलेलंही होतं. थोडं आणखी जवळ जाऊन वाचलं तेव्हा दिसलं, त्यावर ‘Bamboochi’ असं काहीतर लिहिलं होतं.

आम्ही साधारण तर्क लावला तो म्हणजे ही सायकल बांबूची असणार. मधे त्या शार्क टॅंक शोमध्ये बांबूपासून टुथ ब्रश बनवलेले अवलीये सुद्धा आलेले… त्यामुळे, बांबूची सायकलही बनूच शकते ह्यावर विश्वास ठेवणं काय तसं आम्हाला जड गेलं नाही.

फक्त खात्री करून घ्यायला आम्ही त्या पोरला जाऊन विचारलं तर आमचा तर्क खराच ठरलेला. ती बांबूचीच सायकल होती.

आश्चर्य वाटेल अशी गोष्ट तर पुढे घडली. त्या मुलाच्या मागून अजून दोन पोरं अजून एक सायकल चालवत पुढे आली. हो.. दोन पोरं, एक सायकल चालवत पुढे आली.

त्या सायकलला हॅंडल दोन होती, सीट्स दोन होत्या आणि पेडल्स पण दोन होती. आम्हाला हा प्रकार काहीतरी नवीन वाटला. म्हणलं पोरांनी फॉरेनमधून सगळं सोडून सायकली आणल्यायत, चांगलंय.. यावर ते पोरंगं म्हणलं, नाय नाय इकडचीच आहे.

सायकल इकडचीच आहे हे ऐकल्यावर आम्ही जरा जास्त कान देऊन ऐकायला लागलो, तर भाई विषयच. ही सायकल एका मराठमोळ्या आर्मी ऑफिसरने बनवलेली निघाली.

बांबूच्या झाडांपासून सायकल बनवणारी ‘Bamboochi’

ही कंपनी एका नेव्हीमध्ये काम करणाऱ्या पायलटनी सुरू केली. आणि ह्या कॅप्टन सरांचं नाव आहे शशीशेखर पाठक.

त्यांना आधी पासूनच सायकलिंगचा लय नाद. त्यांनी पुण्यात भोरजवळ त्यांच्या मालकीच्या जमिनीवर बांबूची झाडं लावलेली. ह्या बांबूच्या झाडांपासूनच त्यांनी स्वतःसाठी एक बायसिकल बनवायचं ठरवलं. ती बनवण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज पाहिले, ही सायकल कशी दिसेल त्याचे आरखडे तयार केले.

पहिली सायकल बनवायला कॅप्टनना जवळ जवळ दोन वर्ष लागली. पण तरी सुद्धा सायकलची फक्त फ्रेम बनून तयार होती. त्यावर चाकं, हॅंडल, पेडल या सगळ्या गोष्टी लागायच्या बाकी होत्या.

मग कॅप्टनना कोणीतरी, सायकल एक्स्पर्ट फैझल ठाकूर यांना भेटायचा सल्ला दिला. कॅप्टननी बनवलेली सायकलची फ्रेम फैझल यांना खूप आवडली, त्यांनी त्या फ्रेमला सायकलचं रूप दिलं आणि पहिली बांबूची तयार झाली.

कॅप्टन सर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या बायकोच्या मदतीने, ह्या सायकलचं प्रॉडक्शनच सुरू केलं. सायकलच्या जवळ जवळ २५ युनिक फ्रेम्स बनवल्या. आणि भारी गोष्ट म्हणजे ह्या बांबूंपासून बनवलेल्या सायकलला रिस्पॉन्स पण भारी मिळायला लागला.

आता ह्या सायकलचा भारी विषय काये, तर मुळात ही सायकल बांबूपासून बनलेली असल्याने इको- फ्रेंडली आहे.. आणि आताच्या काळात इको फ्रेंडली गोष्टींचं महत्व किती वाढलंय हे काय आम्ही तुम्हाला सांगायला नको..

दूसरा भारी विषय म्हणजे ही सायकल कस्टमाईज्ड आहे. म्हणजे तुम्ही बारके, बुटके, जाड, उंच कसे पण असलात तरी तुमच्या शरीराच्या आकारमानाप्रमाणे ही सायकल आकार घेते आणि त्या प्रमाणेच बनवली जाते. त्यामुळे चालवताना सोयीची पडते आणि कम्फर्ट देते.

तिसरी भारी गोष्ट म्हणजे ह्या बायसिकलमध्ये असणारी व्हारायटी. कॅप्टन शशीशेखर कायमच नवनवीन मॉडेल्स बनवत असतात. ह्या बायसिकल्समध्ये आत्ता लाइटस्पीड बायसिकल, एलेक्ट्रिक बायसिकल, गिअर्ड बायसिकल, फोल्डेड बायसिकल आणि त्यांची सुपरहिट ठरलेली आणि मास्टरपीस असलेली टँडेम बायसिकल म्हणजे दोघांनी चालवायची बायसिकल असे प्रकार सध्या अवेलेबल आहेत.

प्लस बांबूला नैसर्गिकरित्याच एक लवचिकपणा असतो त्यामुळे, सायकलला लावलेली ही बांबूची फ्रेम, रस्त्यावरचे खड्डे सहज पार करू शकते. याने काय होतं तर सायकलस्वाराला रस्त्यावरचे खड्डे त्रास देत नाहीत, त्याला फार हादसे बसत नाहीत, आणि त्यामुळेच बाकी देशांचं माहीत नाही पण आपल्या देशासाठी मात्र ही बायसिकल म्हणजे कामाची गोष्ट आहे.

आता तुम्ही म्हणाल बांबू आहे म्हटल्यावर ही लगेच सडत असणार पण भिडूनो, हि बायसिकल म्हणे सात वर्ष टिकते… असं आम्ही नाय स्वतः कॅप्टन म्हणतायत. म्हणजे कॅप्टन शशीशेखर पाठक तुम्हाला किमान सात वर्षांची तरी वॉरेंटी देतात.

सगळं आहे तर भारी पण आता विषय येतो तो किमतीचा, तर ह्या बायसिकलची किंमत आहे, १ लाख ५ हजार रुपये. आता इतर सायकलींच्या तुलनेत किमत थोडी वाढीव असली तरी गोष्ट पण वाढीव आहे त्यामुळे चालून जातंय.

ही वाढीव गोष्ट अजून एका व्यक्तीला भारी वाटली ती म्हणजे फ्रांसमधले प्रोफेशनल सायकलिस्ट Patrick LeFerre यांना. पॅट्रिक ह्यांना ही बायसिकल एवढी आवडली की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग बघायला म्हणून ते खास भोरला येऊन गेले.

शेवटी काय, कॅप्टन सरांच्या बांबू बायसिकलचा विषय हार्ड आहे हे नक्की.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.