सायकल रिपेअर करणाऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होत नाव काढलं

सगळ्या सोयी-सुविधा मिळूनही आपल्यासाठी आई-बापानं काही केलं नाही, असं म्हणणारे महाभाग आपल्या आजूबाजूला कमी नाहीत. मात्र खडतर परिस्थितीचा सामना करत यश मिळवणारे भिडूही आपल्याच आजूबाजूला असतात. उदाहरण द्यायचं झालं, तर पुण्यातल्या कामगार वसाहतीत राहणाऱ्या एका सायकल दुरुस्ती करणाऱ्याच्या मुलानं खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून  न्यायाधीश बनण्याचं स्वप्न पूर्ण केलंय.

पुण्यातल्या गुलटेकडीतल्या औद्योगिक वसाहतीत सायकल दुरुस्तीचं काम करणाऱ्या श्रीधर काळे यांच्या मुलानं रवी काळेनं न्यायाधीश होण्यासाठी असणारी जेएमएफसीची परीक्षा पास होत यश मिळवलंय. एका वर्षाच्या ट्रेनिंगनंतर जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी रवी यांना मिळणार आहे.

रवी काळे यांचे वडील मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदामधले. १९६८ मध्ये ते रोजगारासाठी पुण्यातल्या गुलटेकडीमध्ये आले. चहाच्या टपरीपासून त्यांनी व्यवसायाला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी सायकल दुरुस्तीचं काम सुरु केलं.

वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन श्रीधर काळे यांच्या पाचही मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. रवी आता न्यायाधीश झाले असून, त्यांचे २ मोठे भाऊ खासगी कंपनीत आहेत… तर सर्वात मोठी बहीणही वकिली व्यवसायात आहे.  

२०११ मध्ये ३ मार्कानं पीएसआय पदाची हुलकावणी

 पुण्यातल्या महर्षीनगरमधल्या नामदेव माध्यमिक विद्यालयातून रवी काळे यांचं प्राथमिक शिक्षण झालं. १२ वी नंतर एसपी कॉलेज मध्ये बी. कॉमला ऍडमिशन घेतलं. त्यानंतर रवी यांनी इतर मुलांप्रमाणं स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला. मात्र, लवकर यश प्राप्त झालं नाही तर यातच अडकून राहणार नसल्याचंही त्यांनी ठरवलं होतं. 

केवळ स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलो, तर वेळ जाईल आणि यश मिळण्याची गॅरंटी नसल्यानं त्यांनी मोठ्या बहिणीचा सल्ला ऐकला आणि यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये एलएलबीला ऍडमिशन घेतलं.

२०१४ एलएलबीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर रवी यांनी पूर्ण वेळ वकिली करायचे ठरविले होते. त्यानंतर  पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रताप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली रवी यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली.

 गेली ७ वर्ष रवी एकीकडे दिवसभर कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस आणि त्यानंतर घरी जाऊन अभ्यास असाच दिनक्रम पाळत आले. त्यांना वकिलीमुळे अभ्यासाला जास्त वेळ मिळत नव्हता मात्र त्यांनी हार मानली नाही. 

२०१६ मध्ये रवी यांचं लग्न झालं. एकीकडे संसार, वकिली सुरु असताना अभ्यासात मात्र त्यांनी खंड पडू दिला नाही. २०२० ला जेएमएफसीची प्री परीक्षा पास झाले. २०२१ ला मुख्य परीक्षा दिली. २०२२ मध्ये या परीक्षेचा निकाल लागला आणि रवी यांची मुलाखतीसाठी निवड झाली.

२४ मार्च रोजी लागलेल्या निकालात रवी यांना २५० पैकी १४४ गुण मिळाले. 

रवी यांच्या आईचं २००५ मध्ये निधन झालं. आपल्या मुलानं मोठं होऊन कर्तृत्त्व गाजवावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. जेएमएफसीची परीक्षा पास होऊन एक प्रकारे रवी यांनी आपल्या आईचं स्वप्नच पूर्ण केलं आहे. 

याबाबत बोल भिडूशी बोलताना रवी काळे म्हणाले, 

“पीएसआयची पोस्ट केवळ ३ मार्काने मिळाली नाही म्हणून स्वस्थ बसलो नाही किंवा निराश झालो नाही. वकील असणाऱ्या बहिणीचा सल्ला ऐकत एलएलबीला ऍडमिशन घेतलं. वकिली करत करत न्यायाधीश बनण्याचं स्वप्न मात्र उराशी होतंच. वडिलांनी आमच्या भावंडांसाठी केलेले कष्ट कधीही विसरलो नाही.”

रवी न्यायाधीश झाले, तेव्हा गुलटेकडीतल्या त्यांच्या वस्तीत लोकांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. रवी यांच्या यशानं कित्येकांना आपलं दिवसभराचं दु:ख आणि कष्ट विसरायला लावले. त्यांना आनंदाचे क्षण तर मिळालेच पण कित्येक लहानग्यांना स्वप्न बघण्याची आणि जिद्दीनं पूर्ण करण्याची प्रेरणाही मिळाली.

हे हि वाच भिडू 

  

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.