बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव

काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती कि, जगभरातल्या तापमानात वाढ होत चाललीये. आता तुम्ही म्हणाल उन्हाळा आहे म्हंटल्यावर तापमान वाढणार नाही तर काय पाऊस पडणारे..

पण भिडू भौगोलिक उत्तर द्यायचं झालं तर सगळीकडं वातावरण सारखंच नसतं. जस आपल्याकडं दिवस असल्यावर विदेशात रात्र असती, तसंच हवामानात सुद्धा असतंय. त्यामुळे पहिली लाईन वाचूनच लगेच कमेंट करायला जाऊ नका.

असो… तर एकूणच सगळ्या जगाचं तापमान वाढलंय, त्यात प्रदूषण आणि या दोन्ही गोष्टींचे दुष्परिणाम काय नव्यानं सांगायला नको. पण या प्रदूषण आणि तापमानात वाढ होण्यामागे दोन कारण आहेत, एक म्हणजे इंधन आणि दुसरा कोळसा. कारण या दोन्ही गोष्टींमुळे कार्बन ऑक्साईड वाढतो. आता या दोन्ही गोष्टी वापरणं बंद होणार नाही.

पण यावर जालीम इलाज मात्र आहे. तो म्हणजे बांबू….

कारण तापमान कमी करण्याच्या पर्यायांमध्ये बांबू हा एक पर्याय आहे आणि जो आपल्या हातात सुद्धा आहे. त्याहून भारी गोष्ट म्हणजे या बांबू लागवडीपासून लाखो, करोडो रुपयांचा नफा सुद्धा मिळवता येऊ शकतो. 

त्यात नुकताच बातमी आली होती कि, बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाड्यापासून सुरुवात केली जाणार आहे. ज्याअंतर्गत गोदावरी, मांजरा आणि त्यांच्या उपनद्या अशा ११ ते १२ नद्यांच्या दोन्ही बाजूने एक कोटी बांबूच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. जवळपास पाच हजार किलोमीटरच्या परिसरात हे काम केलं जाणार आहे. आणि हळू हळू हा प्रकल्प सगळ्या महाराष्ट्रात राबवला जाणार असल्याचं म्हंटल जातंय. एकूण काय केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सुद्धा बांबू लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जातंय.

त्याचा उपयोग म्हणाल तर, बांबूच्या प्रत्येक तुकड्याचा फायदा आहे. पार त्याच्या बारीक झालेल्या भुश्याचा सुद्धा आणि त्यातून होणारी कमाई सुद्धा रग्गड असती.

म्हणजे स्पेशली इथेनॉलचं उदाहरण घ्यायचं झालं तर असं म्हणतात १ लिटर उसाचं गाळप केलं तर ८० लिटर इथेनॉल तयार होत. पण त्याऐवजी एक हेक्टर बांबूपासून ४०० लिटरच्या आसपास इथेनॉल तयार होत. त्याशिवाय ब्रश, फर्निचर, कपडे, पेपर, अगरबत्ती, आईस्क्रीमच्या कांड्या, शोच्या वस्तू, चहापावडर, औषध, शेतीची काम, अवजार बनवण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे दगडी कोळश्याचा जो तुटवडा जाणवतोय, त्याला पर्याय म्हणजे बांबू अशा  जवळपास १००० च्या वर गोष्टी या बांबूपासून मिळतात. 

त्यामुळेच तर चीनमध्ये ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त बांबूची लागवड केली जाते, ज्यातून ३ लाख २० हजार कोटींची उलाढाल होते. आणि भारत म्हणाल तर हे प्रमाण १० लाख हेक्टर एवढचं आहे, ज्यामुळे भारताला तब्बल २० हजार कोटींच्या बांबूच्या वस्तू बाहेरच्या देशांमधून आयात केल्या जातात. त्यामुळे आपण जर आपल्या इथेच जर बांबूची लागवड केली तर आपल्याला भाव सुद्धा चांगला मिळेल, आणि भारताला सुद्धा त्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. 

या बांबू लागवडी संदर्भात डिटेल माहिती सांगायची झाली तर, जसं कि आधीच सांगितलं बांबू लागवडीसाठी कमी पाणी लागत आणि हवामानाचं म्हणाल तर, भारतासारखं चांगलं हवामान बांबूसाठी कुठलच नाही. जमीन तर कुठलीही घ्या सुपीक पासून नापीक ते पार खडकाळ भागात सुद्धा बांबू चांगला येतो. 

या बांबूच्या तब्बल १३५ जाती आहेत. पण त्यातल्या १६ जाती केंद्रानं औद्योगिक वापरासाठी निवडल्यात. 

बांबू लागवडीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याला कमी पाणी लागत. म्हणजे असं म्हणतात एका बांबूच्या आठवड्यातून एकदा जरी पाणी घातलं तर बास होतं.

हा.. त्याला पूर्णपणे तयार व्हाल ४-५ वर्ष लागतात. पण त्यानंतर जो नफा मिळतो ना तो बाकीच्या पिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. आणि एकदा बांबूची लागवड केली तर ५० ते ६० वर्ष ते आपल्याला उत्पन्न मिळवून देत. आणि देखभालीचा खर्च सुद्धा बाकीच्या पिकांपेक्षा फार कमी आहे. 

उदाहरण द्यायचं झालं तर, उसाला प्रतिटन २,१०० भाव आहे, तर बांबूला प्रतिटन ५,१०० रुपये. आणि कीड लागण्याची शक्यता सुद्धा फार कमी प्रमाणात असते.  

आता भिडू उगाच काय कुठलीही माहिती सांगत नाही. जे काही सांगतो ते विथ फ्रुफ सांगतो. त्यामुळे बांबू लागवड करून आणि त्याचा व्यवसाय करून सक्सेसफूल झालेली दोन उदाहरण सुद्धा  घेऊन आलेय.

तर राजशेखर पाटील हे उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी सारख्या दुष्काळ ग्रस्त भागातील शेतकरी. त्यात शेतमालाला चांगला  भाव नसल्यामुळे राजशेखर पार कर्जबाजारी झाले होते. पण आज बांबू लागवडीपासून ते करोडो रूपये कमावतायेत.

बोल भिडूशी बोलताना राजशेखर पाटील यांनी सांगितले की,

गेल्या वीस वर्षांपासून मी या बांबूची लागवड करत आहे. सगळ्यात आधी बांबूची ४० हजार झाडं लावली घेतली होती. जी शेताच्या कडेने लावली आणि आत सगळी फळ झाडं होती.

खरं तर मी ही बांबूची झाडं शेताला प्रोटेक्शन म्हणून लावली होती. मला पण नव्हतं माहित या बांबूपासून इतके पैसे मिळतात. पण जेव्हा मी ४०,००० बांबूची झाडं शेताच्या कडेनं लावली, तेव्हा त्याची दहा लाख झाडं तयार झाली. आता मला त्याचा फायदा तोटा काही माहित नव्हता. पण लोकं यायची आणि बांबू विकत घेऊन जायची आणि त्यातून लाखो रुपये जमा झाले.

राजशेखर सांगतात की,

चांगल्या कमाई नंतर मी सगळ्या शेतामध्ये बांबूची झाडं लावायचा निर्णय घेतला.  मी अख्ख्या भारतात फिरलो, आणि वेगवेगळ्या प्रकारची बांबूची झाडं जमा केली. लोकं सुरूवातीला मला येड्यात काढायची. पण हळूहळू होणारं प्रॉफिट बघून त्यांना सुद्धा पटलं की या बांबूतून चांगली कमाई होतेय. आणि आज रिझल्ट असा आहे की, अख्ख्या ५४ एकरात त्यांनी बांबूचं अक्षरशः जंगल तयार केलयं. ज्यातून वर्षाला ४ ते ५ कोटी सहज मिळतात. 

राजशेखर बांबूची लागवडचं नाही तर त्यांची नर्सरी बनवून त्याची रोप सुद्धा विकतात. या नर्सरी तून सूद्धा वेगळी अशी तब्बल १० ते १२ लाखांची कमाई होते. राजशेखर यांनी आपल्या बांबूच्या शेतीत जवळपास नव्वद एक लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलाय.

आता हे तर झालं बांबूची शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं सक्सेसफुल उदाहरण, पण बांबूच्या उत्पादनांचा बिजनेससुद्धा तितकाचं सक्सेसफुल आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे कोल्हापूरचे अशपाक मकानदार.

अशपाक मकानदार यांचा कोल्हापूरच्या टिंबर मार्केटजवळ  बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंचा मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या आर्टवर्ल्ड  कंपनीच्या माध्यमातून जवळपास ५५० प्रकारचे प्रोडक्ट तयार केले जातात. आणि यातून तब्बल चार कोटींची उलाढाल दर वर्षाला होते.

अशपाक मकानदार यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले की,

माझी आई जैबुन्निसा मकानदार यांनी या बांबूपासून  वस्तू तयार करायला सुरुवात केली. एक हौस म्हणून आईने याची सुरुवात केली होती. आधी आकाश कंदील छोटे हँडीक्राफ्ट असे मोजके ४० प्रोडक्ट तयार व्हायचे. काही महिलांना हाताशी घेऊन त्यांना रोजगार देऊन हे प्रोडक्ट तयार केले जायचे .

या व्यवसायावरचं माझं आणि माझ्या बहिणीचे इंजिनियरिंग पूर्ण झालं. पुढे मी नोकरीसाठी मुंबईला गेलो. २००४ पर्यंत आईने हा व्यवसाय सांभाळला. पण नंतर किडनीच्या आजाराने आईचं निधन झालं त्यामुळे मी जॉब सोडून हा व्यवसाय हातात घेतला.

माझे वडील, मी आणि माझ्या मिसेस आम्ही तिघांनी मिळून हा व्यवसाय आणखी डेव्हलप केला. आधी आई फार कमी आकाशकंदील करायची, पण त्यामध्ये  मी माझ्या शिक्षणाची जोड देऊन, त्यावर आणखी रिसर्च करून, मार्केटची गरज पाहून या प्रॉडक्टची संख्या वाढवली.

अशपाक सांगतात की, २००९ सालापर्यंत आम्ही हा व्यवसाय  सुरू ठेवला.  पण या दरम्यान भारतात चायनीज प्रॉडक्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.  त्याचा फटका आमच्या व्यवसायाला सुद्धा बसला.  त्यामुळे आम्ही आणखीन प्रॉडक्ट बाजारात उतरवली. असचं हळूहळू करत २०१४ मध्ये चाळीस एकर जमीन घेतली आणि आमचा स्वतःचा मोठा उद्योग सुरू केला.  बांबू पासून उत्पादन बनवण्यासाठी वेगवेगळ्या मशीन घेतल्या. आणि उत्पादनांवर आणखी काम केलं.

आज अशपाक यांची आर्ट वर्ल्ड कंपनी  जवळपास साडेपाचशे प्रॉडक्ट तयार करते. ज्यामध्ये बांबूच्या आकाश कंदील, लाईट फर्निचर, शोपीस,  मोठे घड्याळ  एवढचं नाही तर छोट्या रिसॉर्टची काम सुद्धा  अश्फाक यांची कंपनी करते.  या सगळ्यातून कंपनी जवळपास वर्षाला चार ते पाच कोटींची उलाढाल करते.

हे ही वाचं भिडू :

 

 

1 Comment
  1. Madhukar Sahane says

    Nice idea

Leave A Reply

Your email address will not be published.