गॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान…

चंप्र देशपांडे एकदा कवितेच्या बाबत म्हणाले की मी जी कविता करतो ती मी आणि माझ्या आधीच्या सर्वांनी मिळून लिहीलेली असते.’ किती खरं आहे हे नाही का? म्हणजे आपण जे कलात्मक काम करत असतो त्यात आपलं कितीसं आणि आधीच्या पिढ्यांनी आपल्याला शिकवलेलं कितीसं याचा जर विचार केला तर चंप्र काय म्हणाले ते कळंत. गॅरी विनोग्रॅंड या महान छायाचित्रकाराचं एक वाक्य आहे जे मी काम करताना नेहमी लक्षात ठेवतो. अशी फार कमी कोटस् असतात ज्यात एखाद्या कलेचं तत्वज्ञान नेमकं पकडलेलं असतं. ते कोट असं

“Photography is not about thing photographed. It is about how thing looks photographed”

किती विलक्षण तत्वज्ञान एका वाक्यात मांडलय! म्हटलं तर हे समजायला सोप्प आहे. पण खरच हे तीतकं सोपं आहे का? काय म्हणतोय गॅरी विनोग्रॅंड? तो म्हणतोय की तुमच्या छायाचित्रात जी गोष्ट दिसतेय ती काय आहे या पेक्षा ती कशी छायाचित्रीत केली गेलीय ते जास्त महत्वाचं. हे समजायला सोप्प पण अमलात आणायला फार कष्ट. अशी नजर तयार करण्यासाठी सातत्यानं झटावं लागतं.

उकीरड्यावर चरणारा बैल आपण कित्येकदा पाहिलाय. पण या छायाचित्रात तो जसा दिसतोय तसा तुम्हाला पुर्वी तो कधी दिसलाय का? त्या बैलाचे कातडी, त्यावरच्या सुरकूत्या, शिंग व त्यावर फासलेला लालभडक ऑईल पेंट. व या सर्वांच्या पाठीमागी ढगांचं नक्षीकाम. माझ्या गावातील रस्त्यावर फिरताना असे कित्येक मोकाट गायी बैल फिरत असतात. एकदा डोक्यात आलं की यावर काहीतरी का करू नये ? गॅरी विनोग्रॅंड म्हणतो तसं अतिशय सर्वसामान्य विषय वेगळेपणाने माडायचा का प्रयत्न करू नये ? हे गायी बैल अशा प्रकारे छायाचित्रीत करू की ती निव्वळ गुरं न रहाता पहाणार्याला काहीतरी नविन अनुभूती मिळाली पाहिजे. मग हे डोक्यात ठेवून फिरू लागलो आणि नेहमीची गुरं नविन दिसू लागली. आणि हे सर्व करताना गॅरी विनोग्रॅंड सोबत होताच. मिश्लिकपणे हसत. कारण हे सर्व त्याच्याकडून आलय.

  • इंद्रजीत खांबे.

Leave A Reply

Your email address will not be published.