उत्तरेत घोंगावणारं पहिलं मराठी वादळ म्हणजे वीर नेमाजी शिंदे !

आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की मराठ्यांनी अटकेपार झेंडा गाडला होता. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडली आणि शिंदे होळकर यासारख्या पराक्रमी सरदारांच्या मदतीने उत्तरेत मराठ्यांची दहशत निर्माण केली. अहद तंजावर तहद पेशावर मराठी सत्तेचा टाप घुमत होता.

याची पहिली सुरवात कोणी केली याच नाव आपल्या इतिहासाच्या पुस्तकात कधी येत नाही.

या योद्ध्याचं नाव म्हणजे वीर नेमाजी शिंदे

नेमाजी शिंदेंचा जन्म एका हटकर कुटुंबात झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांनी स्वराज्याची सेवा केली होती. जेव्हा शिवरायांचा मृत्यू झाला. मराठी सत्तेचा निःपात करण्यासाठी आलमगीर औरंगजेब दक्षिणेत उतरला. छत्रपती शंभूराजांनी त्याला लढा दिला मात्र फंदफितुरीचा वापर करून औरंगजेबाने स्वराज्याच्या या तरुण छत्रपतीची हत्या केली.

हा स्वराज्यासाठी मोठा धक्का बसला होता. औरंगजेबाला वाटल की आता मराठी मुलुख आपल्या कायमचा ताब्यात येणार.

पण तसं होणार नव्हत. अशा भावी संकटाची कल्पना करून शिवरायांनी अनेक वर्षांपूर्वी  दक्षिणेत दूर जिंजी किल्ल्याची व्यवस्था केली होती. छत्रपती राजाराम महाराज औरंगजेबाला हुलकावणी देऊन जिंजीला जाऊन पोहचले. मध्यंतरीच्या गोंधळाच्या काळात काही मराठे मुघलांना जाऊन मिळाले होते. असं म्हणतात की, नेमाजी शिंदे देखील यात होते.

पण काही काळातच आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर नेमाजी स्वराज्याच्या सेवेत हजर झाले.   

औरंगजेब जंगजंग पछाडून महाराष्ट्र जिंकण्यासाठी  ठाण मांडून बसला होता. पण संताजी, धनाजी यांच्या सारखे शूरवीर सरदार त्याला नामोहरम करण्यात गुंतले होते. त्यांनी तर त्याच्या छावणी वर हल्ला केला होता. नशिबाने औरंगजेब वाचला मात्र मराठी मावळ्यांची दहशत मुघल सैन्यात प्रचंड वाढली होती.

पण औरंगजेब बादशाह देखील महाजिद्दी होता. त्याचं सैन्य दमलं होतं तरी त्याने हार मानली नव्हती. तो त्वेषाने लढत होता.

मराठा सैन्याने महाराष्ट्रात बसलेल्या बादशाहला पळवून लावण्यासाठी आता आक्रमक धोरण स्वीकारलं. मुघलांच्या ठाण्यांवर हल्ला सुरु केला.

 १६९८ साली नेमाजी शिंदे हे आठ हजार फौजेसह खानदेशांत घुसले. नंदुरबार, शिरपूर, थाळनेर वगैरे गांवें लुटलीं. थाळनेरजवळ मोंगलांचा सरदार हुसेन-अल्ली याचा मोड करून त्याला पकडून कैदेंत ठेवले.  मोठी जबर खंडणी घेऊनच मग त्याची सुटका केली.

एव्हाना स्वतः राजाराम महाराज देखील जिंजीवरून स्वराज्यात परत आले होते.

त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर गंगथडी, खानदेश, वर्‍हाडपर्यंत जी मोठी मोहीम केली त्यात नेमाजी शिंदे आघाडीवर होते. राजाराम महाराजांनी मोहिमेवरून परत येतांना प्रत्येक प्रांतांत आपल्या एकेक सरदाराची नेमणूक बंदोबस्तासाठी केली, त्यांत नेमाजींच्या कडे खानदेश आला होता.

खानदेश मराठा साम्राज्यासाठी प्रचंड महत्वाचा होता. दख्खनमध्ये ठाण मांडून बसलेल्या औरंगजेब बादशाहला येणारी रसद, खजिना याच मार्गावरून जायचा. मुघलांच नाक नेमाजींच्या हातात आलं होतं.

राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार नेमाजीनी उत्तरेला लक्ष्य केले.

त्यांचे मुघल सुभेदार रुस्तुमखान याच्याबरोबर एलिचपुरजवळ युद्ध झाले.  या युद्धात नेमाजींचा मोठा विजय झाला. रुस्तुमखान मराठ्यांच्या कैदेत सापडला. हा मोगलांचा जबरदस्त पराभव होता.
रुस्तुमखानाने जबर खंडणी भरून आपली सुटका करुन घेतली.

नेमाजी शिंद्याच्या सैन्याने तेथून पुढे नर्मदा पार केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुट केल्यापासून पहिल्यांदाच मराठी घोड्यांच्या टापा उत्तरेत घुमू लागल्या होत्या.

नेमाजी नर्मदापार झाले  त्याबरोबरच मुघलांच्या माळवा सुभ्यात एकच हाहाकार उडाला.

“मराठ्यांचे सैन्य तीस चाळीस हजार असावे असा अंदाज मोगल बातमी पत्रात भेटतो”

नेमाजींच्या सैन्याने माळव्यातील शहरे लुटली, बुन्देलखंडात क्षत्रसालाबरोबर मैत्री दृढ केली. सिरोंज शहराला वेढा घातला. उत्तर हिंदुस्थानातून बादशाहकडे येणारा पाच-सात लाखांचा खजिना याच वाटेवर होता. आणि नेमका तोच टिपण्यासाठी मराठे टपले होते.

त्यांच्या मागावर गेलेल्या गाजीउद्दीन फिरोजजंग याने बादशाहला खोटेच लिहून कळवले की, आपला जय झाला आणि शेकडो मराठे मारले गेले. नेमाजी शिंदे यांनी हा सिरोंज चा वेढा उठवून जबलपूर जवळ गडमंडल्याकड़े निघुन गेल्याची बातमी वाचून आलमगीर औरंगजेबाला प्रचंड आनंद झाला. त्याने फिरोजजंगला सिपाहसालार अशी पदवी दिली आणि सैन्यातील अधिकाऱ्यांवर बढत्या आणि बक्षीसे यांची खैरात केली.

बिचाऱ्या औरंगजेबाला उशिरा कळले की फ़िरोजजंग हा नर्मदापार गेलाच नाही. सिरोंज जवळ लढाई झालीच नाही. आपणाला सपशेल बनविन्यात आले हे पाहुन बादशाह प्रचंड भडकला. फिरोजजंगची पदवी काढून घेतली. मुघलांची प्रचंड मोठी फजिती झाली होती.

पुढे काही वर्षांनी मुघल बादशाह औरंगजेब अहमदनगर येथे मेला.

मराठ्यांना संपवायचं स्वप्न बघून दक्षिणेत आलेला औरंगजेब मराठी मातीतच गाडला गेला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती ताराराणी बाईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेला लढा औरंगजेबाला झेपलाच नाही.

त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने शंभूपुत्र शाहू महाराजांची सुटका केली. त्यावेळी देखील नेमाजी शिंदे खानदेशातच सुभेदार असावेत. शाहू महाराज दक्षिणेत आल्यावर त्यावेळी त्यांना पहिल्यानें मिळालेल्या मंडळीत नेमाजी शिंदेंचा ही समावेश होतो.

१७०८ साली बहादुरशहानें कामबक्षावरील स्वारीत मराठ्यांची मदत मागितली असता शाहू महाराजांनी नेमाजी शिंदेनाच या कामगिरीवर पाठविले होते.

त्यांनी हैद्राबादनजीक चढाई करून कामबक्षाचा शेवट केला. नेमाजी शिंदे यांनी उत्तरेत मराठ्यांचे नाव गाजवले आणि त्यांनी पाडलेला पायंडा पुढे बाजीराव, शिंदे होळकर घराण्याने पुढे नेला. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा सत्तेने अटकेपार पेशावर पर्यंत मजल मारली याचे श्रेय काही प्रमाणात तरी नेमाजी शिंदे यांच्या सारख्या अज्ञात वीराला द्यावे लागेल हे नक्की.

संदर्भ- सप्तप्रकरण बखर; जेधे; शिवदिग्विजय; राजारामाची बखर; शाहूचें चरित्र 

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.