आज अॅप्पलचा बड्डे, पण खरा सहकारसम्राट तर “नोकियाच” होता.

आयफोन येवून १३ वर्ष झाली पण खरा सहकारसम्राट नोकियाच होता. 

पहिला आयफोन आला होता दिनांक ९ जानेवारी २००७ साली. या तारखेच तत्कालीन सर्वेसर्वा स्टिव्ह जॉब यांनी ९ वाजून ४१ मिनिटांनी आयफोन हे क्रांन्तीकारी अस्त्र बाजारपेठेत आणलं. याच कारणामुळे प्रत्येक आयफोनच्या जाहिरातीमध्ये वेळ हि ९ वाजून ४१ मिनिटांची दाखवण्यात येते.

याठिकाणी छोटा खुलासा काही राष्ट्रवादी पार्टिच्या मंडळींकडून राष्ट्रवादी पार्टीची स्थापना १० वाजून १० मिनीटांनी केली असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हात देखील १० वाजून १० मिनीटांचा उल्लेख करण्यात आल्याच सांगितलं जातं. सदरहू माणसांनी एकच नोंद घ्यावी की राष्ट्रवादीबाबत सांगण्यात येणारी गोष्ट हि बतावणी आहे. तस काही नाही पण आयफोनचं मात्र खरं आहे. असो खुलासा संपला. 

भक्तांकडून गुद्दे मिळण्याच्या आत मुद्यावर येवू. 

आयफोन अमेरिकेच्या बाजारात आला तेव्हा मी इयत्ता बारावीत होतो. तेव्हा टच स्क्रिन नव्हते. पण मार्केट खतरनाक होतं. नोकिया सगळ्यांचा बाप होतं. दूसऱ्या नबंरला सोनी एरेक्सन होता नंतर मोटरोला पण चालायचा. पण नोकिया गावच्या वाड्यात झोकाळ्यावर बसून कात कापणाऱ्या म्हाताऱ्यासारखा ठसठशीत होता. त्याच्या सिंहासनाच्या जवळ जायचं धाडस पण कुणाच नव्हतं. 

मला आठवणारा फोन म्हणजे नोकियाचा 6233. दोन्ही बाजूला स्पिकर होते. वर मेमरी कार्ड. हा फोन लय दंगा करायचा. पण आव्वाज सॉलिड. नोकिया 3315, 3310,1100 टाईप ब्लॅकअॅन्ड व्हाईट फोनच मार्केट आत्ता मल्टिमिडीया फोनने घेतलं होतं.

पोरं एकमेकाला विचारायची मल्टिमिडीया हाय का? मेमरी कार्ड कितीच? 128 KB मेमरी हि अफाट मेमरी असायची. यात सगळं म्हणजे सगळं बसायचं. सगळ्यात चार रुपयेला एका 3GP क्लिप यायची. चाळीस पन्नास क्लिप निवांत बसायच्या.

नोकियाची N सिरीज तेव्हा श्रीमंतीचे चोलले होते. तो फोन कुठ बघायला मिळाल तरी लय भारी वाटायचं. N81 मध्ये 4 GB आणि 8GB असे दोन प्रकार असायचे. 128 केबीवाल्या पोरांना जीबीच मेमरी म्हणजे सरळ सरळ किती क्लिपांचा हिशोब मांडायचा डाव होता. मग ते कंपास सारखा ओपन होणारा E सिरीज यायचा. अंड्यासारखा 6600 होता. खालून वरुन क्रॉप केलेला 7610 होता.

मुळात नोकियाने प्रत्येकाच्या हातात फोन ठेवलेला. खरा सहकार सम्राट नोकियाच होता. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हातावर फोन ठेवण्याच काम नोकियाने केलेलं. जशी ज्याची लायकी असले तस त्यानं कर्ज उचलायचं असा प्रकार होता तो. नोकिया पण सहकार बुडत नसतो याच जोशात फुल्ल ऑन टशनमध्ये होतं. थोडक्यात क्लिपा, गाणी, पिक्सल म्हणजे ऊस, पाणी, उतारा, दर टाईप लोकांच्या आयुष्यात फिक्स झालेल्या. 

पण अखेर तो घातवार उजाडला. दिनांक ९ जानेवारी २००७.

टिव्हीवर आयफोन आयफोन म्हणून सगळे नाचत होते. तसा आयफोन हातात येण्याची काहीच लक्षण अख्या गावात कुणाकडे नव्हती. पण सहकारातून क्रांन्तीची स्वप्न पाहणाऱ्या घरातच भांडवलदारांची पिढी जन्माला आली. त्यांच्या हातात वर्षाभरात आयफोन आले.

आयफोन हे श्रीमंतीच प्रतिक असत हे माहिती होवू लागलं. आत्ता गरिबांसाठी सॅमसंग कॉर्बी सिरीज घेवून मार्केटमध्ये आली. नोकिया आपल्याला काय होतय या अविर्भावात होती. पण मार्केट टच स्क्रिनच आलेलं. नवमध्यमवर्गीयांना १० हजारात टचस्क्रिन कॉर्बी होता तर श्रीमंतासाठी अॅप्पल.

पण फिचर बघून कवळ्या पोरांचा जीव जळायचा. याच काळात चायना मेड मोबाईल आले. तेच फिचर टच स्क्रिन फोन, चार हजारापासून पुढे फोन असायचा. लय लय महाग म्हणजे सहा हजार. त्यात दोन सिम, टिव्ही, पाच सहा स्पिकर आणि सोबत ‘आरेरे मेरी जानं हैं राधा’ नायतर ‘काला कौंआ काट खाये गा’.

खऱ्या अर्थाने भांडवलशाहीचं ते सार्वत्रिकरण होतं. यात चायना आघाडीवर आलेलं. कोरियाच्या सॅमसंगने पण बाजी मारायला सुरवात केलेली. मोबाईलमध्ये GPRS च स्पीड वाढत होतं. डिस्पेलला दिसणाऱ्या पृथ्वीने जोरात फिरायला सुरवात केलेली. 

सॅमसंग तेव्हा गुरू सिरीज घेवून आलेला.

हेडफोन नंतर थ्री डी सराऊंडची जाहिरात होती. एक्सेपरिंयन्स नावाने जोरात मार्केट वढत होती. आत्ता नोकियाचा बाजार उठायला सुरवात झालेली.  अॅन्ड्राॅईडची ओळख पहिल्यांदा गेम मुळे कळत होती आणि हे नोकियाची कुठली कुठली OS म्हणून लोकांना गंडवत होते. शेवटचा आचका दिल्यासारखं नोकियाने टचस्क्रिन फोन काढलेला आठवतोय. नंतर नोकियाचा विंडोज झाला पण सहकार बुडला तो बुडलाच. 

आत्ता पर्याय फक्त सॅमसंग होता. काही वर्ष सॅमसंग लय बाप फोन म्हणून मार्केटमध्ये खेळला. पण भांडवलशाहीच मुळ असणारा आयफोन आजून आवाक्यात आला नव्हत.

आणि एकदिवस ABP माझावर बातमी आली. आयफोन 5C साडेसात हजार रुपयात. च्या गावात. पोरं पुण्यात येवून चौकशी कराय लागली. बातमी खोटी होती. अमेरिकेत दिलेल्या डॉलरमधल्या स्कीमला ABP माझाने रुपयात गुणलं होतं. त्यांची पण चुक नव्हती म्हणा. सगळ्यांनी थेट गुणलेलं पण गुत्तेदारी कळाली नव्हती.

एक वर्षात 5S आणि 5C आवाक्यात आला. बऱ्यापैकी लोकांच्याकडे आयफोन दिसू लागला. मधल्या काळात चायना फोनने कात टाकून आप्पो, लावा सारखं रुप घेतलं. मार्केट खऱ्या अर्थाने ओपन झालं. पण अॅप्पल श्रीमंताचा होता तो तसाच राहिला. 

सॅमसॅंगने गॅलेक्सी काढली आणि आम्ही पण श्रीमंताच्या लाईनीत जावू शकतो दाखवलं. गरिबीतून श्रीमंतीकडे प्रवास होता. पण यात अॅन्ड्राॅईड टिकून होती. कॅमेरा, स्पीकर, हेडफोन आल्यानंतर सगळ्यांनी OS कडे लक्ष दिलं. 

आज गुगलचा पण फोन आहे. एकेकाळी आम्ही गुगलवर गुगल सर्च करुन पुढच सर्च करायचो. काळ जोरातच पुढं आलाय पण एक गोष्ट आहे, मेलेल्या सहकाराचं आपण ग्लोरिफिकेशन करु शकतो, समित्या बसवून कारणं मांडू शकतो पण चूकांच समर्थन करता येत नाही.

त्या दिवशी स्टिव्ह जॉबने बऱ्याच जणांना कामाला लावलं. आज दहातल्या पाच जणांकडे अॅप्पल असतोय तेव्हा जोतिबा डोंगराव जावून ओरडून सांगाव वाटतं, आयफोन फोर वापरल्याला सहकाराचा पुत्र हाय ह्यो पठ्या.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.