शक्तिमानच नाही तर नव्वदीच्या या देशी सुपरहिरोंवर सुद्धा पिक्चर बनायला पाहिजे

रविवार तसा सगळ्यांसाठीचं स्पेशल असतो. सुट्टी असल्यामुळं काहींचे वेगवगळे प्लॅन ठरलेले असतात तर काहींचं निवांत लोळत बसायचं असं तरी ठरलेलं असतं. पण भिडू नव्वदीच्या पोरांचा मात्र एक प्लॅन ठरलेला असायचा. तो म्हणजे रविवारी १२ वाजले कि, हातातलं सगळं काही सोडून टीव्हीसमोर येऊन बसायचं, तासभर सगळे अगदी चिडीचूप राहून टीव्हीसमोर येऊन बसायचे. कारण सगळ्यांचा आवडता सुपरहिरो शक्तिमान यायचा.

लाल आणि गोल्डन कपड्यांमध्ये मुकेश खन्ना आपल्या पॉवरनं सगळ्यांची मदत करायचा, याची वेगळी छाप सगळ्यांचा मनावर पडलेली.  १३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २००५ हा काळ शक्तिमानने खूप गाजवला, त्यावेळी त्याच्याएवढी पॉप्युलॅरीटी क्वचितचं कोणाला मिळाली असेल. पण नंतर हा शो बंद झाला आणि बऱ्याच जणांचं बालपण डोरिमॉन, हातोडी सारख्या विदेशी कार्टूनमध्ये विभागलं गेलं. 

पण आता सगळ्यांचा लाडका शक्तिमान मोठ्या पडद्यावर येणार आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शनने सुपरहिरो ‘शक्तिमान’ बद्दल चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. या सिरीजचे तीन चित्रपट बनणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर बऱ्याच लहान पोरासोरांच्या चेहऱ्यावर हसू आलं असणार हे फिक्स… 

पण भिडू ९० च्या पोरांच्या बालपणात जसा शक्तिमानचा वाटा येतो. तसा बाकीच्या देशी सुपरहिरोंचा सुद्धा आहे. त्यामुळं त्यांची चर्चा सुद्धा झालीच पाहिजे आणि मी तर म्हणते या सुपरहिरोंवर सुद्धा पिक्चर काढायला पाहिजे.

नागराज

 नागराज कॉमिक्सच्या जगातला पहिला सुपरहिरो होता. देसी सुपरहिरो असणाऱ्या नागराजमध्ये अनेक प्रकारच्या शक्ती होत्या, तो आपल्या हातातून साप सोडायचा, त्याचं रक्त खूप विषारी होते. आपल्या पराक्रमाच्या जोरावर तो दुष्मनांचं येडं पळवायचा. तो सुद्धा शक्तिमान सारखं कॉमन मॅनची लाईफ जगायचा पण अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी नागराज बनायचा. 

शक्ती

‘शक्ती’ ही एक दमदार वूमन सुपरहिरो होती. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा देणे हे शक्तीचं ध्येय होतं. कालिका देवीने आपली शक्तीला आपली सगळी शक्ती दिलेली. ती तिच्या हाताने आगीच्या गोळ्यांचा वर्षाव करायची आणि कोणत्याही धातूला आपलं शस्त्र बनवायची. एवढंच नाही तर आपल्या तिसऱ्या डोळ्याने ती दुश्मनांना भस्म करायची. 

डोगा

डोगा हा एक सुपरहिरो होता जो कुत्र्यांशी बोलायचा. दहशतवाद्यांपासून ते ड्रग्ज डिलरपर्यंत सगळ्यांना तो चांगलाच धडा शिकवायचा. असं म्हणतात  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यावर चित्रपट बनवणार होते, पण त्याच पुढं काय झालं हे कोणालाच कळलं नाही.

परमाणु

९० च्या दशकात, हा सुपरहिरो लहान पोरांपासून पार वयस्कर लोकांमध्ये सुद्धा फार फेमस होता. त्याच्याकडे ‘प्रोबॉट’ नावाचा एक रोबोट असायचा जो त्याला अडचणीत मदत करायचा. परमाणू जो सूट घालायचा तो त्याला परमाणू हल्ल्यापासून वाचवायचा. आणि गरज पडली कि त्याला उडायला आणि आकाराने लहान होण्यासाठी मदत करायचा. आणि दिवसा तो इन्स्पेक्टर विनयच्या नावाने गुन्हेगारांना धडा शिकवायचा.

देवी

 

देवी ही एक सुपरवुमन होती, जी माँ दुर्गापासून प्रेरित. बाला नावाच्या शत्रूशी लढण्यासाठी ती दुसऱ्या शतकात आली होती. बाला हा एका धोकादायक सेनापतीचा अवतार होता ज्याची आसुरी शक्ती आणि विचार चुकून देवीला जागृत करतो. देवी तारा मेहताच्या रूपात पुन्हा जन्म घेते.

सुपर कमांडो ध्रुव

 

‘सुपर कमांडो ध्रुव’ हा सर्वात लोकप्रिय देसी सुपरहिरो आहे. ध्रुवकडे कोणत्याही प्रकारची महाशक्ती नव्हती, पण तरीही तो आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर शत्रूवर तुटून पडायचा. सामान्य लोकांना येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी तो मदत करायचा.

अंगारा

अंगारा बाकीच्या सुपरहिरोपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.  त्याचे शरीर मनुष्यासारखे होते, पण त्याच्याकडच्या शक्ती प्राण्यांच्या होत्या. निसर्ग आणि प्राण्यांचे  संरक्षण करणे हा त्याचा उद्देश होता. त्याची त्वचा बुलेटप्रूफ, मेंदू कोल्ह्यासारखा चपळ आणि हत्तीसारखा बलवान होता.

इन्स्पेक्टर स्टील

या कार्टूनची स्टोरी अशी होती कि, एक राज नावाचा साधा इन्स्पेक्टर होता, जो एका भांडणात सापडतो आणि खूप जखमी होतो. तेव्हा एक प्रोफेसर त्याचा मेंदू एका रोबोटमध्ये बसवतो आणि अशा प्रकारे इन्स्पेक्टर स्टीलचा जन्म होतो. हा सुपरहिरो मानव आणि यंत्र या दोन्ही शक्तींनी सुसज्ज होता. यात एक्स-रे व्हिजन, लाय डिटेक्टर, स्कॅनर आणि गोळ्या आणि शेल फायर करण्यासाठी बंदूक देखील होती.

आता अश्या इन्स्ट्रेस्टिंग आणि इन्स्पायरिंग सुपरहिरोंची स्टोरी आजच्या पोरांना तर सांगून समजणारी नाही. त्यामुळं विदेशी कार्टूनच्या गराड्यात या देशी सुपरहिरोंवर पिक्चर काढायला हवा असा भिडूचा तरी मुद्दा आहे.

 

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.