जगाचं रक्षण करणाऱ्या शक्तिमानला अरुण जेटलीनीं वाचवलं होतं.

नव्वदच्या दशकात दर रविवारी दुपारचा १२ ते १चा वेळ आम्ही शक्तिमान साठी बुक केलेला असायचा. भीष्म इंटरनशनल प्रेजेंटस शक्तिमान !! लगेच एक फाड फाड आवाज करनाऱ्या वादळाच्या स्वरुपात गोल गोल फिरत शक्तिमान हजर व्हायचा आणि विठोबा सारखं कमरेवर हात ठेवून उभा राहायचा. त्याच्या टायटल सॉंगमध्येच त्याची महानता सांगितलेली.

अद्भुत अदम्य साहस की परिभाषा म्हणजे शक्तिमान. मिटती मानवता की एक आशा म्हणजे शक्तिमान. शक्तिमान म्हणजे सृष्टी की शक्ती का वरदान पण त्याच्या बरोबरच डिस्क्लेमर दिलेला की ये अवतार नही ये इन्सान है.

योग प्राणायाम यातून मिळवलेली शक्ती तो तमराज किल्विशचा अंधेरा कायम राहू नये यासाठी वापरायचा. कपाला, डॉक्टर जेकॉल गेला बाजार केकडामॅन, स्टोनमॅन, किटाणूमॅन, काली बिल्ली असे अनेक संकटे तो पळवून लावत होता आणि गंगाधर विद्याधर ओंकारनाथ शास्त्री बनून जोक सुद्धा मारायचा. गीता विश्वासला फ्रेंड झोन करून ठेवलेलं आणि आमच आयुष्य व्यापून टाकलेलं. तो सांगतोय ती छोटी छोटी मगर मोटी बाते आम्ही ऐकायचो. आज पण चूक झाल्यावर आमच्या तोंडून सॉरी शक्तिमान निघत. असो.

तर झालं काय की १९९७ साली दूरदर्शनवर ही सिरीयल आली आणि आल्या आल्या आम्हाला या सिरीयलने वेड लावून टाकलं. रामायण महाभारत नंतरची टीआरपी शक्तिमानने मिळवलेली. शक्तिमान स्टाईलचे कपडे सुद्धा बाजारात आले. आमच्या सारखे खऱ्या आयुष्यातले गंगाधर तो ड्रेस घालून गोल गोल फिरत शक्तिमान बनू लागले.

काही लेकरांना शक्तिमान होऊन उडण्याची एवढी आवड निर्माण झालेली की त्यांनी बिल्डींग वरून उडी मारली. म्हणजे आम्ही काय बघितल नाही कोणाला असं करताना पण टीव्हीवर बातम्या मात्र आल्या. पालक लोकांची फाटली. आमच्यावर लक्ष ठेवण्यात येऊ लागलं. खुद्द शक्तिमान सुद्धा हादरला. त्यांनी छोटी छोटी मगर मोटी बाते मधून शान करण्याचा प्रयत्न केला पण बातम्या थांबत नव्हत्या.

विषय राज्यसभेपर्यंत जाऊन पोहचला. सगळ्या खासदारांनी संसदेत शक्तिमान विरुद्ध निदर्शने केली. अखेर एकदिवस दूरदर्शनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी शक्तिमान उर्फ मुकेश खन्नाला सांगितलं की,

“तुमच्यामूळ बरीच मूल आत्महत्या करत आहेत. तुमचा शो लहानमुलांसाठी डेंजरस आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या शक्तिमानला बंद करायचं ठरवलं आहे.”

मुकेश खन्नाच झटक्यात शक्तिमानमधून गंगाधर मध्ये रुपांतर झालं. एवढे पैसे इन्वेस्ट केले होते. आयुष्यातला सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. अचानक बंद केलं जाणार म्हणजे काय? त्याकाळी एका न्यूजएजन्सीने ही बातमी विशेष लावून धरली होती. बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्र इथल्या चार घटना त्यांनी पुरावा म्हणून सादर केल्या होत्या.

मुकेश खन्नांनी सगळ्यात पहिलं काम केलं की एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीला अशा घटना खरोखर घडत आहेत का हे तपासायला लावलं. त्यांची टीम बेगुसराय पासून कर्नाटकपर्यंत पोहचली. तिथे त्यांना कोणतेही तथ्य आढळून आले नाही. लहान मुलांच्या अपघाताला शक्तिमानशी बादरायण संबंध जोडण्याचा मिडियाचा हा खोडसाळपणा होता. 

मग मात्र मुकेश खन्नांनी ठरवलं की या मिडीयाला धडा शिकवायचा. त्यांच्यावर पाच कोटीचा मानहानी चा दावा ठोकायची तयारी केली. मग कोणीतरी सांगितल की मानहानीच्या दाव्याच्या प्रमाणात स्टंप ड्युटी देखील भरावी लागते. हे ऐकल्यावर शक्तिमान थोडेसे गार झाले. पंचवीस लाखाचा दावा केला.

आप की अदालतवाल्या रजत शर्मा यांच्याशी त्यांची चांगली जान पेहचान होती. रजत शर्मांनी त्यांना सांगितल की कोणीतरी शक्तिमानविरुद्ध साजीश करत आहे. त्यांनीच मुकेश खन्नाला दिल्लीतला सर्वोत्तम वकील गाठून दिला. त्याचं नाव अरुण जेटली.

अरुण जेटली तेव्हा राजकारणात होते पण अजून मंत्रीपद वगैरे मिळालं नव्हतं. भाजपचे प्रवक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. मुकेश खन्नांनी शक्तीमान विरुद्ध बातम्या छापणाऱ्या युएनआय या वृत्तसंस्थेला आणि दूरदर्शनला हायकोर्टात खेचलं. जेटलींना बघितल्यावर पहिल्याच दिवशी युएनआयने माघार घेतली पण दूरदर्शनच्या वकिलांनी माघार घेतली नाही.

जवळपास सहा महिने ही केस चालली. एकदा दूरदर्शनच्या वकीलांनी कोर्टात काही पत्रे दाखवली ज्यात उल्लेख होता की आमच्या मुलांना शक्तिमान मुळे  अपघात होत आहे. जेटलींनी मुकेश खन्ना यांच्या कानात काही तरी सांगितलं. दुसऱ्या दिवशी मुकेश खन्नांनी आपल्या मुंबईच्या ऑफिस मध्ये रोज शक्तिमान साठी येणाऱ्या पत्रांचा ट्रक भरून दिल्ली हाय कोर्ट मध्ये आणला.

जेव्हा न्यायाधीश कोर्टात आले तेव्हा त्यांना तो पत्रांच्या बोचक्याचा ढीग दिसला. ते समजायचं ते समजले. अरुण जेटलींच्या या समयसूचकतेमुळे निकाल शक्तिमान यांच्या बाजूने लागला. पण निकालाच्या दिवशी अरुण जेटली गैरहजर होते.

दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात काही मंत्र्यांचा शपथविधी होत होता. मुकेश खन्ना यांना सुद्धा निमंत्रण होतं. तिथे गेल्यावर त्यांना कळाल आपले वकील असणारे अरुण जेटली अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारात मंत्री झाले आहेत.
पुढे अनेक वर्ष शक्तिमान चालले. मुकेश खन्नात्याचे सगळे श्रेय अरुण जेटली यांना देतात.

पुढे अनेक वर्ष भाजप सरकारमध्ये संकटमोचक म्हणून काम केलेल्या अरुण जेटलींनी खुद्द शक्तिमानला कसं वाचवलेलं हा किस्सा मुकेश खन्ना आपल्या प्रत्येक मुलाखती मध्ये सांगतात.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Pallavi Deshmukh says

    Very very informative.

  2. Pallavi Deshmukh says

    Very very informative

Leave A Reply

Your email address will not be published.