किल्विशच्या तावडीतली पोरं सोडवायला शक्तिमान स्वतः अकलूजात आला होता

नव्वदच्या दशकात दर रविवारी दुपारचा १२ ते १ चा वेळ आम्ही शक्तिमानसाठी बुक केलेला असायचा. भीष्म इंटरनशनल प्रेजेंटस शक्तिमान !! लगेच एक फाड फाड आवाज करनाऱ्या वादळाच्या स्वरुपात गोल गोल फिरत शक्तिमान हजर व्हायचा आणि विठोबा सारखं कमरेवर हात ठेवून उभा राहायचा. त्याच्या टायटल सॉंगमध्येच त्याची महानता सांगितलेली.

अद्भुत अदम्य और साहस की परिभाषा है. मिटती मानवता की आशा है. शक्तिमान सृष्टी की शक्ती का वरदान…शक्ती शक्ती शक्ती शक्तिमान

पण त्याच्या बरोबरच डिस्क्लेमर दिलेला की ये अवतार नही ये इन्सान है.

योग प्राणायाम यातून मिळवलेली शक्ती तो तमराज किल्विशचा अंधेरा कायम राहू नये यासाठी वापरायचा. कपाला, डॉक्टर जेकॉल गेला बाजार केकडामॅन, स्टोनमॅन, किटाणूमॅन, काली बिल्ली असे अनेक संकटे तो पळवून लावत होता. आणि गंगाधर विद्याधर ओंकारनाथ शास्त्री बनून जोक सुद्धा मारायचा. गीता विश्वासला फ्रेंड झोन करून ठेवलेलं आणि आमच आयुष्य व्यापून टाकलेलं. तो सांगतोय ती छोटी छोटी मगर मोटी बाते आम्ही ऐकायचो. आज पण चूक झाल्यावर आमच्या तोंडून सॉरी शक्तिमान निघत. असो.

तर हा शक्तिमान मोहिते पाटलांच्या अकलूज मध्ये आला होता त्याचाच हा किस्सा 

१९९८-९९ च्या काळात शक्तिमान मालिकेवेळी बहुतांश घरात टेलिव्हिजननी प्रवेश केला होता. शक्तिमान हि लहान मुलांसाठी असलेली मालिका प्रचंड लोकप्रिय झालेली होती. लहान मुलांबरोबरच मोठ्यांना ही या मालिकेने अक्षरशः वेड लावलं होत हे काही नव्याने सांगायला नको. त्यावेळी बरोबर अकलूजच्या बाल आनंद मेळाव्यात शक्तिमान आला होता.

शक्तिमान आला होता म्हणण्यापेक्षा विजयसिंह मोहिते पाटलांनी महाराष्ट्रातल्या मुलांना शक्तिमान बघायला मिळावा म्हणूनच त्याला बाल आनंद मेळाव्यात आणलं होतं. 

अकलुज मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय आहे. या संस्थेला सन १९९८-९९ मध्ये ५० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने पुणे-पंढरपुर रोडवर आनंद यात्रा भरवण्यात आली होती. हि यात्रा भरवण्याचे मुख्य श्रेय विजयसिंह मोहिते पाटलांना जातं.

संस्थेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेजचे आणि देशभरातून आलेले इतर असे जवळ जवळ २५ ते ३० हजार विद्यार्थी ५ दिवस एकत्र मुक्कामी ठेवण्याचे आयोजन करण्यात आलं होतं. सदर यात्रेवेळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, छोट्याच पण खऱ्या खुऱ्या युद्धाचे प्रात्यक्षिक, वेगवेगळे खेळ यामुळे सदर यात्रा खुपचं आकर्षक ठरली होती. संस्थेच्या विद्यार्थ्यांबरोबरच तिकीट ठेवुन बाहेरील विद्यार्थी व सर्व सामान्य लोकांनाही या यात्रेत प्रवेश देण्यात आला होता. 

विजयसिंह मोहिते-पाटील व संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजना खाली आनंद यात्रेची इतकी प्रचंड प्रसिद्धी झाली की त्यावेळी Britaniya व Parle-G कंपनीने सर्व मुक्कामी मुलांसाठी सलग ५ दिवस बिस्कीटांची मोफत सोय केली होती. 

आनंद यात्रा यशस्वी होण्याचे अनेक किस्से सांगितले जाऊ लागले. 

अकलूज मध्ये असणाऱ्या अभिनव अमृततुल्य चहाचा ५ दिवसांत २/३ लाखांचा धंदा झाल्याचे बोलले जाऊ लागले यावरुन या यात्रेची प्रसिद्धी लक्षात येते. 

तर अशा प्रचंड यशस्वी झालेल्या आनंदयात्रेवर आपल्याही मालिकेचा एक एपिसोड असावा असा मोह शक्तिमान मालिकेचे निर्माते व शक्तिमानची भुमिका करणारे अभिनेते मुकेश खन्ना यांना झाला. शक्तिमान मध्ये किल्विशचा नावाचा अंधेरा कायम रहे म्हणणारं कॅरेक्टर या आनंदयात्रेतील मुलांना बंदी बनवतो. आता मुलांना वाचवायला पाहिजे म्हणून शक्तिमान या सर्व मुलांची किल्विशच्या तावडीतुन सुटका करतो असा तो भाग होता. 

त्याकाळी मोबाईलची तर सोय न्हवतीच. पण जे कॅमेरे उपलब्ध होते त्याच रिजोल्यूशन हि कमी असायच. अशाच एका कॅमेरातुन, सर्व प्रकारची सुरक्षा कवच तोडुन, प्रचंड धक्काबुक्की खात शक्तिमान जवळ जाऊन एकदाचा फोटो काढूया असं त्या यात्रेतल्या प्रत्येकाला वाटत होतं. काहींनी तसा प्रयत्न केला. शेवटी शक्तिमान बरोबर फोटो काढण्याचं सुख फक्त ९०’s च्या मुलांनाच समजू शकत. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.