जगाच्या पेज थ्रीवर झळकलेला पहिला मराठी माणूस… आपला सचिन!

तो मैदानावर आला की आपल्याला भारी वाटायचं. त्यानं गार्ड घेतला की पोटात खड्डा पडायचा. तो एखादा बॉल हुकला, की आपली नजर हळूच देवाकडे जायची. त्याच्या प्रत्येक शॉटमध्ये आनंद असायचा. तो रन काढायला पळाला की त्यात जिद्द असायची आणि त्याच्या शतकात आपला आनंद असायचा.

त्यानं आपल्याला स्वप्न बघायला शिकवलं, ती पूर्ण होतात हेही शिकवलं आणि जे आवडतं त्यात लाऊन धरलं की आपण नुसते माणूस नाय देवही होऊ शकतो, हेही शिकवलं.

तो, सचिन रमेश तेंडुलकर.

कुरळ्या केसांचा, गळ्यात सोन्याची बारीक चेन घालणारा, निरागस हसणारा आणि आपल्या सारखंच मराठी बोलणारा… पहिला मराठी सुपरस्टार.

WhatsApp Image 2022 04 23 at 11.00.29 PM

आपलं पहिलं प्रेम आठवायला आपल्याला डोक्याला ताण द्यावा लागत नाही, तसंच पहिल्यांदा सचिनला कधी पाहिलं हे आठवतानाही. आपल्या प्रत्येकाची एक खास ‘सचिन मेमरी’ असते. त्यानं मारलेलं एखादं शतक, त्याचा एखादा छकडा किंवा पेपरमध्ये आलेला कापून वहीत ठेवलेला फोटो, अगदी काहीही.

आपल्यातले कित्येक जण सचिनच्या जन्मानंतर लय वर्षांनी जन्माला आले, पण आपण सगळे लहानाचे मोठे झालो सचिनसोबतच.

कारण सचिनचं पदार्पण आणि आपलं कळतं वय सोबतच सुरू झालं. सचिननं नाकावर बॉल खाल्ला तेव्हा आपल्यातली काही पाळण्यात होती, काही बाराखडी शिकत होती आणि काहींनी ते फुटलेलं नाक बघितलं. तात्पर्य आणि शिकवण हे लय जड शब्द झाले, पण १५ वर्षांचं पोरगं नाक फुटून फास्ट बॉलिंग खेळायला उभं राहतं हा लय मोठा विषय होता.

पुढं दिवस बदलत गेले… आपलेही आणि सचिनचेही!

आपण जिंदगीत सिंगल डबल घेत होतो, तेव्हा हा गडी शतकांची माळ लावत होता. आपल्या प्रगतीपुस्तकावर शेरे येत होते आणि याचं नाव हेडलाईन्समध्ये चमकायचं. आपण जी स्वप्न बघत होतो, ती सचिन पूर्ण करत होता. लय उशिरा समजलं की, ही आपण एवढी मोठी स्वप्न बघायचं कारणच हा साडेचार-पाच फुटी माणूस होता.

क्रिकेट म्हणजे महाग खेळ असं वाटणाऱ्या देशात सचिननं क्रिकेट प्रत्येक गल्लीत पोहोचवलं. लोकाच्या खिडक्या फोडल्यावर भारी वाटायचे ते दिवस होते.

आपली पिढी मोठी होत होती, तिथं दुसऱ्या पिढीचं वय वाढत होतं. त्यांची जिंदगी रुटीनला लागली होती किंवा त्यांच्या जिंदगीला रुटीन लागलं होतं, कसंही वाचा, सेमच. या लोकांसाठी सचिन मनोरंजनापलीकडं कधी गेला हेच समजलं नाही. कामाचा कितीही लोड असू द्या, रेडिओवर, रस्त्यात कुठल्या तरी टीव्हीवर मॅच बघायला थांबायचं. कसलीच लाज न बाळगता, त्या सामग्रीच्या मालकाला विचारायचं…

सचिन कितीवर खेळतोय?

त्याच्या रनच्या आकड्यावर लोकांचा मूड ठरायचा, म्हणजे विषय किती भारी आहे बघा. हर्षा भोगले म्हणाला होता, “If Sachin bats well, India sleeps well.” एका माणसाच्या क्रिकेटमधल्या बॅटिंगवर भारतीयांची झोप अवलंबून होती. याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट काय असू शकते.

सचिननं आधी आपली झोप जिंकली आणि मग आपल्यासकट सगळ्या भारताला…!

शारजामध्ये सचिनला खेळताना बघितलं तेव्हा तर आपण स्वतः हिरो असल्यासारखं वाटलं. भारतासमोरचं टार्गेट अवघड काय असतं, धुळीचं वादळ काय येतं, सचिन ऑस्ट्रेलियाला इतका बेक्कार काय तुडवतो आणि त्याचवेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये टोनी ग्रेग काय असतो, सगळं कसं स्वप्नवत होतं.

हिमेश रेशमियाचा आवाज आणि इमरान हाश्मीचं असणं जसं आपण वेगळं करु शकत नाही, तसं टोनी ग्रेगचा आवाज कायम…

‘Sachin Tendulkar whatta playa, whatta wonderful playa’ असाच इमॅजिन होतो.

सचिननं पाकिस्तानला धुतल्यापेक्षा जास्त आनंद त्यानं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला तोडल्यावर व्हायचा. मॅकग्रा, ब्रेट ली, अँडरसन, फ्लिंटॉफ आपल्यासमोर खांदे पाडायचे ती फिलिंग लय बाप असायची. कारण नाही म्हणलं, तरी गोऱ्या रंगासमोरचा आपला न्यूनगंड सचिनमुळंच गेला. समोरच्या अकरा जणांना आपला एक बादशहा भारी पडायचा आणि आपली छाती तीन इंचानं फुगायची.

सचिनच्या आधी (आणि नंतरही) क्रिकेट विश्वातला राजा म्हणजे सर डॉन ब्रॅडमन. क्रिकेट कोळून पिलेले इंग्लिश म्हातारे ब्रॅडमनचं कौतुक म्हणून त्याला शिव्या घालायचे. ब्रॅडमन म्हणजे सर्वोच्चतेचं परिमाण.

आपला सच्या ब्रॅडमनला भेटायला गेला, तेही शेन वॉर्नसोबत. ब्रॅडमन त्याला म्हणाले, ”मी कधी मला स्वतःला खेळताना पाहिलं नाही. पण तुला खेळताना बघितलं की असं वाटतं तुझी आणि माझी खेळायची स्टाईल सेम आहे.”

WhatsApp Image 2022 04 23 at 10.58.15 PM

सचिन खऱ्या अर्थानं ग्लोबल झाला, कारण जे जग ब्रॅडमनला पूजत होतं, तोच ब्रँडमन सचिनची तुलना स्वतःशी करत होता.

आपल्याकडे सचिनचं हेडलाईन्समध्ये येणं काही नवीन नव्हतं, पण सचिन विम्बल्डन बघायला गेला की तिकडच्या इंग्लिश पेपरमध्येही बातमी झळकायची. काळा सूट, टाय, गळ्यात तीच बारीक चेन आणि डोळ्याला गॉगल असल्या अवतारातला सचिन पाहून एक नंबर वाटायचं.

डोनाल्ड ट्रम्प भारतात येतो तेव्हा सचिनचं नाव घेतो, बोरिस जॉन्सनला आपले भारतात लागलेले होर्डिंग्स बघून सचिन आठवतो आणि जगातला कुठलाही प्लेअर १० टक्के भारी खेळला की त्या देशाला तो त्यांचा सचिन वाटतो.

लिहिण्यासारखं किती तरी आहे आणि बोलण्यासारखंही. सचिननं आपल्याला क्रिकेट बघण्याच्या पलीकडं नेऊन ठेवलं. आपण मध्यमवर्गीय घरात जन्माला आलो आता नोकरी-छोकरी-पोरं-रिटायरमेंट याच चक्रात अडकून राहणार हा गैरसमज मोडायला एक टक्का प्रेरणा सचिनची होती.

निवृत्तीनंतरचा सचिन कित्येकांना आवडला नाही, पण साला तो मैदानावर असला की जिंकायचा विश्वास असायचा. काहीतरी भारी होईल असं वाटत राहायचं आणि ते व्हायचंही.

आपण मरण्याआधी आपल्या आयुष्याचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोरुन जातो असं म्हणतात, आपल्या डोळ्यांमोरुन गेला तर त्यातली काही सेकंद सचिनची असतील. ज्यात तो गार्ड घेईल, बारक्या डोळ्यांनी इकडं तिकडं बघेल, बॅट दोन तीनदा जमिनीला टॅप करेल, बॉल त्याच्या बॅटच्या मध्यभागी बसेल आणि सनाट स्पीडनं ही स्ट्रेट ड्राईव्ह बाउंड्रीपार जाईल.

बास त्या क्षणानंतर डोळे मिटावेत आणि कानात मधल्या तीन टाळ्यांसकट एक आवाज घुमावा…

सचिन… सचिन!!

  • भिडू चिन्मय साळवी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.