दीड वर्षाआधी टीमकडे साधे शूज नव्हते, आज झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा पराक्रम केलाय…

आम्हाला पत्रकारिता शिकवताना एक गोष्ट कायम सांगायचे, ‘कुत्रा माणसाला चावला, तर बातमी होत नाही. माणूस कुत्र्याला चावला तर मात्र बातमी होते.’ हे उदाहरण एवढीच गोष्ट सांगायचं की, काहीतरी वेगळं घडलं तरच ती बातमी होते. हे आज आठवण्याचं कारण म्हणजे, झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाच्याच होम ग्राऊंडवर हरवलंय. बरं तेही पार घासून जिंकले असंही नाही, तर ११ ओव्हर्स आणि ३ विकेट्स हातात ठेऊन हरवलंय.

क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच झिम्बाब्वेकडून घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला आणि अर्थात ही बातमी झाली.

पण झिम्बाब्वेचा हा विजय बऱ्याच कारणांमुळे खास ठरतो, कारण गेल्या दीड-दोन वर्षात झिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमनं कित्येक लडतरींमधून मार्ग काढलाय.

मे २०२१ ची गोष्ट आहे, भारतात लॉकडाऊन, दुसरी लाट या गोष्टींनी कहर केला होता, आयपीएलही थांबवण्यात आली होती. तेव्हा झिम्बाब्वेचा ऑलराउंडर रायन बर्लनं एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये तो म्हणाला होता की, ‘आमच्या टीमला स्पॉन्सर मिळायचा चान्स आहे का ? म्हणजे आम्हाला प्रत्येक सिरीजनंतर आमचे शूज शिवावे लागणार नाहीत.’

रायन आणि झिम्बाब्वेच्या टीममधल्या बऱ्याच खेळाडूंची अशीच परिस्थिती होती. कुणाचे शूज फाटलेले, कुणाचे स्पाईक्स तुटलेले पण तरीही या टीमला मैदानात भिडायचं होतं, जिंकायचं होतं. हे ट्विट व्हायरल झालं आणि प्युमा कंपनीनं लगेचच झिम्बाब्वेच्या टीमला नवे शूज पाठवले.

पण इंटरनॅशनल क्रिकेटरला ट्विट करुन आपल्या टीमची व्यथा सांगावी लागली, अशी वेळ झिम्बाब्वेवर का आली होती..?

अँडी फ्लॉवर, ग्रॅण्ट फ्लॉवर, हीथ स्ट्रीक, हेन्री ओलेंगा, तातेंदा तैबू या झिम्बाब्वेच्या प्लेअर्सनं इंटरनॅशनल क्रिकेटचा एक काळ गाजवला, मात्र त्यांच्या आणि झिम्बाब्वे टीमच्या ऱ्हासामागचं मुख्य कारण तिथली राजकीय आणि सामाजिक अस्थिरताच होती. झिम्बाब्वेच्या क्रिकेट बोर्डात राजकीय हस्तक्षेप इतका होता की, प्लेअर्सनं राजीनामा देण्याच्या, प्लेअर्सवर बॅन लागण्याच्या घटना झिम्बाब्वेनं अनेकदा अनुभवल्या.

हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे, आजही परिस्थिती फार बदललेली नाही. आर्थिक अस्थिरता आणि राजकीय हस्तक्षेपामुळं झिम्बाब्वेच्या क्रिकेट बोर्डाला अनेकदा बॅकफुटवर जावं लागलंय. 

सगळ्यात मोठा धक्का त्यांना सोसावा लागला, तो बंदीचा…

जुलै २०१९ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला सस्पेंड करण्यात आलं. आयसीसीनं ३ महिन्यानंतर ही बंदी उठवली खरी, पण तोवर २०२० च्या टी२० वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये खेळायची झिम्बाब्वेची संधी हुकली. ज्या एका स्पर्धेसाठी झिम्बाब्वेचे प्लेअर्स खच्चून तयारी करत होते, त्यामध्ये खेळायचा चान्सच त्यांना मिळाला नाही. त्यामुळे बंदी उठली तरी हताशपणे आगामी वर्ल्डकपकडे बघण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

त्यानंतर झिम्बाब्वेला मोठा धक्का बसला तो लॉकडाऊनचा…

या काळात कोणतंच क्रिकेट खेळलं गेलं नाही. मोठमोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसला आणि त्यातच झिम्बाब्वे क्रिकेटनं आपले सगळे स्पॉन्सर्स गमावले. जेव्हा लॉकडाऊननंतर पुन्हा क्रिकेट सुरू झालं, तेव्हा ना कुठल्या मोठ्या देशानं झिम्बाब्वेचा दौरा केला आणि ना कुठल्या मोठ्या देशानं झिम्बाब्वेला आपल्याकडे दौऱ्यासाठी बोलावलं.

 त्यामुळं बोर्डाची परिस्थिती आणखीनच खालावली आणि रायन बर्लला आपल्या टीमसाठी शूज हवेत हे सांगायला ट्विट करावं लागलं.

जसं क्रिकेट सुरळीत होत गेलं, तसं पाकिस्तान, बांगलादेश सारख्या आयसीसीच्या फुल मेम्बर्ससोबत झिम्बाब्वेचे सामने होऊ लागले. पण त्यातही त्यांच्या टीमसाठी विजय दुर्मिळ होता.

‘पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं रे’ या स्कीमवर त्यांचा खेळ सुरू होता.

पण या अनुभवाचा त्यांना फायदा झालाच

मागच्या एक-दीड महिन्यात झिम्बाब्वेनं अनेकदा आपली ताकद दाखवून दिलीये. २०१९ मध्ये त्यांना वर्ल्डकप क्वालिफायरमध्ये खेळायची संधी मिळाली नव्हती, मात्र २०२२ च्या टी२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ग्रुप स्टेजमध्ये एकहाती मॅचेस जिंकल्या, नेदरलँड्ससारख्या कसलेल्या टीमला फायनलमध्ये किरकोळीत हरवलं आणि झिम्बाब्वेची टीम ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकपसाठी पात्र ठरली.

बांगलादेशनं जेव्हा झिम्बाब्वे दौरा केला, तेव्हा अनेकांचा अंदाज होता की ते झिम्बाब्वेला सहजमध्ये व्हाईटवॉश देतील. पण झालं उलटंच सिकंदर रझा, रायन बर्ल आणि सगळ्याच टीमनं बांगलादेशचा घाम काढला. 

वनडे आणि टी२० या दोन्ही सिरीजचा रिझल्ट २-१ असा होता आणि २ मॅचेस जिंकणारी टीम बांगलादेशची नाही, तर झिम्बाब्वेची होती.

त्यानंतर झिम्बाब्वेचा दौरा केला भारतानं…

कोहली, रोहित, बुमराह अशा मेन प्लेअर्सना विश्रांती देत भारतानं टीम पाठवली होती. ही तीन बडी नावं नसली, तरीही भारताची टीम खतरनाक स्ट्रॉंग होती. झिम्बाब्वेला भले भारताला हरवता आलं नसेल, पण शेवटच्या वनडेमध्ये त्यांनी जवळपास मॅच मारलीच होती. १३ रन्सनं मॅच जिंकणं हे भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद नव्हतं.

या दौऱ्यावेळी झिम्बाब्वेनं भारताला दिलेल्या लढतीपेक्षा जास्त चर्चा, तिथं असलेल्या पाणी टंचाईची झाली होती. प्लेअर्सनी अंघोळीसाठी फार पाणी वापरु नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या परिस्थितीतही झिम्बाब्वेचे प्लेअर्स देशासाठी तडफेनं क्रिकेट खेळत होते.

भारताविरुद्धच्या सिरीजनंतर झिम्बाब्वेची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली…

पुढचा टी२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियातच होणार आहे, त्यामुळं तिथल्या कंडिशन्सचा अंदाज येण्यासाठी झिम्बाब्वेच्या टीमसाठी हा दौरा महत्त्वाचा होता. आता ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात भारतानं किंवा इंग्लंडनं हरवलं तरी त्याची मोठी बातमी होते. त्यामुळं झिम्बाब्वेकडून फारशा अपेक्षा नव्हत्याच. त्यात ऑस्ट्रेलियानं घरची सिरीज असली तरी आपली मेन टीम मैदानात उतरवली होती. पहिल्या दोन्ही वनडे कांगारूंनी वनसाईड मारल्या. त्यामुळं तिसरी वनडेही अशीच वनसाईड होणार असा अनेकांचा अंदाज होता.

मात्र याच वनडेमध्ये झिम्बाब्वेनं इतिहास रचला

पहिली बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव १४१ रन्सवर खलास झाला, एकट्या डेव्हिड वॉर्नरनं ९४ रन्स करत झुंज दिली. वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल (१९) वगळता एकाही ऑस्ट्रेलियन बॅट्समनला २ आकडी रन्स करता आले नाहीत. 

वॉर्नर, मॅक्सवेलसोबत कांगारुंच्या शेवटच्या पाचही विकेट्स रायन बर्लनं काढल्या आणि त्या बदल्यात रन्स दिले फक्त १०.

ऑस्ट्रेलियाला बॉलिंगमध्ये कमबॅक करण्याची पूर्ण संधी होती. हेझलवूडनं खपाखप ३ विकेट्स काढत ११ व्या ओव्हरमध्येच झिम्बाब्वेच्या मिडल ऑर्डरला क्रीझवर आणलं होतं. एका बाजूनं विकेट्स पडत असताना कॅप्टन रेजिस चकाब्वानं नॉटआऊट ३७ रन्स करत टीमला मॅच मारुन दिली आणि झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवून दाखवलं.

सतत प्रॉब्लेम्स, पराभव यांचा सामना करुनही झिम्बाब्वेच्या खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द कुठून येते याचं उत्तर सापडतं, 

रायन बर्लच्या स्टोरीत

तिसऱ्या वनडेमध्ये झिम्बाब्वेच्या विजयाचा हिरो ठरला रायन बर्ल. २०१३-१४ मध्ये रायन इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टनमध्ये शिक्षण घेत होता आणि सोबतच कौंटी क्रिकेटही खेळत होता. वयही १९-२० वर्ष होतं, त्यामुळं कौंटीमध्ये चांगला परफॉर्मन्स केला असता, तर त्याला साहजिकच इंग्लंडकडून खेळता आलं असतं. शिक्षण, पैसा आणि करिअर या सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्या असत्या. पण त्याच दरम्यान त्याला झिम्बाब्वेमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यासाठी कॉल आला. 

हातात इंग्लंडसारख्या देशाकडून खेळण्याची संधी असतानाही त्यानं मायदेशाकडूनच खेळण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंड सोडून पुन्हा झिम्बाब्वेमध्ये आला.

२०१५-१६ मध्ये त्याला भारताविरुद्ध इंटरनॅशल क्रिकेटमध्ये डेब्यू करायची संधी होती, मात्र मॅचच्या आदल्या दिवशीच त्याला दुखापत झाली आणि बाहेर बसावं लागलं. त्यानंतर पुन्हा भारताविरुद्ध खेळायला त्याला ६ वर्ष वाट पाहावी लागली, पण तरी त्यानं हार मानली नाही. 

हीच जिद्द रायन आणि झिम्बाब्वेच्या कित्येक क्रिकेटर्समध्ये आहे आणि त्याच जोरावर आज त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत आरामात हरवलंय. 

जाता जाता आणखी एक गोष्ट सांगतो, झिम्बाब्वे आगामी टी२० वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसेल, २०२३ च्या वनडे वर्ल्डकपसाठी क्वालिफाय व्हायला लागणारे १० पॉईंट्सही त्यांनी या मॅचमधून मिळवलेत, पण दुर्दैव म्हणजे पुढच्या ४ वर्षात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यातल्या एकाही टीमशी कुठल्याच फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेची मॅच नियोजित नाही.

मोठ्या टीम्ससमोर स्वतःला सिद्ध करण्याची हीच संधी झिम्बाब्वेला मिळत नाही आणि त्यांनी आपल्या ताकदीवर जिंकलेल्या मॅचेसला दुर्दैवानं चमत्कार मानलं जातं…

  • भिडू चिन्मय साळवी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.