वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाता त्यांनी रुग्णांवर उपचार करण्याला प्राधान्य दिलं

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात देशाला अभिमानास्पद वाटावी अशी कामगिरी केली आहे त्यांना सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं…यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला….थोडक्यात देशभरातून एकूण १२८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले… विशेष म्हणजे त्यात महाराष्ट्रातल्या १० व्यक्तींना गौरवण्यात आलं आहे…. या १० व्यक्तींची नावं तर तुम्हाला एव्हाना कळलीच असतील पण त्यांच्या योगदानाबद्दल देखील माहिती असणं महत्वाचं आहे…
यातलं एक नाव कदाचित तुमच्या ओळखीतलं नसावं…कारण हे नाव कायमच प्रसिद्धीपासून दूर असतं…ते नाव म्हणजे हिंमतराव बावस्कर !
विंचू दंशावर संशोधन करून कोकणातील हजारो नागरिकांना जीवदान देणारया डॉ. हिंमतराव बावसकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे…
रायगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर म्हणून नोकरीला लागल्यानंतर परिसरात विंचूच्या दंशाने मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या घटनेने त्यांना धक्काच बसला होता. कारण या भागात विंचवाच्या डंखाने मृत्यू होणे तशी खूप सामान्य गोष्ट होती. लोकांमध्ये पसरलेली अंधश्रद्धा हे या मृत्यूमागील सर्वात मोठे कारण होते. त्यामुळे लोकं हॉस्पिटलमध्ये न येता एक्सॉर्सिझम म्हणजेच भूतबाधा करायचे आणि त्यामुळे अनेकदा लोकांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर त्यांनी अशा मृत्यूंची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि लोकांना विंचू दंशावर उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली.
हे सोपं काम नव्हतंच मुळात… कारण अनेक दशकांपासून जनमानसात अंधश्रद्धा रुजली होती तीला बाजूला करून लोकांना वैज्ञानिक उपचारांचं महत्व समजून सांगणे मोठं कठीण काम होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात ते खरंच आहे..
रुग्णालयाच्या अत्यंत मर्यादित साधनसंपत्तीचा वापर करून त्यांनी उपचार केले, त्यांनी अनेक रात्री रुग्णांसोबत काढल्या, न झोपता, लोकांशी आपुलकीने वागायला लागले. या वेळी त्यांना उलट्या, उच्च रक्तदाब, अति घाम येणे, थंडी वाजून येणे, वेदना यासारखी लक्षणे रुग्णांमध्ये दिसू लागली. त्यामुळे विंचूच्या डंखामुळे मृत्यूचे कारण शोधून काढले. सुरुवातीला त्यांनी पारंपारिक पद्धतीने उपचार करून घेण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही, त्यानंतर त्यांनी पुढील तपासणीसाठी त्यांचा अहवाल हाफकाईन संस्थेकडे पाठवला.
बावस्कर यांनी विंचूदंश व सर्पदंश यांवर गुणकारी औषधाचा शोध लावला. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये विंचूदंश व सर्पदंश यांमुळे उद्भवणाऱ्या रोगांवर तिथे गोरगरिबांवर मोफत उपचार केले जातात. त्यांनी सलाइनद्वारे नायट्रोप्रुसाइड औषध देऊन तीव्र विंचूबाधा झालेले पासष्ट विंचू विषबाधेचे रुग्ण बरे केले होते तेही एकाच महिन्यात….मग त्यांनी आणखी रिसर्च करून प्राझोसिन नावाचे हृदय विकारावर उपयोगी असणाऱ्या औषधाचा शोध लावला. विंचू चावल्यानंतर उपचार म्हणून प्राझोसिन वापरता येईल, हा त्यांचा अंदाज खरा ठरला आणि त्यांनी १२६ विंचू विषबाधेचे रुग्ण बरे केले होते. आणि यामुळे झालं असं कि, विंचू विषबाधेवरील उपचारामुळे मृत्यू होणाऱ्या कोकणातील रुग्णांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली. जवळपास तीस हजाराहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी विंचू दंश उपचार करण्यासाठीचं ट्रेनिंग दिलं.. त्यांच्या या संशोधनावर त्यांना तीसहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत
वडील वारले…वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी ते रुग्णावर उपचार करण्यासाठी गेले होते.
डॉ. बावस्कर हे त्यांच्या रुग्णांच्या सेवेप्रती खूप समर्पित आहेत. १९८३ मध्ये जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची तार मिळाली होती. पण वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याऐवजी त्यांच्या रुग्णांच्या वर उपचार करण्यासाठी गेले….यावरूनच त्यांची रुग्णांच्या प्रति सेवेचीही जाणीव होते.
प्रत्यक्षात विंचूच्या डंखामुळे त्रस्त असलेल्या एका ८ वर्षाच्या मुलाला त्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळ वेदनेने रडत होते. डॉक्टर बावस्कर यांनी मुलाच्या वडिलांची समजूत घातल्यानंतर त्यांच्या मान्यतेने मुलावर उपचार सुरू केले. मुलाच्या प्रत्येक अपडेटवर ते लक्ष ठेवून होते. तासाभराच्या उपचारानंतर अखेर त्याची मेहनत फळाला आली आणि मुलाच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होऊ लागली. तब्बल २४ तासांनंतर त्यांनी मुलाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढले आणि उभे केले. या घटनेनंतर त्यांनी परिसरातील लोकांचा विश्वासही जिंकला होता.
वैद्यकीय क्षेत्रात पसरलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठीही त्यांची ओळख आहे. या पुरस्कारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील आपले कार्य सुरू ठेवण्यासाठी आणखी अनेक वर्षे जगण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे हि वाच भिडू :
- एका माजी पाकिस्तानी सैनिकाला भारताने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय.
- पद्मश्री मिळालेला गुंगा पैलवान दिल्लीत आंदोलनाला बसलाय
- आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंना इंदिरा गांधींनी पद्मश्री देऊ केला होता..