पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्वामी शिवानंद यांचं वय १२५ वर्ष..? खरंच हे शक्य आहे का..?

सोशल मीडिया, घरच्यांचे व्हाट्सॲप ग्रुप आणि कट्टे सगळीकडे सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळवणारे योग गुरू स्वामी शिवानंद.

राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात स्वामी शिवानंद पद्मश्री स्विकारण्यासाठी आले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुरस्काराचं व्यासपीठ आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जमिनीवर डोकं टेकवून नमस्कार केला. विशेष म्हणजे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीही त्यांना लवून नमस्कार केला.

या सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

त्यासोबतच आणखी एक गोष्ट चर्चेत आली, ती म्हणजे स्वामी शिवानंद यांचं वय. सगळीकडे असलेली चर्चा आणि बातम्यांनुसार शिवानंद यांचं वय आहे तब्बल १२५ वर्ष.

इथं लोकांचे गुडघे तिशीत दुखतात, चाळीशीत बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात, अशा दुनियेत स्वामी शिवानंद वयाच्या १२५ व्या वर्षी फिट अँड फाईन कसे काय? त्यांचं वय खरंच १२५ वर्ष आहे काय? आणि असेल तर ते जगातले सगळ्यात वयोवृद्ध जिवंत व्यक्ती आहेत का? असे लय प्रश्न आम्हाला पडले… मग म्हणलं उत्तरं शोधावी.

सगळ्यात आधी माहिती घेऊ स्वामी शिवानंद यांच्याबद्दल-

स्वामी शिवानंद यांना त्यांच्या योग क्षेत्रातल्या योगदानाबद्दल भारत सरकारनं पद्मश्रीनं सन्मानित केलं आणि ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. पण चर्चेत येण्याची शिवानंद यांची ही काय पहिली वेळ नाही. या आधी मतदान केलं तेव्हा आणि लस घेतली तेव्हाही ते देशभरात चर्चेत आले होते आणि त्यामागचं कारण होतं त्यांचं वय. शिवानंद यांनी पहिल्यांदा मतदान केलं तेव्हा त्यांचं वय होतं १२१ वर्ष, तर लस घेताना वयाचा आकडा होता १२५ वर्ष.

हे असलं सगळं पाहिल्यावर, त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल उत्सुकता आणखी वाढते. स्वामी शिवानंद एका मुलाखतीत आपला जीवनप्रवास बंगाली लहेजा असलेल्या हिंदीत सांगतात. तो आपण त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊ,

”माझा जन्म ८ ऑगस्ट १८९६ ला बांगलादेशच्या श्रीहट्ट जिल्ह्यात झाला. माझं कुटुंब अगदी गरीब होतं, आई-वडील रोजच्या जेवणासाठी दारोदारी भीक मागायचे.

मी चार वर्षांचा असताना त्यांचं निधन झालं, दोनच वर्षात माझ्या मोठ्या बहिणीचंही निधन झालं. माझ्या नातेवाईकांनी मला अध्यात्मिक गुरूंकडे सोपवलं.

बरीच वर्ष फिरल्यानंतर मी वाराणसीमध्ये स्थायिक झालो. त्यानंतर मी जगभर अध्यात्माच्या आणि योगाच्या प्रसाराचं काम करतोय.”

आता सव्वाशे वर्षांच्या माणसाला कसलाच त्रास होत नसेल काय?

तर स्वामी शिवानंद यांना एकदाच डोकेदुखीचा त्रास झाला होता. २०१६ मध्ये त्यांनी आपल्या शिष्यांकडे वारंवार डोकं दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळं शिष्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात चेकअपसाठी नेलं. सात तासांच्या चेकअपनंतर शिवानंद यांचं बीपी काहीसं वाढल्याचं लक्षात आलं. मात्र पाच दिवसात मी हे नॉर्मलवर आणू शकतो म्हणत त्यांनी औषध घेण्यास नकार दिला.

पुढचा प्रश्न पडला, एवढं फिट राहणाऱ्या माणसाची लाइफस्टाईल कशी असेल?

वाराणसीत एका छोट्याश्या फ्लॅटमध्ये राहणारे स्वामी शिवानंद रोज पहाटे ३ वाजता उठतात. पूजा आणि जप करुन झाल्यानंतर योग करतात. ते फक्त उकडलेलं अन्न खातात. मसाले खात नाहीत, एवढंच काय तर दूध आणि फळं हे फार महागडं खाणं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयुष्यात त्यांनी मसाले खाल्ले नाहीत आणि कधीच शारीरिक संबंधही ठेवले नाहीत. यामुळेच आपल्याला आयुष्यात कसलीच इच्छा उरलेली नाही आणि कशाचा पश्चातापही नाही, हेच आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे, असं ते सांगतात.

आता प्रश्न येतो तो म्हणजे, स्वामी शिवानंद हे हयात असणारे जगातले सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत का?

 त्यांच्याकडे आपल्या वयाचे दोन पुरावे आहेत, ते म्हणजे आधार कार्ड आणि पासपोर्ट. दोन्हीकडे त्यांची जन्मतारीख ८ ऑगस्ट १८९६ अशी आहे. हे दोन पुरावे ग्राह्य धरले तर त्यांचं वय होतं १२५ वर्ष.

दुसऱ्या बाजूला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तपासले, तर जपानच्या केन टनाका या ११९ वर्षांच्या महिला सध्या हयात असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्ती आहेत. 

गिनीज बुक्सनुसार आतापर्यंत सर्वाधिक आयुष्य जगलेल्या व्यक्तींच्या यादीत फ्रान्सच्या जेने कालमेंट यांचं नाव येतं. २१ फेब्रुवारी १८७५ ला जन्मलेल्या कालमेंट यांनी पार आयफेल टॉवरचं बांधकाम होताना पाहिलं. १९९७ मध्ये वयाच्या १२२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अजूनही रेकॉर्ड मात्र त्यांच्याच नावावर आहे.

आता साहजिकच शिवानंद यांच्या वयाच्या दाव्यानुसार तेच जगातले सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती ठरु शकतात. मग त्यांचं नाव  गिनिज बुक्समध्ये का नाही?

बरीच वर्ष शिवानंद हे आपल्या वयामुळं चर्चेत नव्हते. २०१७ मध्ये वयाच्या १२१ व्या वर्षी मतदान केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. आपल्या शिष्यांच्या आग्रहानंतर त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्याचं ठरवलं. पण त्यांच्याकडे असलेले जन्माचे पुरावे गिनीज बुककडून वैध मानण्यात आले, तर स्वामी शिवानंद यांचं नाव रेकॉर्ड्समध्ये येऊ शकतं.

विशेष म्हणजे वय तपासण्याचा आपला फॉर्म्युला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं लोकांसाठी खुला केलेला नाही.

स्वामी शिवानंद एका मुलाखतीत, आपल्याला कुठलीही इच्छा उरलेली नसल्याचं आणि योगाच्या माध्यमातून लोकांना प्रेरित करण्याचं काम करत राहणार असल्याचं सांगतात.

त्यामुळं रेकॉर्ड्समध्ये आले नाहीत, तरी स्वामी शिवानंद यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.