पाटणच्या जंगलात भरणारी चेटकांची यात्रा.
चेटूक माहित आहे का ? नाही. तर अगोदर चेटूक म्हणजे काय ते सांगतो. चेटूक भूताचाच एक प्रकार असतो. तो माणसाचा गुलाम असतो आणि त्याचा मालक जे सांगेल ते काम तो करत राहतो. अट फक्त एकच त्याला चोवीस तास काम सांगायला लागतं. अशी चेटकं गावातील धनाढ्य लोकांकडे असतात असा पुर्वीपासूनचा समज आहे. खरखोटं चेटकालाच माहिती.
असो, तर याच चेटकांची यात्रा आज भरणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणपासून साधारण पाच सात किलोमीटरवर असणाऱ्या येराड गावात ही यात्रा दरवर्षी भरते. या यात्रेत रात्री बारा वाजता चार ते पाच हजार भक्तांसमोर चेटूक नाचवलं जातं.
काय आहे नेमकी प्रथा –
येराड हे गाव कराड चिपळूण रोडवर पाटणच्या पुढे लागतं. या गावचं ग्रामदैवत येडोबा.जोतिबाची यात्रा झाली की दूसऱ्या दिवशी जोतिबाचा छबीना येडोबाला आणला जातो. यात्रेच्या पहिल्या दिवशी येडोबा आणि जोगेश्वरीचं लग्न असतं आणि दूसऱ्या दिवशीच्या रात्री बारा वाजता चेटूक नावाचा प्रकार चालतो.
याबाबत अनेक जण वेगवेगळी दंतकथा सांगतात पैकी एक दंतकथा अशी की, येडोबाच्या लग्नात वऱ्हाडी आले नाहीत म्हणून नदीवरुन ही चेटकं येडोबाच्या लग्नात आली. त्यावेळीपासून दरवर्षी येडोबाच्या दर्शनासाठी मानकरी हे चेटूक घेवून येत असतात.
दिवसभर यात्रा झाली की रात्री बारा वाजता गावातील मानकरी व मंदीराच्या पूजेचा मान असणारे इतर गावचे मानकरी असे निवडक चार पाच जण हातात मशाल घेवून नदीच्या दिशेने जातात. गावची प्रथा अशी आहे की हे मानकरी नदीच्या दिशेने गेले की कोणीही नदीवर जात नाही. नदीवर जावून हे मानकरी नेमकं काय करतात हे गावातील वडिलधाऱ्या मंडळींना देखील माहित नाही. मानकरी जेव्हा फक्त पोर्णिमेच्या उजेडात मंदिराच्या दिशेने येवू लागतात तेव्हा त्यांच्यासोबत गुडघ्याएवढ्या उंचीची आकृत्या सोबत असतात. या आकृत्यांवर घोंगडे अंथरल्यामुळं त्याखाली नेंमकी चेटूकचं असतात की अन्य काही असते हे कुणालाच ठामपणे सांगता येत नाही. या आकृत्या मंदीराच्या आवारात येतात. मंदीराच्या भोवती त्या प्रदिक्षणा घालतात आणि मंदिरात जातात. त्या आकृत्या आणि सोबतचे मानकरी मंदीरात शिरले की लगेचच मंदीराचे दारे बंद केले जातात. येडोबाच्या नावाचा जयजयकार होतो. मानकरी बाहेर येतात तेव्हा त्यांच्या सोबत काहीच नसतं. गर्दी पांगते ती आपण डोळ्यांनी चेटूक बघितल्याच्या अविर्भावात. मात्र कोणालाही त्या घोंगड्याखाली नेमकं काय पाहीलं हे ठामपणे सांगता येत नाही.
गावातील अनेक भक्तांना विचारलं, तर ते या प्रथेबद्दल ठामपणे बोलण्याचं टाळतात. अनेक म्हाताऱ्या कोताऱ्यांना देखील नेमकं त्या घोंगड्याखाली काय असतं ते सांगता येत नाही. मानकऱ्यांबरोबर संपर्क साधणं देखील तितकच कठिण असतं. नेमकी प्रथा काय हे देखील चेटकांइतकच मोठ्ठ कोडं आहे. पण एक अनुभव म्हणून येराडला भेट देणं नक्कीच वेगळी गोष्ट आहे.
आज येराडची यात्रा आहे. बघा आज जायला जमतं का ते ? नाहीच जमलं तर पुढच्या वर्षीची जोतिबाची यात्रा लक्षात ठेवा ती झाली की लगेच दूसऱ्या दिवशी येराडची यात्रा असते.