आजही स्वतंत्र विदर्भाच्या प्रतिक्षेत आहे, विदर्भ चंडिका…

ही गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची. नवीनच होऊ घातलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाच्या स्वागताची तयारी करत होता महाराष्ट्र राज्यातली जनता करत होती. सर्वत्र आनंदी आनंद होता. अत्यंत संघर्षातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी १०६ लोकांनी आपला जीव दिला होता. अनेकांनी उभा संसार सोडून या चळवळीचे नेतृत्व केले होते. मोठ्या संघर्षातून मिळालेल्या या यशाचं समाधानच काही वेगळं होतं.

मात्र विदर्भातल्या नागपुर शहरात मात्र अशी स्थिती नव्हती.

नागपुरात वेगळ्या विदर्भाची चळवळ टोकाला गेली होती. १ ऑगस्ट १९३८ पासून हि चळवळ सातत्याने वेगळ्या विदर्भाची मागणी करत होती. अनेक वर्षांपासून विदर्भातील लोक वेगळ्या विदर्भाची प्रतिक्षा करत होते. अनेक आंदोलने करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली होती. सततच्या अपयशामुळे विदर्भातील लोक उद्विग्न झाले होते. त्यातच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली अणि लोकांच्या भावनेचा बंध फुटला होता.

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होणार होती. संयुक्त महाराष्ट्राची घोषणा देखील झाली होती. त्याचवेळी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाने देखील जोर पकडला होता. नागपूरचा इतवारी परिसर या चळवळीचं प्रमुख केंद्र बनला होता. 

त्याच परिसरात चार दिवस आधी लोकनायक बापूजी अणे यांच्या हस्ते विदर्भ चंडिकेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. लोकनायक बापूजी अणे अर्थात माधव श्रीहरी अणे हे वेगळ्या विदर्भ चळवळीचे आघाडीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी या चळवळीचे बराच काळ नेतृत्व ही केलं. आजच्या घडीला त्यांचे नातू श्रीहरी आणे स्वतंत्र विदर्भाची चळवळ पुढे घेवून जाताना दिसतात. बापूजी अणे यांच्या हस्ते इतवारी परिसरात विदर्भ चंडिकेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

या मूर्तीत ज्या असुराला ‘चंडिका देवी’ मारत आहे तो महाराष्ट्र आहे असे सांगण्यात आले अणि चंडिका म्हणजे विदर्भ.

या वेळेस असा निश्चय करण्यात आला की जोवर वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत या चंडिकेचं आम्ही विसर्जन करणार नाही. 

मुर्ती बसविल्यानंतर विदर्भातील गावागावात या प्रकारच्या मूर्ती लोकांकडून बसवण्यात आल्या. लोक तिची पूजा करू लागले. या घटनेनंतर विदर्भात एक भडकाच उडाला होता. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी त्या काळी बरीच मोठी आंदोलनं करण्यात आली. नागपूर मध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन येणार होते. त्यांची मिरवणूक हत्ती वरून निघणार होती. वेगळ्या विदर्भाच्या कार्यकर्त्यांनी हत्तीच्या पायात फटके फोडून हत्तीला पळवून लावले. परिणामी तो कलश विदर्भात आलाच नाही.

तरीही वर्ध्याच्या सयुंक्त महाराष्ट्रवादी नेते असणाऱ्या वसंत साठेंनी घोड्यावरून महाराष्ट्रवाद्यांची एक मिरवणूक काढली. ही मिरवणूक निघताच इतवारी भागात हालचाली सुरू झाल्या. मिरवणूक इतवारी भागाकडे येताच काही हजार लोकं रस्त्यावर उभे ठाकले मिरवणुकीला अडवण्यासाठी. संपुर्ण परिसराला नागरी युद्धाचं स्वरुप आलं होतं. पोलीस अणि आंदोलक हे युद्धच सुरू झाले होते. त्याच दरम्यान पोलिसांशी भांडताना बाबूराव हारकरे यांचे दोन्ही हात तुटले. त्यांना नंतरच्या काळात वीर बाबूराव हारकरे म्हटलं गेलं. पोलिसांनी अश्रू धूर सोडल्यावर शेवटी पांगापांग झाली. पोलिसांनी चार हजार लोकांना अटक केली. इतक्या लोकांना नागपूर बाहेर नेण्यासाठी एक सहा डब्यांची आगगाडी पाठवण्यात आली होती.

इतकं मोठं आंदोलन आम्हाला महाराष्ट्रात घालू नका म्हणुन केला गेलं.

काही दिवसानी या आंदोलनात रघुनाथ डोले शहीद झाले. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेने वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर केला. आज नागपुरात जो शहीद चौक आहे तो रघुनाथ डोले यांच्या नावावरून आहे. त्यानंतर जांबुवंतराव धोटे यांनीही बराच प्रयत्न केला पण विदर्भ काही वेगळा झाला नाही. ही चळवळ नंतरच्या काळात शांत होत गेली. आजही ती अधून मधून डोकं वर काढते पण तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

या दरम्यान विदर्भ चंडिकेच काय झालं. स्वतंत्र विदर्भाची मागणी पुर्ण झाल्याशिवाय या मुर्तीचं विसर्जन करण्यात येणार नव्हतं. झालं देखील तसच आजही ती मुर्ती तशीच आहे. कालांतराने या मुर्तीशेजारी मंदिर बांधण्यात आलं. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.