खरंच काँग्रेसने महाजन यांच्या निधनानंतरची पोट निवडणूक बिनविरोध केली होती का?

सध्या खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कालपर्यंत इथं संकेताप्रमाणे हि निवडणूक बिनविरोध होईल असं म्हंटले जात होते. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवार कोण ही औपचारिकता बाकी होती. मात्र आज भाजपने संजय उपाध्याय यांच्या रूपाने इथं उमेदवारी जाहीर केली आहे, तर काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मात्र याच सगळ्यावर बोलताना काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, जेव्हा प्रमोद महाजन यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली होती तेव्हा सगळयांनी मिळून सहकार्याने ती निवडणूक बिनविरोध केली होती हा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही योग्य वेळी भाजपाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करू. 

पण खरंच हा इतिहास असाच आहे का? खरंच काँग्रेसने प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध केली होती का?

तर नाही. ती पोट निवडणूक बिनविरोध झाली नव्हती. त्यामुळे एक प्रकारे बाळासाहेब थोरात यांनी आपलाच इतिहास पुन्हा एकदा तपासून पाहायला हवा असं म्हणावं लागेल. मग नेमका इतिहास काय आहे? ती पोटनिवडणूक कोणी लढवली होती? काँग्रेसकडून उमेदवार कोण होते? हे बघणं गरजेचं आहे.

३ मे २००६. भाजपचे दिग्गज नेते आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे चाणक्य प्रमोद महाजन यांची त्यांचा मोठा भाऊ प्रवीण महाजन यांनी ३ गोळ्या घालून हत्या केली. त्यावेळी महाजन १९८६, १९९२, १९९८ आणि २००४ असे सलग चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर २००६ मध्ये संबंधित राज्यसभेची जागा रिकामी झाली.

त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये तिथं पोट निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी भाजप शिवसेना युतीमध्ये हि जागा भाजपकडे तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे हि जागा काँग्रेसकडे होती. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांची इच्छा होती कि इथून दिवंगत प्रमोद महाजन यांच्याच घरातील उमेदवार निवडून जावा.

त्याबाबत राजनाथ सिंग यांनी तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र आघाडी असल्याने संबंधीत जागा हि काँग्रेसकडे असल्याचं पवारांनी कळवलं. तर काँग्रेसकडून मात्र पक्षाचे निष्ठावंत असलेले अविनाश पांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर भाजपकडून संभाजी पवार यांना उमेवदवारी जाहीर केली गेली.

त्याच निवडणुकीत बजाज उद्योग समुहाचे चेअरमन असलेले राहुल बजाज अपक्ष उभे राहिले होते.

उमेदवाराला विजयी होण्यासाठी त्यावेळी १४५ मतांची गरज होती. काँग्रेसकडे एकूण ७३ मत होती. तर राष्ट्रवादीकडे ७१. तर शिवसेना ५८, भाजप ५४. सोबतच जनसुराज्य पक्ष ४, कम्युनिस्ट पक्ष ३, शेकाप २, इतर ४ अपक्ष १९ असे आमदार होते. त्यामुळे आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त होती.

मात्र त्यावेळी बजाज यांचे सर्व पक्षीयांशी अगदी जवळचे आणि चांगले संबंध होते. कदाचित यामुळे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने संभाजी पवार यांची उमेदवारी मागे घेतली आणि बजाज यांना पाठिंबा देऊ केला. सोबतच अचानक राष्ट्रवादीकडून देखील जाहीर करण्यात आलं कि ते देखील राहुल बजाज यांना पाठिंबा देतील.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्म पाळणार नाही हे स्पष्ट होतं. त्यावरून त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर राज्यभरातून टीका करण्यात येत होती.

काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव या भूमिकेबद्दल म्हणाल्या होत्या कि,

पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वचन दिले होते कि ते काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. कारण काँग्रेसने याआधीच्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वसंत चव्हाण यांना पाठिंबा दिला होता. पण आता त्यांनी माघार घेतली आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं कि, आम्हाला कोणत्याही पक्षाला पाठिंबा द्यायचा नव्हता. त्यामुळे जेव्हा राहुल बजाज यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला.

त्यानंतर पवार यांनी देखील याबाबतच्या वादावर भाष्य केलं होतं. शरद पवार त्यावेळी वॉशिंग्टन दौऱ्यावर होते. तिथे भारतीय दूतावासात त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले होते कि, 

काँग्रेसचे उमेदवार अविनाश पांडे यांना पाठिंबा देण्याऐवजी राहुल बजाज यांना पाठिंबा देण्याचे विशेष कारण आहे. ते म्हणजे एक तर मला स्वतःला अविनाश पांडे यांच्याबद्दल जास्त काही माहित नाही. सोबतच राहुल बजाज यांचे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांचे सारखे तज्ञ लोक संसदेमध्ये असावे आम्हाला वाटत. आणि बजाज हे काही कोणत्या पक्षाचे उमेदवार नाहीत, तर अपक्ष आहेत.

त्यानंतर १५ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात बजाज यांना तब्बल १९५ मत मिळाली. तर अविनाश पांडे यांना ९५. राहुल बजाज मोठ्या फरकाने निवडून आले होते.

त्यानंतर बजाज यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले होते कि, मी संसदेमध्ये आता भारताच्या उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ना कि केवळ दुचाकी उद्योगाचे. तर अविनाश पांडे देखील २०१० साली झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राज्यसभेवर निवडून आले होते.

मात्र यामुळे प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरची निवडणूक बिनविरोध झाली नव्हती हि गोष्ट तर नक्की आहे. पण आता एवढ्या घडामोडी घडलेल्या राज्यसभा निवडणुकीचा इतिहास बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याला माहीत नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.