मुख्यमंत्री बदलला पण पंजाब काँग्रेसमधील जुनं दुखणं अजून कायम आहे…

जी भांडण संपवण्यासाठी काँग्रेसने पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून चरणजीत सिंग चन्नी यांना आणलं, तिचं भांडण अजून देखील सुरु असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसने आजारावरचा उपाय म्हणून मुख्यमंत्री बदलले असले तरी जुनं दुखणं अजून कायम आहे असं असचं म्हणावं लागेल. त्याच कारण ठरलं आहे हरीश रावत यांचं एक विधान आणि त्याला सुनील जाखड यांनी दिलेलं प्रत्युत्तर.

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी रविवारी म्हंटले कि,

आगामी विधानसभा निवडणुका आम्ही पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याच नेतृत्वात लढवू.

मात्र रावत यांच्या याच वक्तव्यावर पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. जाखड म्हणाले, रावत यांचं हे विधान हैराण करणारे आहे. कारण हा प्रकार म्हणजे केवळ मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांना मर्यादित करण्याचा प्रयत्न आहेत. सुनील जाखड यांनी याबाबत एक पोस्ट देखील लिहिली आहे.

ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात,

पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री बनवणे हि केवळ औपचारिकता आहे का? कारण यातून एक गोष्ट सिद्ध होते कि, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर चन्नी असतील, पण मर्जी सिद्धू यांचीच असेल.

त्यामुळे जाखड यांच्या या विधानानंतर पंजाब काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं उघड झालंय. हरीश रावत यांनी याआधी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं असून आता रावत यांनी सिद्धू यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

भाजपने देखील रावत यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे.

हरीश रावत यांच्या पुढील निवडणुका सिद्धू यांच्या नेतृत्वात लढणार असल्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ म्हणाले कि, काँग्रेसने नवीन मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना नाइट वॉचमॅन बनवले आहे. कारण ते केवळ ९० दिवसच खुर्चीवर बसू शकणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने दलितांचा अपमान केला आहे.

मागच्या काही काळापासून पंजाबमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरु होती…

मागच्या अनेक दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वर्चस्ववादाची लढाई सुरु होती.

तसा तर हा वाद २०१७ पासूनच दबक्या आवाजात सुरू होता. पण मागच्या काही दिवसांपासून आधी सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत त्यांना हटवण्याची मोहीम सुरु केली होती, तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्यास विरोध होता. मात्र त्यानंतर देखील नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष केले गेले.

त्यामुळे पक्षात आणि राज्यात मुख्यमंत्र्यांपेक्षा नवज्योतसिंग सिद्धू यांचचं वर्चस्व असल्याचा मेसेज गेला होता. आता देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाऐवजी हरीश रावत हे नवज्योतसिंग सिद्धू यांच्याच नेतृत्वात पक्ष निवडणूक लढवेल असं घोषित केलंय. याच भूमिकेवर काँग्रेसच्या सुनील जाखड यांच्यासह जेष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

इतकंच नाही तर पंजाब किसान कमीशनचे अध्यक्ष अजयवीर जाखड यांनी याचमुळे राजीनामा दिला असल्याचं सांगितले जात आहे. मात्र आता या सगळ्यात दुसऱ्या बाजूला कॅप्टन अमरिंदर सिंग काय भूमिका घेतात हे देखील बघावं लागणार आहे. कारण २०१७ च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या होत्या. सध्या तरी अमरिंदरसिंग शांत आहेत, पण पंजाबमधील हि गटबाजी अजून थांबलेली नाही असचं म्हणावं लागेल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.