बाळासाहेब थोरातांच्या वडिलांनी स्वतःच्याच सरकार विरुद्ध वीज बिल आंदोलन केलं होतं.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे प्रवरानदी काठच एक गाव. या गावाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील आदिम कृषीसंस्कृती इथे वास करत होती. याच कृषिसंस्कृतीची काबाडकष्टाची परंपरा आज एकविसाव्या शतकातही पाहायला मिळते.

या परंपरेचे एक महत्वाचे शिलेदार म्हणजे भाऊसाहेब संतुजी थोरात.

शेतकरी वारकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. अगदी लहान वयात भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. अठराव्या वर्षी शालेय शिक्षणाचा त्याग करून चलेजाव आंदोलनात सहभागी झाले.

अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील अनेक तरुण भूमिगत झाले. भाऊसाहेब थोरात व हे सर्व तरुण यांनी तहसीलदार ऑफिस वर हल्ला करणे, रस्त्यावरचे पूल तोडणे,टेलिफोनचे खांब मोडून टाकणे,सरकारी मालमत्तेला आगी लावून नुकसान करणे अशी अनेक आंदोलने त्यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यात एक प्रकारचे प्रतिसरकार स्थापन केले होते.

अनेक दिवस भूमिगत राहिल्यावर मुंबईतल्या मुषक महल मध्ये लपलेल्या साने गुरुजी, भाऊसाहेब थोरात यांच्या सह अनेक नेत्यांना ब्रिटिश पोलिसांनी छापा टाकून अटक केली. नाशिक रोड च्या सेन्ट्रल जेल मध्ये नेऊन स्थानबद्ध करून टाकले.

तुरुंगात असतांना भाऊसाहेब थोरात यांनी अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्क्सवादाचा अभ्यास केला व डाव्या विचारसरणीचे पक्के कम्युनिष्ट बनले.

पुढे तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यावर जुलूम करणाऱ्या सावकारशाही विरुद्ध लढा सुरु केला.

त्यांच्याच पुढाकाराने सावकारी दस्तऐवजाची होळी करून खिरविरे शिवारात आदिवाशी व शेतकऱ्यांना कर्ज व वेठबिगारीच्या जोखडातून मुक्त केले.

पुढे स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा यशवंतराव चव्हाणांच्या कडे आली. त्यांनी खेडोपाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांना पक्षात आणले. सहकाराची चळवळ त्यांच्या माध्यमातून रुजवली. भाऊसाहेब थोरात हे देखील यशवंतराव चव्हाणांच्या ध्येयधोरणांकडे ओढले गेले.

संगमनेर तालुक्यातील ओसाड रानांना हिरवंगार करायचं त्यांचं स्वप्न होतं.

यासाठी सिंचन हा महत्वाचा धागा पकडून त्यांनी मुळा नदीचे पाणी उपसासिंचना द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची योजना आखली, आपलं सरकारदरबारी वजन वापरून ती मंजूर करून आणली. अन बघता बघता संगमनेरच्या दुष्काळी भागाचा कायापालट झाला.

इथल्या मळ्यात पिकणारा भाजीपाला पार चंदीगडपर्यंत जाऊन पोहचला. कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली. टोमॅटो कोबी बरोबर मुळा नदीच्या पाण्यात सतेज झालेली पालेभाजी मुंबईकरांची खास झाली.

भाऊसाहेब थोरतांनी संगमनेरच्या दुष्काळी ओसाड रानात उसमळ्यांचं हिरवं नंदनवन फुलवलं.

शेती फुलली यांच्यासोबत पूरक उद्योग सुरू केले तर शेतकऱ्यांची दैन्यवस्था जाऊन हातात चार पैसे खेळू लागतील हे त्यांनी ओळखलं. यातूनच गुजरातच्या आनंदला जाऊन अमूल डेअरीचा अभ्यास केला व अशीच दुधक्रांती संगमनेर तालुक्यात आणली.

दुधसंघपासून ते साखर कारखान्यापर्यंत, सहकारी पतपेढी पासून ते सहकारी बँकेपर्यंत विकासाचं जाळं तालुक्यात विणल. काँग्रेसमध्ये जाऊनही आपले डावे विचार जपणाऱ्या भाऊसाहेब थोरतांनी सहकार सम्राटाची संस्कृती स्वीकारली नाही. सहकारातले नीती मुल्य तंतोतंत पाळले ,आर्थिक शिस्त जपली.

सहकारातील प्रत्येक सहकारी संस्था हि शेतकरी मालकीची असल्याने ती मोडकळीस येता कामा नये याची ते हमखास काळजी घेतली.

शेतकरी जगला तर राष्ट्र टिकेल याची खूणगाठ त्यांनी बांधली होती.

याच विचारसरणीतुन त्यांनी प्रसंगी आपल्या पक्षाविरुद्ध भूमिका घेऊन आपल्याच सरकार विरुद्ध आंदोलने उभारली. ज्यांच्याहस्ते आपल्या कारखान्याचा नारळ फुटला होता त्याच शंकरराव चव्हाणांना शेतकऱ्यांच्या भल्याचे निर्णय घ्या म्हणून सुनवायला ते मागे पुढे पाहत नव्हते.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे तर त्यांचे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासूनचे मित्र, सहकारी. मात्र त्यांच्या काळातही भाऊसाहेब थोरात यांनी शेतीकर्जाचा व्याजदर कमी करावा या मागणीसाठी मुंबईत भारतीय रिजर्व बॅंकेवर ५००० शेतकऱ्यांचा मोर्चा नेला.

वसंतदादा पाटलांनी खिलाडूवृत्ती दाखवत स्वतः आमदार निवासापुढे या मोर्चाचे स्वागत केले.मोर्चास शुभेच्छा दिल्या आणि नंतर मोर्चा रिझर्व बॅंकेवर नेण्यात आला.

या घटनेची नोंद घेत केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला शेती कर्जाचा वाढविलेला व्याज दर कमी करण्यास भाग पाडले. त्याचा फायदा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना झाला.

या आंदोलनाच्या पुढच्याच वर्षी भाऊसाहेब थोरातांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भातील दुसरा महत्वाचा मोर्चा महाराष्ट्र सरकार विरोधात काढला. राज्य विद्युत मंडळाने शेतीला पाणी उपसा करण्यासाठी विद्युत पंपांना मीटर पद्धतीने बील आकारणी करण्याचा निर्णय घेऊनत्याची अंमलबजावणी सुरु केली होती.

शेतकऱ्यांना मीटरनुसार वीजबिल भरणे परवडत नव्हते़ त्याचवेळी राज्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दराने वीज पुरवठा केला जात होता. हे धोरण अन्यायकारक आहे, अशी भाऊसाहेबांची भूमिका होती. शेतकऱ्यांना मीटरऐवजी अश्वशक्तीनुसार बिल आकारावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी राज्यभर फिरून या मागणीच्या मागे जनाधार उभा केला.

ऐतिहासिक मीटर हटाव आंदोलन केले राज्यभर त्याचा बोलबाला झाला.

याची तत्काळ नोंद घेऊन राज्य सरकारने मीटर हटवून हॉर्स पॉवर पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना बिल आकारणी करण्याचा निर्णय घेतला. आज तागायत तो निर्णय लागू आहे.

व्यासंग आणि अभ्यास या दोन राजकारणातील माणसाकडे अभावाने असलेल्या गोष्टी भाऊसाहेब थोरात यांच्याकडे होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोठी पदे भूषवली नाहीत मात्र जनतेचा लाडका लोकनेता, सहकार महर्षी ही बिरुदे आपोआप मिळाली व त्यांनी ती अभिमानाने जपली.

गांधीटोपी, दुटांगी धोतर अशा वेशातला शेतकऱ्यांना कायम आपला वाटत असलेला हा कॉम्रेड नेता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.