संगणकावर मराठी भाषा आणण्यात इंजिनियर पृथ्वीराज चव्हाणांचा सिंहाचा वाटा आहे.

मराठी भाषा संगणकावर यावी म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रयत्न केले होते. अनेक नेत्यांचे अनेक किस्से असतात तसाच हा किस्सा ऐकून होतो. मात्र खात्रीशीर माहिती कुठेच मिळत नव्हती. स्वत: पृथ्वीराज चव्हाणांनी याबद्दल माहिती दिली होती पण ती देखील एक दोन वाक्यांच्या पलिकडे नव्हती. सुरवातील वाटलं की ते केंद्रात मोठ्या पदावर होते, राज्याचे मुख्यमंत्री होते या पदावर राहूनच त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल व त्या पदामुळे त्यांच्याकडे श्रेय जातं असेल.

आज मराठी भाषा दिनानिमित्ताने हा विषय पुन्हा डोक्यात आला. चौकशी केल्यानंतर समजलं की पृथ्वीराज चव्हाणांनी कोणत्याही शासकिय पदावर असताना नाही तर स्वत: इंजिनियर असताना हे काम केलेलं. आत्ता माहितीच्या तर मुळात जायचच होतं.

शेवटी कंटाळून पृथ्वीराज बाबांचा नंबर मिळवला. बाबांना फोन केला तेव्हा बाबा विधानसभेच्या सेशनमध्ये होते. बाबांना आम्ही थेट विचारलं की, असं असं आहे. माहिती घ्यायला गेलं तर लोक “मनाच्या गोष्टी” सांगतात. तुम्हीच जरा विस्कटून सांगता का.

जुना विषय निघताच पृथ्वीराज बाबांनी बोलभिडूला आठवणी सांगण्यास सुरवात केली. 

पृथ्वीराज चव्हाणांचे वडील दाजीकाका चव्हाण हे कराडचे खासदार. पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या पासून इंदिरा गांधींपर्यंत प्रत्येकाच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान होतं. त्यांच्यानंतर हा राजकीय वारसा प्रेमलाकाकी चव्हाण यांनी समर्थपणे सांभाळला.

वडील केंद्रात मंत्री असूनही पृथ्वीराज चव्हाणांचे प्राथमिक शिक्षण कराड मध्ये नगरपालिकेच्या मराठी शाळेत झाले होते. राजकारणापेक्षा त्यांना विज्ञान तंत्रज्ञानात रस होता. भारतातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या बिट्स पिलानी येथून मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केले.

त्यानंतर पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी त्यांनी अमेरिकेच्या कॅलीफोर्नियामध्ये बर्कले विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिथे डिझाईन इंजिनियरिंगमध्ये एम.एस. पूर्ण केल. 

सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाओलो अल्टो या ठिकाणी तीन साडे तीन वर्षे एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये काम केलं. पाणबुडीविरोधीयुद्धप्रणालीसाठी व्हिडीओ रेकॉर्डर बनवला. हा काळ म्हणजे अमेरिकेत आयटी इंडस्ट्री आकार घेत होती. स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स यांच्यासारखी तरुण मंडळी वेगवेगळे प्रयोग करत होते.

पृथ्वीराज चव्हाणांना अमेरिकेत खूप संधी खुणावत होत्या. पण त्यांनी आपल्या देशात परत जाण्याचा निर्णय घेतला. एकतर त्यांच्या वडिलांची खालावलेली तब्येत हे एक कारण होतं शिवाय आपण जे शिकलो त्याचा आपल्या देशाला, आपल्या मातीला फायदा व्हावा ही देखील सुप्त इच्छा होती.

पृथ्वीराज चव्हाण भारतात परत आले.

त्यांनी दिल्लीमध्ये ॲप्लाइड इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स नावाची कंपनी स्थापन केली. पृथ्वीराज चव्हाण व त्यांचे काही मित्र या कंपनीत संरक्षण क्षेत्रातील उपकरणे बनवण्यासाठी काही मुलभूत संशोधन करू लागले.

ही गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली.

याच काळात भारतात कॉम्प्युटर्स येऊ लागले होते. राजीव गांधी राजकारणात सक्रीय झाल्यावर त्यांनी या क्षेत्राला चालना देण्याची भूमिका घेतली होती. येणारं शतक हे कॉम्प्युटरच असणार हे स्पष्ट होतं.

पण भारतात अजूनही अनेकांना कॉम्प्युटर्स वापरता येत नव्हते. याच मुख्य कारण कॉम्प्युटरची इंग्रजी ही भाषा अनेकांना येत नव्हती.

पृथ्वीराज चव्हाणांना जाणवल की या मशिनची भाषा जर भारतीय बनली तर आपल्या देशातील अनेकजणांना तो वापर करणे सोपे होऊन जाईल.

सर्व प्रथम त्यांनी हिंदी भाषेतील कॉम्प्युटर बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र यासाठी प्रचंड बजेट लागणार होते. या ऐवजी आहे त्याच कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये काही बदल करून तो आपल्या मातृभाषेत वापर करण्यास योग्य करणे हे जास्त सोइस्कर ठरेल असे त्यांना जाणवले.

पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या टीमने एक सर्किट बनवलं. ते आयबीएम वगैरे त्याकाळच्या प्रचलित कॉम्प्युटरवर बसवलं. यामुळे फक्त हिंदीच नाही तर मराठी व इतर प्रादेशिक भाषांमध्ये कॉम्प्युटर वापरता येऊ लागले. त्याकाळी अनेक संगणकांवर ही प्रणाली बसवण्यात आली.

हजारो भारतीय तरुणांना संगणक वापरण्यासाठी भाषेचा अडसर दूर झाला.

पुढे राजीव गांधी यांची संगणक क्षेत्रासंदर्भात एका कामातून पृथ्वीराज चव्हाणांशी भेट झाली. उच्चशिक्षित तरूणांनी राजकारणात यावे ही राजीव गांधींची भूमिका होती. त्यांच्या आग्रहामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी पहिली निवडणूक लढवली आणि तिथून मात्र त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

last update 27 february 2020

  • भिडू भूषण टारे

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Dr Dilip Ramchandra Bongirwar says

    Nice and. Informative articles written in simple and lucrative language.A person keeps on reading till the story is not finished that is the power and strength of written article which is enjoyed by a reader Kudos to writer and compiler Wishing entire team all the best

  2. M.A.Baseer says

    Nice and informative post

Leave A Reply

Your email address will not be published.