“तुने मेरे जाना” गाणं बनवणाऱ्यानं बिल्डींगवरून उडी मारून जीव दिला होता?
ते साल होतं २०१० साली दहावी पास होऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जुनियर कॉलेज मध्ये आलो होतो. नवीन कॉलेज नवीन वातावरण मेसचं जेवण घर सोडून पहिल्यांदाच राहत होतो जरा दबकूनच असायचो.होस्टेल खूपच मोठे होते ग्रॅज्युएशन करणारी पोरं धाक दाखवायची त्यांच्या पुढे काही चालायचे नाही.
घरची आठवण यायची मन लागत नव्हतं तिने पण कोल्हापूरला अॅडमिशन घेतल होतं हल्ली आमचं बिनसलं होतं पहिल्यासारख बोलणं होत नव्हतं. मी आतल्या आत भावनिक होत होता. रूम मध्ये कोणी नसलं की एकटाच बसून रडायचो.
जुलै महिना चालू होता सारखं आभाळ भरून यायचं, आभाळ आल्यावर आतून भरून यायचं आपण एकटे असल्याची भावना सतत वाट्याची. एकंदरीत मी गप्प गप्प असायचो कोणाशी जास्ती बोलायचो नाही. याच दरम्यान बॉयज होस्टेल मधील वरांड्यात पोरं बसलेली असायची. ग्रॅजुअशन च्या पोराने एकदा एक गाणं लावलं होता
तुने मेरे जाना
कभी नहीं जाना
इश्क मेरा, दर्द मेरा, हाय
तुने मेरे जाना
कभी नहीं जाना
इश्क मेरा, दर्द मेराआशिक तेरा
भीड़ में खोया रहता है
जाने जहां
पूछो तो इतना कहता है
That I feel so lonely, yeah
There’s a better place than this
EmptinessAnd I am so lonely, yeah
There’s a better place than this
Emptiness, yeah yeah
बघता बघता होस्टेल कॉलेज मध्ये सगळीकडे हेच गाणं पोरं वाजवू लागली. तेव्हा सगळ्यांकडे साधे फोन होते दोन जी .बी मेमरी वाले. ब्लूटूथ वरून मित्राला दहावेळा मिनत्या करून एखादा गाणं किवा क्लिप घ्यायला लय वेळ लागायचा. मी पण हे गाणं उठता बसता सतत ऐकायचो. या गाण्यात विरहाची एक तीव्र भावना होती. कोणीतरी दुखावल्याची भावना होती एका मुलीचे रुक्ष वागणे होते. सगळं कसं जिव्हारी लागायचं.
माझे समवयस्क आम्ही पहिल्यांदा प्रेम वैगेरे या भानगडीत मध्ये पडलो होतो. कोणी मुलगी भाव देत नाही म्हणून दुखी असायचा, तर कोणी ती सोडून जाईल का म्हणून अर्धाच डब्बा खाऊन उठायचा, अकरावीची पहिले चार महिने जुळवाजुळव करण्याचे असतात, एकीच्या मागे तीन चार पोरं असतात त्यांना रोखायचे असते पोरं जमवून दबाव गट तयार करायचा असतो, त्यातून तिला पटवायच असतं. बर छपरीचा टॅग पण स्वतःला लागू द्यायचा नसतो , आणि हे सगळं करून अभ्यास ही करायचा असतो.
तर आमचं हे सगळ तेव्हा चालू होतं आणि त्यात हे गाणं आलं. थोडा थोडका करत आमचा सगळाच कार्यभाग बुडाला. दिवस रात्र ज्याच्या त्याच्या तोंडात हे गाणं. आमच्या सारखे दिल जले आम्हीच आहोत असं आम्हाला वाटायचं पण अजून भरपूर होते याची जाणीव या गाण्याने करून दिली.
पुढ या गाण्याबद्दल एक स्टोरी सगळे जण सांगू लागले की,
हे गाणं आय.आय.टी गुवाहाटी मधल्या रोहन राठोड या एकवीस वर्षाच्या पोराने लिहिल आहे. त्याला कॅन्सर झाला होता,म्हणून त्याच्या प्रेयसीने त्याला सोडले होते. मरायच्या पंधरा दिवस आधी त्याने हे गाणे रेकॉर्ड केले होते.
ही भावनिक स्टोरी ऐकल्यावर या गाण्याशी आमची अटॅचमेंट जास्तीच वाढली. थोड्या दिवसात youtube वर या गाण्याच्या बॅकग्राऊंड मध्ये एक जापनीज प्रेम कहाणीचा विडीयो आला. तो ही अत्यंत भावनिक होता तो पण बराच वायरल झाला. फेसबुक आकार घेत होत तो काळ. असे अनेक व्हिडीयो येत राहिले आणि हे गाणं वाजत राहिल. निम्म्या पेक्षा जास्त जणांचे फेसबुक डीपी या गाण्याप्रमाणे सॅड असायचे.
एकंदरीत जुनियर कॉलेज संपे पर्यंत हे गाणं आम्ही ऐकत राहिलो. रोहन राठोडच्या एकतर्फी प्रेमाला मनातून सलाम करत राहिलो.
पुढे मग पुण्यात आलो आयुष्यात MPSC ,UPSC नावाच्या आदर्श गोष्टी सुरु झाल्या. डोक्यात लाल दिव्याची गाडी आणि नंागरे पाटील यांचा अखंड संचार सुरु झाला. आत्ता Android चा स्मार्ट मोबाईल माझ्याकडं हुता पण आत्ता त्यात लक्ष्य पिक्चरची गाणी होती. भरत आंधळे, भूषण गगराणी यांची भाषणे होती. आयुष्यातली पाच वर्ष सरकान निघून गेली UPSC चे तीन अटेंप्ट दिले एकही पास झालो नाही.
लैच डिप्रेशन चा काळ होता. गावाकडे घरातल्यांनी सगळ्यांना सांगितले होते पोरगा कलेक्टर होणार आमचं. गावाकड सणाला जायची सुद्धा चोरी झाली होती.
माझा २०१७ च्या प्रिलीम्सचा रिझल्ट त्यादिवशी लागला. माझी प्री झाली नव्हतीचं. लैच नाराज झालो आत्ता परत ncert कक्षा आठवी पासून सुरवात करायला लागणार होती फाटून हातात आली होती . रूम मधल्या कोणाचीच झाली नव्हती. प्यायला बसायचे ठरले आम्ही आधी मधी ओल्ड माँक पायायला चालू केली होती. लय भारी आहे म्हणून नव्हे तर खिशाला तीच परवडायची म्हणून दोनशे रुपयात फुल लोड व्हायची.
त्यादिवशी पण मग प्रिलिमच्या दुखात अशीच पार्टी चालू झाली. सुरवातीपासूनच दर्दी गाणी लावली होती गुरु दत्त पायासा, पियुष मिश्राचे हुस्ना, राजा हिंदुस्तानी मधलं परदेसी परदेसी असं करत करत नटरंग मधलं खेळ मांडला वगेरे सुरु होतं. पाचवा पेग चालू होता सगळे एव्हाना ढगात होते माझ्या मोबाईल मध्ये गाणी चालू होती आणि अचानक रोहन राठोडचं
“तुने मेरे जाना कभी नहीं जाना इश्क मेरा, दर्द मेरा”
गाणं लागलं. वैभ्या म्हनलं बंद कर ते गाणं तेवढ्यात शुभ्या म्हणाला प्रेयसीच्या जागी UPSC ला ठेवा आणि हे गाणं ऐका. शुभ्या आम्हाला सिनियर होता त्याने पाच अटेमट दिले होते. त्यामुळं आम्ही त्याचं ऐकायचो. त्यांना सांगितल्या प्रमाणे आम्ही ते गाणं UPSCला डोक्यात ठेवून ऐकलं आणि आम्हाला रडूच आले. लय इमोशनल झालो सगळे तसेच झोपी गेलो.
सकाळी उठलो रात्रीचं काही आठवत नव्हतं दात घासत असताना आपसूक तोंडातून तुने मेरे जाना कभी नहीं जाना बाहेर पडलं आणि आणि जुनियर कॉलेज ची दोन वर्ष झपकन डोळ्यासमोरनं गेली अंगावर काटा आला. आपण किती वेळा हे गाणं ऐकायचो हे पण आठवलं.
आवरून लायब्ररीत गेलो डोक्यात गाणं चलूच होतं रोहन राठोड आय.आय.टी, प्रेयसी, कॅन्सर सगळ आठवत होतं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा एक फायदा एव्हाना झाला होता प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करायची सवय लागली होती.
मनात विचार आला रोहन राठोड खरच होता का? त्याची प्रेयसी कोण होती ? शोधावं म्हणून गुगल वर सर्च करू लागलो. तर असं कळालं की रोहन राठोड नावाचा मुलगाच अस्तित्वात नाहीये. अजून सर्च केल्यावर असं कळालं की खरतर २००८ मध्ये हे गाणं गजेंद्र वर्मा नावाच्या गायकाने गायलं होतं.गाणं तयार झाल्यावर जेव्हा त्याने जवळच्या काही मित्रांना ते ऐकण्यास दिलं होतं तेव्हा ते नेट वर लिक झालं आणि सर्वत्र पसरलं.
त्यानंतर गजेंद्रने कॉपीराईटची केस केली आणि तो ती जिंकला. कोर्टाने रोहान राठोड नावाचा कोणीच मुलगा आय.आय.टी मध्ये नसल्याचे सांगितले होते. गजेंद्रने नंतर ओरीजनल विडीयो सहित हे गाणं २०१३ ला you tube ला स्वताच्या नावाने टाकलं त्याला सवा तीन कोटी लोकांनी पहिलं.
गजेंद्र वर्माने हिंदी फिल्मइंडस्ट्रीमध्ये भरपूर नाव कमवल आहे. २०१८ साली त्याच तेरा घाटा हे गाण सुपरहिट झालं होतं.
येवढ्या वर्षांनी पण या गाण्याची एवढी क्रेझ.
मला हे सगळं वाचल्यावर कळायचे बंद झालं आपण खुळ्यात निघालो आहोत हे लक्षात आले. त्रास झाला आम्ही रोहनला मानायचो त्याच्या प्रेमाला सलाम करायचो आणि आत्ता ते सर्व खोट असल्याचं कळल्यावर भ्रमनिरास झाला राव. पण परत मनात म्हंटल येड्यात निघालेले आपण एकटेच नाही आहोत होस्टेलची पोरं आठवली गालात हसलो समोरचं लक्ष्मीकांत उघडले आणि वाचायला सुरवात केली.
- भिडू प्रणय जाधव
हे ही वाच भिडू.
- आडनावाला जागलेला एकमेव माणूस म्हणजे पंकज उदास
- तो सीन बघताच लक्षात आलं होतं फिल्मइंडस्ट्रीमध्ये नवा लंबी रेस का घोडा आला आहे.
- व्हॅलेन्टाईन डे ला सिंगल लोक काय करतात ?
- त्यांच्यासोबत जगजीतसिंह आयुष्यभर राहि
Khoopach chan lihita sir tumhi , hach bram khara vatayacha amhala pan
Sir upsc ch kay zal???
MPSC n Upsc ch kay zal…?????