म्हणून डिझेलवर पळणारी ‘टॉरस बुलेट’ रॉयल एनफिल्डनं बंद केली…
आम्ही पोरं सैराट पिक्चर बघायला गेलेलो, आर्चीनं बुलेटवरुन एंट्री मारली आणि सगळं थेटर घायाळ झालं. कसलाच स्वॅग भिडू. सगळी दुनिया आर्चीला बघत होती आणि आमचं एक भिडू तिच्या बुलेटकडं. कारण बुलेट म्हणजे त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम.
आपण कडक इस्त्रीचे कपडे घालून यावं, थाटात बुलेट काढावी, ते धाढ धाढ वाजत जाणारं धूड ऐटीत फिरवावं आणि सगळ्या जगाच्या माना आपल्याकडे वळाव्यात, हे त्या भावाचं जिव्हाळ्याचं स्वप्न. कॉन्ट्री काढून जेवायला जायच्या परिस्थितीत भावाचं बुलेटचं स्वप्न मागं राहिलं.
मग दिवस बदलले आणि भाऊ म्हणला, आपल्याला बुलेट घ्यायची. तेही डिझेलवाली.
डिझेलवाली बुलेट म्हणल्यावर आमचा इंटरेस्ट वाढला. पेट्रोलवाली क्लासिक, इलेक्ट्रिक स्टार्टवाली इलेक्ट्रा, किक बॅक बसली की पायाचा बाजार उठवणारी अस्सल बुलेट असले प्रकार आम्हाला माहीत होते, पण डिझेलवाली बुलेट हे प्रकरण आमच्या पिढीला नवं होतं. मग आम्ही झालो अस्मिता आणि शोधलं की सापडतंच म्हणत पद्धतशीर अभ्यास केला. डिझेलवाल्या बुलेटचा हा अध्याय खास तुम्हा भिडू लोकांसाठी.
एखादा गडी बुलेट पळवत पंपावर आलाय, कडकवाली नोट देऊन म्हणलाय, डिझेल टाका. मूड आंबट होईल नाय का? पण एक जमाना होता जेव्हा डिझेलच्या बुलेटची लय वाढीव हवा होती.
विशेष म्हणजे आवाज तेवढाच, रुबाब तेवढाच, किंमत कमी आणि मायलेज स्प्लेंडरपेक्षा भारी. तर झालं असं, की १९८० मध्ये रॉयल एनफिल्ड कंपनीनं डिझेलवर चालणारी बुलेट मार्केटमध्ये आणली, ज्याला नाव दिलं टॉरस, लय सिम्पल अर्थ काढायचा म्हणलं, तर बैल.
ही गाडी दिसायला पण बैलासारखीच तगडी होती आणि चालायला तर मक्खन… फक्त आवाजाच्या तडक्यासह…
१९८८-८९ ते २००० सालापर्यंत रॉयल एनफील्डनं या गाडीचं दणक्यात प्रॉडक्शन केलं आणि लोकांमध्येही टॉरस हिट झाली.
आता गाडीबद्दल सांगतोय म्हणल्यावर स्पेसिफिकेशन्स सांगायलाच पाहिजे.
या बाईकमध्ये कंपनीनं ३२५ सीसी क्षमतेचं सिंगल सिलिंडर असलेलं इंजिन लावलेलं. रॉयल एनफिल्डचं हे सगळ्यात छोटं इंजिन, इटलीच्या ग्रीव्ह्ज लोम्बार्डीनी कंपनीनं तयार केलं होतं. ६.५ बीएचपी पॉवर आणि १५ एनएमचा टॉर्क ही गाडी जनरेट करायची. टॉरस जवळपास ८५ किलोमीटरचं ऍव्हरेज द्यायची, म्हणजे आपल्या स्प्लेंडर एवढंच. थोडक्यात गाडी लय नाद होती, हे नक्की.
रॉयल एनफिल्डनं टॉरस मार्केटमध्ये आणण्यामागचं कारण फक्त लोकांना आवडेल, हिट ठरेल हे नव्हतं. तर ते होतं प्रॉफिट. पेट्रोलवर चालणारी बुलेट बनवायला जेवढा खर्च यायचा यापेक्षा कमी प्रॉडक्शन कॉस्ट डिझेल बुलेटची म्हणजेच टॉरसची होती. त्यामुळं कंपनीला चांगला दणकट प्रॉफिट मिळायचा. त्यावेळी डिझेलचे रेटही बरेच कमी असल्यानं लोकांना ही गाडी परवडायची.
आता येऊयात पैशांच्या गोष्टीकडे
तर आम्ही लय शोधलं पण आम्हाला टॉरसचा तेव्हाचा दर काय सापडला नाही. पण आता कुठल्याही साईटवर शोधलं तर साधारण दीड लाखापर्यंत मॉडिफाय केलेली टॉरस मिळून जाते. म्हणायला गेलं तर बुलेट लव्हर्सला परवडणारा रेट आहे.
ही सगळी माहिती गोळा करताना आम्हाला एक प्रश्न पडला, आवाज भारी, रुबाब भारी, किंमत बजेटमधली, कंपनीही फायद्यात, मग टॉरसचं प्रॉडक्शन बंद का झालं?
उत्तर काय डीप नाय, आर्चीच्या स्माईलसारखं सिम्पल आहे.
व्हायचं असं की, डिझेल इंजिनमुळं टॉरसचा आवाज लई दणकट असायचा, जो लोकांना सहन व्हायचा नाही. गाडीचं वजन होतं, जवळपास दोनशे किलो. म्हणजे एखादा हडकुळा कार्यकर्ता गाडीखाली आला, की डायरेक्ट १० बाय १० चा फ्लेक्सच. या वजनामुळं गाडीचा स्पीड ६५ किलोमीटर प्रतितास इतकाच मर्यादित राहिला.
गाडी रिंगवल्यावर शरीराला जरा जास्तच खुंखार व्हायब्रेशन्स बसायचे आणि त्याचा लय त्रास व्हायचा. टॉरसला बाद ठरवणारी आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे धूर. गाडीतून काळा जाड धूर यायचा, ज्यानं लोकांच्या नाकाचा आणि हवेचा बाजार उठायचा. तिची मेन्टेनन्स कॉस्टही लय होती. जेव्हा शासनानं प्रदूषणाचे मानक बदलले, तेव्हा टॉरस गटात बसली नाही आणि रॉयल एनफिल्डनं तिचं प्रॉडक्शन बंद केलं.
साधारण २००० सालानंतर टॉरस थेट मार्केटमध्ये दिसणं बंद झालं. भविष्यात टॉरसच काय इतर कुठलीही टूव्हीलर डिझेलमध्ये यायची शक्यता कमी आहे, त्यामुळं काही शौकीन लोक जुन्या गाडीला मॉडिफाय करुन आपला नाद जपतायत आणि जपतही राहतील. कारण बुलेट चालवणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारा… उत्तर एकच येईल… ‘शौक उंची चीज है, बुलेटसारखीच.’
हे ही वाच भिडू:
- भारतीयांच्या हातात आलेलं पहिलं रॉकेट यामाहा RX 100 होतं !
- बुलेट आणि राजदूतच्या काळातही ‘येझडी’ चा नाद करणे कोणाला जमले नव्हते.
- पटणार नाय पण आजही भारतातनं सगळ्यात जास्त एक्स्पोर्ट होणारी बाईक बजाज बॉक्सर आहे