तुम्ही कितीही ट्रोल करा, आठवले निर्भीड झालेत ते आंदोलनांत सोसलेल्या घावांमुळं

राजकारण हा तसा रुक्ष विषय. आता काही नेत्यांच्या भाषेत तेच तेच शब्द आहेत. काही नेते ठराविकच कपडे घालतात. काहींची भाषणं ऐकताना डुलकी लागते. पण दुसऱ्या बाजूला काही नेते असे आहेत… ज्यांची भाषणं म्हणजे हास्याचे फवारे, काहींच्या कपड्यांपासून चपलांपर्यंत प्रत्येक गोष्टीची नक्कल केली जाते.

देशाच्या राजकारणात असा एक नेता आहे, ज्यांच्या भाषणात कविता असतात, त्यांची राजकीय भूमिका आणि कपडे या सगळ्या गोष्टी भरपूर चर्चेत असतात. अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेलच की, विषय रामदास आठवले यांचा आहे.

आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) अध्यक्ष. फक्त राज्याच्याच नाही, तर देशाच्या राजकारणात त्यांनी आपली छाप पाडली आहे. आठवलेंचा राजकारणात प्रवेश झाला, तो विद्यार्थी दशेतच. १९७४ मध्ये त्यांनी दलित पँथर चळवळीमध्ये प्रवेश केला. तिथं वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 

आठवलेंच्या राजकीय भूमिका कायम चर्चेचा विषय ठरला. दलित वोटर्सचा भरभक्कम पाठिंबा असल्यानं राजकीय पक्षांचा त्यांच्यासोबत युती करण्याचा आग्रह राहिला. त्यांनी सुरुवातीला काँग्रेस सोबत युती केली, पुढे ते राज्याचे मंत्रीही झाले. २००९ च्या निवडणुकांमध्ये ते शिर्डी मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले. मात्र पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमधून एक्झिट घेतली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेना आणि भाजप युतीच्या पंक्तीत बसले. २०१४ मध्ये आठवले राज्यसभेवर गेले. त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळालं. त्यांनी केंद्रात भाजपशी केलेली युती कायम ठेवली. २०१९ मध्ये नरेंद्र मोदी सरकारची दुसरी टर्म सुरु झाली आणि आठवलेंचं केंद्रीय मंत्रीपद कायम राहीलं.

हा इतिहास तसा तुम्हाला माहीत असेलच. आता राजकारण म्हणलं की टीका आल्या आणि टिपण्ण्याही. आठवलेंवर त्याच्या राजकीय भूमिकांवरुन जेवढी टीका होत नाही, तेवढी त्यांचे कपडे, शूज आणि कवितांवरुन होते.

आठवले कधी कडक सूट घालून त्याच्या खाली स्पोर्ट्स शूज घालतात. कधी त्यांच्या सूटचा रंग शूजला मॅच होत नसतो. आणि या कारणावरून त्यांना ट्रोल केलं जातं. आता कीबोर्ड वॉरियर होऊन सोशल मिडीयावर आभाळ हाणणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. पण आठवलेंच्या पायात जवळपास कायम दिसणाऱ्या स्पोर्ट्स शूज मागेही इतिहास आहे.

चळवळीत काम करताना आठवलेंनी अनेकदा आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या आंदोलनावर पोलिसांनी कित्त्येकदा कारवाई केली. पोलिसांची कारवाई म्हणजे काय साधा विषय नाही. कित्येकदा लाठीचार्ज व्हायचा आणि अटकही. त्यामुळं चळवळीत काम करताना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद आठवलेंना खावा लागला. ‘आंदोलनावेळी झालेली धावपळ, पोलिसांच्या लाठ्या या सगळ्यामुळं तरुणपणीच आपल्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं. कित्येक दुखापतींना सामोरं जावं लागलं, याचा जास्त त्रास आता या वयात सोसावा लागतोय,’ असं आठवले जुन्या आठवणी जागवताना सांगतात.

त्यांनी स्पोर्ट्स शूज घालण्यामागंही एक कारण आहे. आठवलेंना डायबेटीस आणि गँगरीनचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या जखमा भरुन येत नाहीत. बऱ्याचदा चालताना तोलही जातो, त्यामुळं त्यांच्या पायात स्पोर्ट्स शूज असतात. आता राहिला प्रश्न त्यांना ते कसं दिसतं याचा. तर जर आठवलेंना हे आवडत असेल, तर संपला की विषय भिडू.

बाकी कुठलाही राजकारणी असो किंवा सामान्य माणूस कपड्यांपेक्षा त्यांचं काम बोलणं जास्त गरजेचं असतंय आणि सतत रुक्ष, कंटाळवाणंच बोलणारे राजकारणी आपल्या आजूबाजूला असते, तर आपल्याला राजकारणात कणभरही रस वाटला नसता. आठवलेंच्या कविता असतील, राजकारण करायची स्टाईल असेल किंवा वाढीव शूज असतील… गल्लीपासून दिल्लीपर्यंत आठवले फेमस आहेत हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.