मोहोम्मद कैफच्या त्या ‘कॅच’ने पाकिस्तानच्या घशातला ‘मॅच’ हिसकावला होता !
मोहोम्मद कैफ.
राहुल द्रविड जर भारतीय बॅटिंग ऑर्डरची ‘वॉल’ होता, तर तेच मोहोम्मद कैफच्या फिल्डिंगच्या बाबतीतही तसंच म्हंटलेलं अतिशयोक्ती ठरत नाही.
कैफच्या हातात बॉल असताना रन चोरण्याचा विचार बॅटसमन स्वप्नात देखील करू शकायचे नाहीत, इतकी या क्षेत्रावर त्याची हुकुमत होती. विशेष म्हणजे हे सगळं त्या काळातलं, ज्या काळातल्या भारतीय फिल्डिंगच्या दर्जाबाबत बरं बोलावं, असं काहीच नव्हतं. (कैफच्या सोबतीला असलेला युवराज सिंग हा सन्माननीय अपवाद)
बॅट्समन म्हणून जरी तो ‘अॅव्हरेज’ खेळाडू होता, तरी फिल्डिंगमध्ये त्याने वाचवलेल्या १५-२० रन्स आणि पकडलेल्या अनेक कॅचेस बऱ्याचवेळा मॅचच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरायच्या. शिवाय याच ‘अॅव्हरेज’ बॅट्समनने नॅटवेस्ट सिरीजच्या फायनलमध्ये इंग्लंडचे ३२५ रन्स चेस करताना क्रिकेटच्या पंढरीत साकारलेली इनिंग तरी भारतीय क्रिकेटप्रेमींना कुठे विसरता येते…?
या सामन्यात अतिशय चांगल्या सुरुवातीनंतर भारताची टॉप ऑर्डर कोसळली होती. पंधराव्या ओव्हरमध्ये १०६ रन्सवर गांगुलीच्या रुपात पहिली विकेट गमावल्यानंतर २४ ओव्हर्समध्ये भारताची अवस्था १४६ रन्सवर ५ विकेट अशी झाली होती. पाचव्या विकेटच्या स्वरुपात सचिन तेंडूलकर पॅव्हेलिअनमध्ये परतला आणि भारताच्या जिंकण्याच्या होत्या नव्हत्या आशा संपुष्टात आल्या होत्या.
अशा स्थितीत मोहोम्मद कैफने युवराज सिंगच्या साथीत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्त्तम इनिंग खेळताना भारताची नौका विजय तीरावर पोहचवली होती. कैफच्या याच इनिंगमुळे भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला लॉर्डसच्या गॅलरीत शर्ट फिरवून आंड्र्यू फ्लिन्टॉफचा हिशेब चुकता करता आला होता. कैफ नसता तर गांगुलीला लॉर्डच्या गॅलरीत ‘दादागिरी’ करताच आली नसती. या एका इनिंगने कैफला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर करून ठेवलंय.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कैफने उत्तमोत्तम फिल्डिंगचे एकापेक्षा एक बहारदार नजराणे क्रिकेटरसिकांसाठी पेश केले. अशा अनेक कॅचेस पकडल्या, ज्या कैफ शिवाय दुसऱ्या कुठल्याच भारतीय खेळाडूला पकडणं कदाचित जमलंच नसतं.
कैफने पकडलेली अशीच एक ‘कॅच’, जिने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या हाता-तोंडाजवळ आलेला विजयाचा घास हिसकावला होता. साल होतं २००४. भारत-पाक कराची वन-डे सिरीजमधला ओपनिंग मॅच. मॅचच्या आणि कैफच्या त्या ‘कॅच’च्याही डिटेलिंगमध्ये जाण्याआधी थोडंस या सिरीजचं महत्व समजून घेणंही गरजेचं.
कारगिलनंतर ताणल्या गेलेल्या भारत-पाक संबंधांच्या पार्श्वभूमीवर प्रथमच भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करत होता. खेळाच्या माध्यमातून भारत-पाक या दोन सख्या शेजाऱ्यांमधला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने या सिरीजकडे बघितलं जात होतं. त्यामुळेच पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय संघाची भेट घेतल्यानंतर कॅप्टन सौरव गांगुलीला एक बॅट गिफ्ट केली होती, ज्यावर संघासाठी वाजपेयींचा संदेश होता,
“खेल ही नहीं, दिल भी जीतीएगा ! शुभकामनाए”
शांततेचा आणि मैत्रीचा संदेश घेऊन पाकिस्तानात गेलेल्या भारतीय संघाचं पाकिस्तानमध्ये कधी नाही ते इतक्या प्रेमाने स्वागत झालं होतं. खुद्द पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी संघाला चहा-पाण्यासाठी आमंत्रित केलं होतं. या अभूतपूर्व स्वागताने भारावलेला भारतीय संघ मैदानावर मात्र जिंकण्यासाठी जीव लाऊन लढणार होता. पाकिस्तानचं देखील फारसं काही वेगळं नव्हतंच. शेवटी कराचीतल्या वन-डेने भारतीय सिरीजची सुरुवात झाली.
१३ मार्च २००४. कराची नॅशनल स्टेडीयम. खूप दिवसांनी या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेट खेळलं जात असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. स्टेडीयममध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी उसळली होती. पाकिस्तानी कॅप्टन इंझमाम-उल-हकने टॉस जिंकून भारताला बॅटिंग करायला सांगितलं.
भारताचा धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवागच्या धुवाधार ७९ रन्स, राहुल द्रविडचं अवघ्या १ रनने हुकलेलं शतक आणि मोहोम्मद कैफने तळाशी काढलेल्या ४६ रन्सच्या जोरावर भारताने निर्धारित ५० ओव्हर्समध्ये पाकिस्तानी बॉलिंगच्या चिंधड्या उडवत ३४९ रन्स स्कोअरबोर्डवर लावल्या होत्या.
३५० रन्स चेस करणं ही काही खायची गोष्ट नव्हती. त्या काळात तर नव्हतीच नव्हती. पण पाकिस्तान काही सहजासहजी हार मानणाऱ्यातला नव्हता. ३४ रन्सवरच २ विकेट्स गमावल्यानंतर देखील पाकिस्तानी कॅप्टन इंझमाम-उल-हकने आधी युसुफ योहाना (धर्मांतरानंतर आता जो मोहोम्मद युसुफ म्हणून ओळखला जातो) आणि नंतर युनिस खानच्या साथीत पाकिस्तानचा डाव सावरला. १०४ बॉल्समध्ये १२२ रन्सची झुंझार इनिंग साकारताना इंझमामने पाकिस्तानी संघाला मॅचमध्ये कायम ठेवलं होतं.
पाकिस्तानी इनिंगच्या ४३ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मुरली कार्तिकने इंझमामला पॅव्हेलिअनकडे परत पाठवलं त्यावेळी पाकिस्तानला जिंकण्यासाठी ४७ बॉल्समध्ये ७२ रन्स पाहिजे होत्या. पण पाकिस्तानचं सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे त्यांची बॅटिंग लाईन-अप. त्या काळात ती किती तगडी होती याचा अंदाज आपल्याला यावरून लावता येईल की सानियाशी लग्न करून भारताचा जावई झालेला शोएब मलिक हा स्पेशालिस्ट बॅट्समन या मॅचमध्ये आठव्या क्रमांकावर खेळायला आला होता.
इंझमाम गेल्यानंतर देखील कसलाही दबाव न घेता अब्दुल रज्जाक-युनिस खान-मोईन खान यांनी भारताची बॉलिंग फोडून काढताना अशक्यप्राय वाटणारा विजय पाकिस्तानच्या पुढ्यात आणून ठेवला होता. एक वेळ तर अशी आली की पाकिस्तानला जिंकण्यासाठी ८ बॉल्समध्ये फक्त १० रन्स हव्या होत्या. त्यांच्याकडे ४ विकेट्स शिल्लक होत्या आणि पीचवर होते मोईन खान आणि शोएब मलिक. पाकिस्तान आता सहजच मॅच जिंकणार असं वाटायला लागलं होतं.
पण, पण, पण शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अजून बरंच नाट्य बाकी होतं. उत्कंठावर्धक! रोमहर्षक !! चित्तथरारक !!! असं दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात वर्णन केल्या गेलेल्या या सामन्याचा भारतासाठी सुखांत व्हायचा अजून बाकी होता.
इनिंगच्या ४९ व्या ओव्हरचा पाचवा बॉल झहीर खानने टाकला आणि स्ट्राईकवर असलेल्या शोएब मलिकने तो फटकावला. क्षणभरासाठी तर सिक्सर गेला असं वाटून भारतीयांचा श्वास रोखला गेला. मलिकच्या मारलेल्या शॉटच्या हवेतला बॉल पकडण्यासाठी एकीकडून मोहोम्मद कैफ आणि दुसरीकडून हेमांग बदानी धावत येत होते. दोघं एकमेकांना जोरदार टक्कर देणार आणि बॉल दोघांच्या मध्येच पडणार असं वाटायला लागलं होतं. पण यावेळी कैफने प्रचंड प्रसंगावधान दाखवताना बदानीशी होणारी टक्कर तर टाळलीच, पण अक्षरशः त्याच्या अंगावरून झेपावताना अविश्वसनीय असा कॅच पकडला. आज देखील हा कॅच क्रिकेटरसिकांच्या अंगावर रोमांच उभा करतो. कैफने पकडलेल्या या ‘कॅच’ची नोंद आज देखील क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्त्तम कॅचेसपैकी एक म्हणून घेतली जाते.
क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन्स मॅचेस’ असं नेमकं का म्हंटल जातं याचं उदाहरणच त्या दिवशी कैफने कराचीतल्या स्टेडियममध्ये सादर केलं होतं. कारण पुढच्या घडामोडीमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी ९ रन्स हवे असताना नेहराजींनी एक अतिशय शिस्तबद्ध ओव्हर टाकली आणि ओव्हरमध्ये फक्त ३ रन्स मोजताना भारताला ५ रन्सने विजय मिळवून दिला. मलिकचा तो कॅच सुटला असता, तर कदाचित भारताला हा मॅच गमवावा देखील लागला असता. पुढे भारतीय संघाने ही सिरीज ३-२ अशी जिंकली.
अटलजींनी सांगितलं होतं की ‘फक्त मॅच नाही, तर मनं जिंकून या’. मोहोम्मद कैफने या कॅचने थेट पाकिस्तानी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ याचंच मन जिंकलं होतं. मुशर्रफ यांनी ज्यावेळी भारतीय संघाला चहा-पाण्यासाठी बोलावलं, त्यावेळी खुद्द मुशर्रफ यांनीच या ‘कॅच’च कौतुक केलं होतं !
हे ही वाच भिडू
- सचिन,सौरव,राहूल आऊट झाले की मॅच संपायची अशा काळात वाघ आला होता.
- संघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय त्याला मिळालंच नाही !
- पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्याचा खरा हिरो पुण्याच्या कानिटकरचा चौकार होता
- पाकिस्तानकडं काय मागायचं असतं तर भारतानं सईद अन्वर मागितला असता !