संजू बाबा जेलमध्ये असतानाही बाहेर येऊन काम करू शकत होता, यामागे कायदा आहे

राज्यात सध्या एका प्रकरणाने खूप धुमाकूळ घातलाय ते म्हणजे नितेश राणे अटक प्रकरण. त्यांना अटक होण्याच्या बातमीपासूनच सगळ्यांचं लक्ष याकडे लागलं होतं, शेवटी आता नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता कुणाला तरी अटक होण्याच्या प्रकरणावर इतकी खळबळ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

कुणीही प्रसिद्ध व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली की कित्येक दिवस चर्चा चालू असतात. जसं की, गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेलं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरण, संजय दत्त अटक प्रकरण किंवा बॉलिवूडचा भाई सलमान खान प्रकरण. पण या सर्व प्रकरणाच्या वेळी एक गोष्ट दिसते ती म्हणजे अटके नंतरही हे लोक बाहेर येऊन काम करू शकत होते. तेव्हा कित्येकांच्या डोक्यात प्रश्न चमकतो, हे कसं शक्य आहे?

ही लोक प्रसिद्ध आहेत, मोठी पैशावाली आहेत आणि त्याच्याच दमावर अशा सवलती त्यांना मिळतात, असं अगदी चौकातील लोकांना सहज बोलताना आपण ऐकतो. पण भाई, हे असं काही नसतं. त्यांना या सवलती मिळतात त्या संविधानातील ‘कैद्यांचे अधिकार’ या सेक्शनमुळे.

जेलचं जीवन म्हणजे नार्कापेक्षा भयानक अशी आधी स्थिती होती. मात्र जेलमधील कैद्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने खूप अधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच भारताच्या संविधानात कैद्यांच्या अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे. 

तुरुंगाच्या भिंती या कैद्यांना मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत नाहीत.

भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ मध्ये असं म्हटलं आहे की, राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता किंवा भारताच्या हद्दीतील कायद्यांचं समान संरक्षण नाकारणार नाही. यामध्ये कैद्यांचाही समावेश होतो. तर कलम १९ भारतातील सर्व नागरिकांना सहा स्वातंत्र्यांची हमी देते. या स्वातंत्र्यांपैकी काही स्वातंत्र्य या स्वातंत्र्यांच्या स्वरूपामुळे कैद्यांना उपभोगता येत नाही. परंतु ‘भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘एखाद्या संघटनेचे सदस्य होण्याचं स्वातंत्र्य’ कैद्यांना असतं.

यासोबतच कलम २१ मध्ये दोन संकल्पना नमूद केल्या आहेत, त्या म्हणजे जीवनाचा अधिकार आणि स्वातंत्र्याचं तत्त्व. शिवाय या कलमाद्वारे हे स्पष्ट होतं की, हे अधिकार केवळ समाजात मुक्तपणे वावरणाऱ्या लोकांसाठीच नाही तर तुरुंगात असलेल्या लोकांनाही लागू होतात. तेव्हा या कलमेनुसार कैद्यांचे हक्क काय आहेत? हे बघूया.

तरुण कैद्यांना प्रौढ कैद्यांपासून वेगळे ठेवण्याचा विशेष अधिकार (protective homes)

– मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार (free legal aid)

– जलद चाचणीचा अधिकार (speedy trial)

– क्रूर आणि असामान्य शिक्षेविरुद्ध अधिकार (against cruel and unusual punishment)

– निष्पक्ष चाचणीचा अधिकार (fair trial)

– पोलिस बंदोबस्तात किंवा चकमकीत कोठडीतील हिंसाचार आणि मृत्यू विरुद्ध हक्क (against custodial violence and death in police lock-ups or encounters)

– मानवी सन्मानाने जगण्याचा अधिकार ( live with human dignity)

– मित्रांना भेटण्याचा आणि वकीलाचा सल्ला घेण्याचा अधिकार (meet friends and consult lawyer)

– एकांत कारावास, हातकडी आणि बारबंदी आणि छळापासून संरक्षण (gainst solitary confinement, handcuffing & bar fetters and protection from torture)

– तुरुंगात वाजवी वेतन मिळण्याचा अधिकार (reasonable wages in prison)

– जामीन घेण्याचा अधिकार (Right to bail) : फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३६-अ मध्ये, कैद्याला ठोठावलेल्या जास्तीत जास्त शिक्षेपैकी अर्धा भाग पूर्ण केल्यावर जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 

या अधिकारांव्यतिरिक्त अजून एक अधिकार कैद्यांना देण्यात आला आहे, ज्याची भारतभर खूप जास्त चर्चा करण्यात आली होती. हा अधिकार म्हणजे ‘शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार’ (right to have Sex)

एखादा व्यक्ती तुरुंगात गेल्यानंतर त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होत असतो. अशात त्यांचा वंश वाढण्यात खंड निर्माण होतो. तेव्हा असा तर्क लावण्यात आला की, कुटुंबातील एका व्यक्तीच्या कृत्याची शिक्षा पूर्ण कुटुंबाला का द्यावी? शिवाय एक असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं की, खूप काळ तुरुंगात राहत असल्याने कायद्यांमध्ये सेक्स न केल्याने विकृतीची भावना निर्माण होते. ज्याने जेलमध्ये सुधारणा होण्यासाठी पाठवलेले कैदी अजून चुका करू शकतात. 

या गोष्टीकडे बघून कैद्यांना सेक्सचा अधिकार देण्यात आलाय. तुरुंगातील कैद्यांना संततीप्राप्तीसाठी त्यांच्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून कैदी त्यांचं समाजातील वावरणं तसंच त्यांचं तुरुंगातील जीवन सुखकर करू शकतात. या अधिकारांमुळेच आपण अनेकदा अटक करण्यात आलेल्या सेलिब्रिटीजना बाहेर येऊन काम करताना बघितो. याच्यामागे त्यांच्या पोहोच, प्रसिद्धी या गोष्टीच नाही तर ‘भारतीय कायदा’ मुख्य भूमिका बजावतो, हे समजून घेणं गरजेचं आहे भावांनो.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.