युपी पोलीस म्हणजे जीवाला धोका! आरोप सिद्ध व्हायच्या आधीच कैदी मारले जातायत.

उत्तरप्रदेश म्हंटल की डोळ्यासमोर येतं ते गुंडाराज. नाव ऐकलं की कापरच भरलं पाहिजे एखाद्याला. आता जिथं गुंड आहेत तिथं पोलीस पण असणारच असं तुम्ही आम्ही म्हणतो. पण इथं लोकांना पोलिसांचीच भीती वाटते.

त्याच झालंय असं की यूपीत बऱ्याच आरोपींच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यात. आणि हे असे आरोपी आहेत ज्यांचे आरोप सिद्ध व्हायचेच होते पण त्यांचा लॉकअप मध्येच मृत्यू झालाय. आणि मग पोलीस गोत्यात आले आहेत. एकेक बघूया.

) १९ ऑक्टोबर, आग्रा

१६ ऑक्टोबर रोजी आग्रा जिल्ह्यातील जगदीशपूर पोलीस ठाण्यातील मालखाना येथून २५ लाखांची चोरी झाली होती. याप्रकरणी अरुण नावाच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. १९ ऑक्टोबरला रात्री अरुणचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. आग्रा पोलिसांविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला गेला. आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आलं. गोंधळ वाढल्यावर योगी सरकारने कुटुंबाला १० लाख नुकसानभरपाई आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राजपत्रित अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे.

२) २४ जुलै, संत कबीर नगर

या दिवशी बखिरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याच नाव बहराईची. ज्या दिवशी त्याला ताब्यात घेण्यात आलं होत त्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी आली. बहराईचीचा दोष इतकाच होता की त्याचा मुलगा अशोक याने गावातील एका मुलीला आपल्यासोबत कथितरित्या फूस लावून पळवून नेल होत.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी बहराईचीला अटक केली होती कारण त्याने त्याच्या मुलावर दबाव आणला नाही. नंतर त्याच्या हत्येची बातमी आली. पोलिसांवर नातेवाईकांनी मारहाणीचा आरोप केला. त्या वृत्तामध्ये म्हंटल्याप्रमाणे, हल्ल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली तेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथंच त्यांचा मृत्यू झाला.

३) ३ जून, सुल्तानपुर

राजेश कोरी नावाच्या व्यक्तीवर अल्पवयीन मुलीच अपहरण केल्याचा आरोप होता. आरोपीला कुडवार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतल. ताब्यात घेताना ती अल्पवयीन मुलगीही आरोपीसोबत होती. थोड्यावेळाने पोलीसांनी त्याला घरी पाठवलं. मात्र काही वेळाने गंभीर जखमी अवस्थेत राजेशला परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. तिथं त्याला मृत घोषित केल गेलं. राजेशच्या मृत्यूनंतर कुद्वार पोलिस ठाण्याच्या एसएचओसह चार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

४) २१ मे, उन्नाव

फैजल हुसैन हा १८ वर्षांचा भाजीविक्रेता होता. कोरोनाच्या नियमांच उल्लंघन केलं म्हणून त्याला बांगरमऊ पोलिसांनी ताब्यात घेतल. मात्र नंतर या फैजलचा मृत्यू झाला. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण डोक्याला दुखापत म्हणून देण्यात आलंय. त्याचवेळी पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक फैजलला फरफटताना दिसले.

फैजलचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलिसांनी सुरुवातीला केला होता. मात्र फैजलच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक लोकांनी या गोष्टीचा विरोध केल्यावर ३ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुन्हा तपास संपला आणि पोलीस निर्दोष सुटले.

५) २५ मार्च, आंबेडकर नगर

आझमगढच्या ३७ वर्षीय झियाउद्दीनला २५ मार्च रोजी यूपी पोलिसांच्या SWAT पथकाने अटक केली होती. पोलिस कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांवर खुनाचा आरोप केला. पोलिसांच्या अत्याचारामुळे जियाउद्दीनचा मृत्यू झाल्याच कुटुंबातील लोक म्हणत होते. तर, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याचा दावा पोलिसांनी केला.

६) ११ फेब्रुवारी, जौनपुर

पूर्व उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील ही घटना. घटना ११ फेब्रुवारीची आहे. त्या दिवशी एका २४ वर्षीय तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यावेळी बऱ्याच बातम्या आल्या. त्यानुसार, पोलिसांनी कृष्णा यादवला जौनपूरमधील बक्सा स्टेशन येथून दरोड्याच्या प्रकरणी ताब्यात घेतलं होत. फक्त आणि फक्त चौकशीसाठी. कृष्णा यादवने पोलिस ठाण्यात पोटदुखीची तक्रार केली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेल. आणि तिथं गेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

यानंतर कृष्णाच्या भावाने याप्रकरणी फिर्याद दिली. त्याने ९ पोलिसांवर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करताना जौनपूर न्यायालयाने आरोपी पोलिसांविरुद्ध अटक वॉरंट जारी केल. या केस मध्ये CBI पण इनव्हॉल्व्ह झाली आणि CBI ने कृष्णाच्या मृत्यूला पोलिसांनाच जबाबदार ठरवलं.

७) ११ नोव्हेंबर, कासगंज

यूपीतल्या कासगंजच्या कोतवाली पोलिसांच्या लॉकअप मध्ये एका २२ वर्षीय तरुणाचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला. अल्ताफच्या घरच्यांनी डायरेक्ट पोलिसांवरच आरोप केला. यावर पोलीस म्हणतायत की, अल्ताफने आत्महत्या केली आहे. त्याने टॉयलेटमध्ये आपल्या जॅकेटच्या हुडने गळफास लावून घेतला. त्यावर त्याचे घरचे आणि बाकीचे लोक म्हणतायत की २ फूट उंचीच्या टाकीला गळफास लावून कोण कसं काय आत्महत्या करू शकतं ?

तुम्हाला काय वाटत ?

हे बघून मला असं वाटत मी खरंच नशीबवान आहे. कारण मी महाराष्ट्रात राहतो. आणि आमचं पोलीस प्रशासन म्हणजे ‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’….

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.