पडद्यामागं राहूनही सलीमा सुल्तान बेगम अकबराच्या राज्याची किंगमेकर होती

भारतामध्ये अनेक राजे-महाराजे होऊन गेले. त्यांच्या शौर्य गाथा, राजनैतिक आयुष्य, वयक्तिक आयुष्य एकंदरीतच त्यांचा इतिहास जाणून घेण्याबाबत अनेकांना रस आहे. जितक्या चर्चा त्यांच्या किस्स्यांच्या होतात तितक्याच आवडीने त्यांच्या विरोधकांबद्दल ऐकायला देखील सगळ्यांना आवडतं. कारण शत्रू असल्याशिवाय नायकाचं काय काम. शत्रूच तर नायकाला फेमस करत असतो. 

याच उक्तीनुसार अनेकांना भारताच्या शत्रू राजांबद्दल किंवा हिंदू राजांव्यतिरिक्त ज्यांनी भारतावर राज्य केलं अशांबद्दल ऐकायला आवडतं. यात ब्रिटिश जसे येतात तसे मुघल राजेही येतात. मुघल शासकांबद्दल आपण माहिती जाणून घेतो कारण देशातील अनेक ऐतिहासिक वारसे त्यांचीच देण आहे. यात जहांगीर, शाहजहाँ अशा राजांचा नंबर लागतो मात्र टॉपवर ज्या शासकाचं नाव येतं ते म्हणजे  ‘जलालुद्दीन मोहम्मद अकबर’

अकबर बादशाह त्याच्या शौर्याबद्दल आणि सर्वात जास्त काळ भारतावर राज्य केलेला मुघल शासक यामुळे सर्वांना परिचित आहे. मात्र अजून एक कारण आहे ते त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल. अकबर आणि त्यांची राणी जोधा यांची ही कहाणी. आता जोधा ही हिंदू असल्याने या दोघांची प्रेम कहाणी सर्व आवडीने ऐकतात खरं मात्र त्यावर आक्षेपही घेतात. कॉंट्रोव्हर्सीचा भाग जर सोडला तर अकबराने तुफान प्रेम केलं जोधाबाईंवर, असं सांगितलं जातं.

अगदी इतकं प्रेम केलं की कधीही त्यांचा धर्म यात आला नाही आणि त्यांनी प्रेमाचा नवीन आदर्श लोकांसमोर ठेवला. मात्र अनेकांना असं वाटत की रुकैय्या बेगमनंतर जोधा या अकबराच्या राणी होत्या. इतिहासात बघितलं तर काहीतरी वेगळंच सत्य समोर येतं. रुकैय्या बेगमनंतर जोधा या त्यांच्या पत्नी नसून ‘सलीमा सुल्तान’ या दुसरी पत्नी असल्याचे संदर्भ आहेत. 

कोण होत्या सलीमा सुल्तान?

सलीमा बेगम या तैमुरी घराण्यातील होत्या. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १५३९ ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नुरुद्दीन आणि आईचं नाव गुलरुख बेगम. त्या अकबराच्या घराण्यातील राजकन्या होत्या आणि नात्याने सलीमा या अकबराच्या चुलत बहीण होत्या.

अकबराने जोधांसोबत लग्न करून जसे धार्मिक पाश तोडले होते तसंच सलीमा सुल्तान यांच्याशी लग्न करून त्यांनी अजून एक आदर्श प्रस्थापित केला होता ज्यासाठी आजच्या काळात खूप ट्रोल केल्या जातं. ते म्हणजे ‘वयापेक्षा मोठी पत्नी असणं’. हो, सलीमा सुल्तान अकबरापेक्षा अनेक वर्षांनी मोठ्या होत्या. शिवाय अजूनही एक आदर्श म्हणजे ‘विधवेशी लग्न करणं’. 

सलीमा यांच्याशी अकबराने लग्न केलं यामागे जी कारणं आहेत ते आजही अनेकांना प्रश्नात पाडतात.

सलीमा सुल्तान यांचं आधीच एक लग्न झालेलं होतं. त्यांच्या पतीचं नाव होतं ‘बैराम खान’. मात्र काही कारणाने बैराम खान यांचं निधन झाल्याने सलीमा सुल्तान खूप कमी वयात विधवा झाल्या होत्या. त्यांची अवस्था त्यानंतर खूप दयनीय झाली होती. तेव्हा त्यांना आधार देण्यासाठी, त्यांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी अकबराने त्यांचा स्वीकार केला.

शिवाय सलीमा बेगम या अत्यंत शुद्ध मनाच्या व्यक्ती होत्या आणि त्या सत्याचे अनुसरण करणाऱ्या होत्या. अकबराला योग्य मार्ग दाखविण्याचं कामही त्यांनी अनेकदा केलं होतं. त्यामुळे अकबरालाही त्यांचा राजकीय निर्णय घेताना खूप हातभार लागायचा. त्यांच्या याच गुणांमुळे अकबराने त्यांना नेहमी सोबत ठेवण्याचा विचार केला होता.

अजून एक कारण म्हणजे अकबराची पहिली पत्नी रुकैय्या बेगम यांना मुलबाळ नव्हतं. तेव्हा अकबराची ओळख जोधाबाईंशी झाली नव्हती. अकबराला वारसा चालवण्यासाठी मुलाची गरज होती. अशात सलीमा सुल्तान त्यांच्यासाठी आशेचा किरण म्हणून आल्या होत्या. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी सलीमा सुल्तान यांच्याशी लग्न केलं.

या कारणांमधून अनेक प्रश्न समोर येतात, अकबराने फक्त फायदा बघून सलीम यांच्याशी लग्न केलं असं या इतिहासातून स्पष्ट होतं. मात्र हीच तेव्हाची परंपरा होती. राजघराण्यातील बादशाह जास्त पत्नी ठेवायचे त्यामागे अशीच काही तरी कारणं असायची. अगदी काहीच राण्यांवर त्यांचं प्रेम असायचं. तेव्हा सलीमा सुल्तान यांच्यावर अकबराचं प्रेम नव्हतं हे स्पष्ट तर आहेच मात्र ही गोष्ट नाकारता येत नाही की त्यांच्या नात्यात भरपूर आदर होता.

असं असलं तरी सलीमा सुल्तान यांनी त्यांच्या कर्तृत्वाने वेगळी छाप आणि ओळख निर्माण केली होती.

अकबराच्या सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली पत्नींमध्ये सलीमा बेगमचं नाव आवर्जून घेण्यात येतं. वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बुद्धीचातुर्यामुळे आणि त्यांच्या तर्कशुद्ध विचारांमुळे त्यांना ‘खदीजा-उज़-ज़मानी’ ही उपाधी देण्यात आली होती. त्यावेळी चतुर आणि बौद्धिक संपदा लाभलेल्या राणीला ही पदवी दिली जायची ज्यांनी त्यांच्या कौशल्यांचा वापर जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी केला असेल. शिवाय सलीमा सुंदर तर होत्याच पण खूप हुशारही होत्या. ‘ब्युटी विथ ब्रेन’ याचं त्या उत्तम उदाहरण होत्या. 

त्यामुळे त्यांचा अकबराच्या ज्येष्ठ बेगमांमध्ये समावेश करण्यात आला. जेव्हा जेव्हा अकबर किंवा त्याचा मुलगा जहांगीरला मुघल दरबारातील प्रश्न कसे सोडवायचे हे समजत नव्हतं तेव्हा ते सलीमा सुल्तान यांचा सल्ला घ्यायचे. अशा या अकबराच्या बेगमचा मृत्यू १५ डिसेंबर १६१२ ला झाला.

मुघल साम्राज्याला वाढवण्यात मोलाचा वाटा असलेल्या अशा या सलीमा सुल्तान मात्र नेहमीच पडद्यामागे राहिल्या. पण इतिहासाने त्यांची दखल नक्कीच घेतली आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.