असा झाला होता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक.

 सन १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अबे कॅरे म्हणतो,

“हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.”

 संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज. 

कर्तुत्व आणि पराक्रम याचा वारसा त्यांना रक्तातून चालत आलेला. महाराजांच्या निधनानंतर राज्यशकट चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचाच होता. मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पहात होती. 

तरीही अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी  त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न  केला. त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजाराची एवढेच काय त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही.

बाल वयातल्या राजाराम महाराजांचे मंचकारोहन करण्यात आले. सोयराबाई राणीसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहित्यांना पाठवण्यात आले.

 पण स्वराज्याचे निष्ठावान पाईक असलेल्या सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्यायी आदेश मानला नाही. स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्या हातातच सुरक्षित आहेत आणि ती सूत्रे निर्विघ्नपणे त्यांना मिळवीत यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतले. बंडखोराना अटक करण्यात आली. 

शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि ते राजे झाले .याबद्दल डच डाग रजिस्टरमध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे ,

“जून-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते,आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात.”

शिवरायांच्यानंतर स्वराज्याची घडी विस्कटेल ,भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ता लयाला जाईल असा  दिल्लीचा बादशहा औरंगजेबचा होरा होता.  तो चुकीचा ठरला. 

छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी तर बसवली. वडिलांच्या आदर्शांप्रमाणे राजकिय , आर्थिक लष्करी धोरण राबवली. मुघलांपासून इंग्रज पोर्तुगीजापर्यंत मराठ्यांची जरब बसवली. स्वराज्यात स्थिरता आणली. 

यावेळी कोणी तरी महाराजांना सुचवले अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतल्या मंचकारोहणापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावे. छत्रपतींच्या राजसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणे इष्ट ठरेल हे संभाजी महाराजांनी जाणले. राज्याभिषेकाची तयारी सुरु झाली.

माघ शुद्ध ७ ,शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे जानेवारी १४,१५,१६, सन १६८१ मध्ये संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती  आणि जनतेचे धाकले धनी झाले

मल्हार रामराव चिटणीस बखरीमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतो ,

“संभाजीराजे सिंहासनारूढ झाले,माघ शुद्ध १० गुरुवार शके मजकुरी यांस राज्याभिषेक यथाविधी विनायकशांती व पुरंदरशांती,होम करून,नंतर अभिषेक होऊन सिंहासनरूढ झाले. तोफा करविल्या.”

राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले,प्रधान-मंडळातील अण्णाजी दत्तो,निलोपंत,बाळाजी आवजी,जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान-मंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला.

रयतेमध्ये दुसरी दिवाळी साजरी होत होती. दिल्लीचा बादशहा हात चोळत हा सगळा सोहळा पहात होता.

संभाजी महाराजांनी सर्व सरदार किल्लेदार यांना आदेशाची पत्रे धाडली. त्यावर त्यांची राजमुद्रा होती. ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे, तिचा आकार पिंपळ पाणी आहे.

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजते | 

यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||  

अर्थ : शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालिवते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.