गोपीनाथ मुंडे यांचे ऋण सातारकर कधीही विसरू शकत नाहीत

उदयन महाराज म्हणजे राज्याच्या राजकारणाला न उमगलेलं कोडं. त्यांची कार्यशैली काहीजणांना पटत नाही. त्यांचा फटकळ आणि स्पष्टवक्तेपणा काहीजणांना बोचरा वाटतो. पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की उदयनराजे मनाने दिलदार आहेत.

उदयनराजेंनी पक्ष वगैरे कधी मानलंच नाही पण माणसांना आपलंसं मानलं.

यातलंच त्यांच्या जवळच नाव म्हणजे गोपीनाथराव मुंडे.

आपल्याला वडिलांनंतर कुणी जवळ केलं असेल तर ते गोपीनाथ मुंडे होते, असं म्हणत उदयनराजे एका कार्यक्रमात भावूक झाले होते.

गोपीनाथराव मुंडे भाजपचे. राजकारणाचा वारसा नसताना मराठवाड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा नेता जनसामान्यांचा लोकनेता बनला. भाजपला तळागाळात नेलं. फक्त राज्याचं नाही तर देशाच्या राजकारणातही आपला ठसा उमटवला.

उदयनराजेंना पक्षात आणण्यातदेखील त्यांचा सिंहाचा वाटा होता.

गोपीनाथ मुंडे यांनी हा हिरा वेळीच पारखून आपल्या पक्षात आणला होता. पुढं उदयनराजे कोणत्याही पक्षात असले तरी मुंडेंच्या मनात त्यांच्याविषयी उत्कट प्रेम होते. उदयनराजेंना राष्ट्रीय प्रवाहात आणून त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद देणं असो की, महसूल राज्यमंत्री म्हणून त्यांचा युतीच्या मंत्रिमंडळातील समावेश असो त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा वाटा सिंहाचा होता.

सातारा जिल्ह्यातील राजकारणात उदयनराजेंचा शब्द गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच अंतिम मानला होता. त्याचा अनुभव अनेक प्रसंगातून आला होता. त्याचाच हा किस्सा..

साताऱ्याच्या सदरबझार इथं सातारा नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरसाठी केंद्र शासनाने दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र नगरपालिकेने दिले नव्हते. त्यामुळे केंद्र शासनाकडून १९८७ पासून २००२ पर्यंत एक रुपयाचाही निधी सातारा नगरपालिकेला मिळत नव्हता.

यामुळे केंद्र शासनाच्या छोट्या शहरांसाठी असलेल्या अनेक योजनांचा फायदा सातारकरांना मिळत नव्हता. नगरपालिकेत २००१ मध्ये सातारा विकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी तत्कालीन उपनगराध्यक्ष आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर माळवदे यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा फायदा सातारा पालिकेला मिळावा यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर चर्चा केली होती.

मुंडे हे माळवदे यांना घेऊन दिल्लीला गेले. त्यावेळी केंद्रीय नगरविकासमंत्री अनंतकुमार यांच्याशी मुंडेंसमवेत माळवदे यांनी चर्चा केली. साताऱ्यासाठी एकात्मिक शहर विकास योजनेतून ६५ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. त्यामुळे नगरवाचनालयासमोर आणि मोती तळ्याशेजारी व्यापारी संकुले उभी राहिली. कालिदास पेट्रोल पंप ते जरंडेश्वर नाका हा रस्ता तयार झाला. मुंडे यांचीच सातारकरांसाठी देणगी आहे

पक्षाच्या पलीकडे जाऊन गोपीनाथ मुंडे यांनी सातारकरांसाठी काम केलं. यामुळेच प्रत्येक सातारकर गोपीनाथ मुंडे यांचा कायम ऋणी राहील.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.