पक्ष कोणताही असो उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गोपीनाथ मुंडेच होते.

उदयन महाराज म्हणजे राज्याच्या राजकारणाला न उमजलेलं कोडं. त्यांची कार्यशैली काहीजणांना पटत नाही त्यांचा फटकळ स्पष्टवक्तेपणा काहीजणांना बोचरा वाटतो. पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की उदयनराजे मनाने दिलदार आहेत.

उदयनराजेंनी पक्ष वगैरे कधी मानलंच नाही पण माणसांना आपलंसं मानलं.

यातलंच प्रमुख नाव म्हणजे गोपीनाथराव मुंडे.

गोपीनाथराव मुंडे भाजपचे. राजकारणाचा वारसा नसताना मराठवाड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा नेता जनसामान्यांचा लोकनेता बनला. भाजपला तळागाळात नेलं. फक्त राज्याचं नाही तर देशाच्या राजकारणातही आपला ठसा उमटवला.

उदयनराजेंना पक्षात आणण्यातदेखील त्यांचा सिंहाचा वाटा होता.

१९९१ साली उदयनराजेंनी साताऱ्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक लढवत राजकारणात दणक्यात एन्ट्री केली. त्यांचे चुलते अभयसिंहराजे भोसले यांच्याशी त्यांचा उभा दावा होता. अभयसिंहराजे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे उदयन महाराज भाजपकडे गेले.

गोपीनाथ मुंडे यांनी हा हिरा वेळीच पारखून आपल्या पक्षात आणला होता.

पुढे १९९६ सालची लोकसभा निवडणूक आली. उदयनराजेंनी साताऱ्याची सीट लढवायची तयारी केली पण युतीच्या वाटणीत ही जागा शिवसेनेला गेली. उदयनराजे अपक्ष उतरले. अभयसिंह राजे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले.

पहिल्यांदाच मोठी निवडणूक लढवणाऱ्या पक्षाचा शिक्का नसलेल्या उदयनराजे यांनी मोठी लीड घेतली पण तरीही त्यांचा पराभव झाला.

पुढे मते फुटू नयेत म्हणून काँग्रेसने अभयसिंह राजे यांना सातारच्या लोकसभेवर पाठवलं. त्यांच्या मोकळ्या झालेल्या विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे उभे राहिले. छत्रपती घराण्यात झालेल्या थेट लढतीमध्ये उदयनराजेंनी बाजी मारली. ते भाजपचे आमदार बनले.

तेव्हा राज्यात युतीचे शासन होते. उदयनराजे भोसलेंचे मार्गदर्शक गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते.

एकदा उदयन महाराज नाशिकमध्ये असताना त्यांना अचानक गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. मुंडेंनी त्यांना दुसऱ्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत येण्यास सांगितले. उदयनराजे म्हणाले,

महत्वाचं असेल तर मी आत्ताच येतो,

पण मुंडे साहेब म्हणाले,

आज नको उद्याच या .. उद्या तुमचा शपथविधी आहे.

उदयनराजेंना महसूल राज्यमंत्री करण्यात आलं होतं. राजकारणात नवख्या असलेल्या, अजूनही वाट चाचपडत असलेल्या उदयनराजेंना हा धक्काच होता. आप्तस्वकीय साथ सोडत असताना गोपीनाथराव मुंडे डोंगरासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

१९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजे हे स्वतः उदयनराजेंच्या विरोधात उभे राहिले आणि चुलते पुतण्याचा वाद प्रचंड चिघळला.

मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे यांच्या गटातील नगरसेवक शरद लेवेंचा खून झाला. या मागचे सूत्रधार उदयनराजे हेच आहेत असा आरोप साताऱ्यात झाला. अभयसिंहराजेंनी जमाव गोळा करून लेवेंप्रकरणी न्याय द्या अशी मागणी केली. उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक गोळा झाले. हा दोन गट अमोरासमोर येऊन स्फोटक परिस्थिती निर्माण झाली.

अशातच आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी उदयनराजेंना अटक केली. रात्रभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. सुरेश खोपडे आपल्या पुस्तकात सांगतात की तेव्हा गृहमंत्री असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांचा त्यांना फोन आला,

खोपडे तुम्ही उदयन राजेंना अटक केली हे खरे आहे का?

सुरेश खोपडे यांनी तशी फिर्याद आली असल्याचे सांगितले यावर मुंडे म्हणाले,

उद्या माझ्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले तर मलाही अटक करणार का? यू आर अल्व्हेज अगेन्स्ट मी अँड माय पार्टी. मला माहित आहे तुम्ही बारामतीचे आहात व राष्ट्रवादीचे बगलबच्चे आहात.

असे म्हणून गोपीनाथराव मुंडे यांनी फोन जोरात आपटला. उदयनराजे यांच्या बद्दल असलेली तळमळ, त्यांच्यासाठी काही न करता येत असल्याबद्दल हताशा दिसून येत होती.

उदयन महाराज ती निवडणूक हरले. पुढचे २२ महिने जेलमध्ये होते. त्यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा झाली होती.

पण उदयनराजे यांनी आत्मविश्वास गमावला नाही. त्यांची या लेवे खून प्रकरणात निर्दोष सुटका झाली.

पुढच्या काळात उदयनराजेंनी जेम्स लेन प्रकरणात भाजप बोटचेपी भूमिका घेत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला, दोन वेळा खासदार झाले. पण या काळात देखील गोपीनाथजी मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध कमी झाले नाहीत.

पक्षाच्या पलीकडे जाऊन गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजे यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला मार्गदर्शन केले. उदयनराजेंनी देखील त्यांचा प्रत्येक सल्ला ऐकला. अगदी मुंडेंच्या मृत्यूपूर्वी ५-७ मिनिटे त्यांचा शेवटचा फोन उदयनराजे यांच्याशी झाला होता.

आजही गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी बोलताना उदयनराजे भावुक होतात,

गोपीनाथ मुंडे हे माझ्यासाठी मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शकही होते. माझ्या वडिलानंतर वडिलकीच्या नात्याने ज्यांनी मला जवळ केले ते गोपीनाथ मुंडे यांनीच.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.