आपल्या लाडक्या कुत्र्याची समाधी बांधणारे छत्रपती

थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांचा विशेष लळा होता. त्यांच्याकडे भारतात आढळणारे जवळ जवळ सर्वच प्रकारचे प्राणी आणि पक्षी होते. लिंब गावाजवळ शाहू महाराजांनी आपली खाजगी बाग तयार केली आणि त्यामध्ये जगात आढळणारे सर्व प्रकारचे आंबे लावले..

यासाठी अक्षरशः परदेशातून सुद्धा काही कलम शाहू महाराजांनी मुद्दामहून मागवून घेतले. याच बागेजवळ शाहू महाराजांचे खासगी प्राणी संग्रहालय होते. ज्यात वाघ, चित्त्यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांचाही समावेश होता. शाहू महाराजांना शिकारीचे प्रचंड वेड. कधी फौजफाट्यासहीत तर कधी एकांतात शाहू महाराज शिकरीस जात.

पण त्यांच्या प्रत्येक शिकारस्वारी मध्ये कुत्रे कायम सोबत असत.

शाहू महाराजांना कुत्रे फार आवडत असत. शाहू महाराजांनी पाळलेल्या कुत्र्यांची इसवी सन 1742 मधील एक यादीच पेशवे दफ्तरात प्रकाशित झालेली आहे. ‘हिरा’, ‘पसमी’ अशी त्यांची नावे सुद्धा आढळतात.

पण त्यांचा सर्वात लाडका कुत्रा होता, ‘खंड्या’..

या खंड्याचा संपूर्ण खर्च करण्यासाठी छत्रपतींनी स्वतंत्र वतनाची सोय करून ठेवली होती. या खंडयाविषयी अनेक गोष्टी इतिहासात वाचायला मिळतात. एकदा शाहू महाराज शिकारीला गेले. अचानक एका वाघाने शाहू महाराजांवर हल्ला केला. तेव्हा याच खंड्याने वाघाशी लढून महाराजांचे प्राण वाचवले.

तेव्हापासून या खंड्यास ‘पालखीचा मान’ प्राप्त झाला.

एके दिवशी ‘साप’ चे इंद्रोजी कदम थोरल्या शाहूंच्या भेटीस साताऱ्याला आले. शरीरावर मौल्यवान दागिने, महागडे वस्त्र, भलीमोठी सेवकांची फौज अशा थाटात कदमांनी राजवाड्यात प्रवेश केला. शाहू महाराजांना ही वर्दी देताना दुसरा सेवक ‘पगडी’ घेऊन आला. ते पाहून शाहू महाराज म्हणाले,

‘सरदार आमच्या भेटीस येणार की पागोट्याच्या?’

आपल्या लाडक्या कुत्र्याला, खंड्याला भरजरी झुल घालण्यास सांगितली, जवाहिरखाण्यात असलेले सर्व दागिने त्याच्या अंगावर चढवायला लावले, उंची वस्त्रांनी सजवण्यास सांगून दरबारात पाठवले आणि स्वता मात्र पांढरी विजार घालून दरबारात येऊन बसले.

हा सर्व प्रकार पाहून कदमांना आपली चूक उमगली आणि ते मनोमन खजील झाले. त्या घटनेपासून शाहू महाराजांनी वस्त्र परिधान करणे, दागदागिने घालणे कायमचेच सोडून दिले.

असा हा लाडका खंड्या..

कोल्हापूर नरेश संभाजी महाराज आणि थोरल्या शाहू छत्रपतींची ‘जखिनवाडी’ येथे ऐतिहासिक भेट झाली. यावेळी शाहू महाराजांच्या त्या भव्य ताफ्यामध्ये ‘खंड्या’ आपल्या पालखीत रुबाबात बसला होता. खंड्याची पालखी शाहू महाराजांच्या पुढे आणि त्या पालखी पूढे निशाणाच्या काठ्या, नगारे वगैरे वाजत होते.

खंड्यावर शाहू महाराजांचे जीवापाड प्रेम होते. त्यास पाच हजारांचे इनाम महाराजांनी लावून दिले होते. या खंड्याच्या मृत्यूनंतर थोरल्या शाहू महाराजांनी त्याचे विधिवत अंत्यसंस्कार केले आणि त्याची समाधी ‘संगम माहुली’ ला बांधली.

आपल्या लाडक्या कुत्र्याची समाधी बांधणारा हा छत्रपती जगाच्या इतिहासात एकमेवाद्वितीयच.

शाहू महाराज आपल्या कुत्र्यांकडे विशेष लक्ष देत. एकदा चिमाजी अप्पांनी पाठवलेल्या कुत्र्यांची जोड फारशी चांगली नव्हती. शाहू महाराजांनी अप्पांची चांगलीच कानउघडणी केल्यावर दहा दिवसांच्या आत नवीन श्वानांची जोड साताऱ्यात पोहोचली. महाराजांच्या कुत्र्यांचा सांभाळ करणारे म्हणून ‘बसंत’, ‘बंता’, ‘मिठू’ या कुतेवानांची नावे वाचायला मिळतात.

महाराजांच्या अखेरच्या ही काळात त्यांचे श्वानप्रेम काही कमी झालेले नव्हते. मृत्यूच्या चार महिने आधी, ‘८ ऑगस्ट १७४९’ रोजी आपल्या छत्रपतींना ‘भेट देण्यासाठी’ नानासाहेब पेशव्यांनी लक्ष्मण शंकर याला २४ अतिउत्तम कुत्र्याच्या जाती साऱ्या भारतातून मागवून घेण्यास लावल्या होत्या.

असा हा मराठ्यांच्या इतिहासात सर्वात जास्त काळ गादीवर बसलेला, अठराव्या शतकातील सर्वात बलाढ्य, महापराक्रमी, अजातशत्रू छत्रपती आणि त्याचे विलक्षण प्राणीप्रेम..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.