अटकेपारच नाही तर युरोपचे प्रवेशद्वार असलेल्या इस्तंबूलवर भगवा झेंडा फडकवण्याच ध्येय होतं

“श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।।
शंभूसुतोरिव मुद्रा शिवराजस्य राजते ।।”

ही राजमुद्रा धारण करणाऱ्या स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची, थोरल्या शाहू महाराजांची आज जयंती.

शंभूपुत्र शाहू महाराजांचा जन्म 18 मे 1682 रोजी रायगड किल्ल्याजवळ असणाऱ्या ‘गांगवली’ गावात झाला. या गावामध्ये मराठ्यांचा तोफखाना उभा करण्याचे काम संभाजी महाराज करत होते. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी शाहू महाराजांना कैद झाली.

संपूर्ण बालपण मुघलांच्या कैदेत गेलेल्या शाहू महाराजांवर संस्कार मात्र अस्सल मराठमोळे होते. त्याला कारणीभूत ठरल्या महाराणी येसूबाई राणीसाहेब..

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली. ते स्वराज्यात परतले. परंतू, महाराष्ट्रात मात्र ‘मुघलांच्या कैदेतून सुटून येणारा राजपुत्र हा शाहू नसून त्याचा कुणीतरी तोतया आहे’ अशी अफवा पसरली होती. तेव्हा सरदार पवारांनी शाहू महाराजांसोबत एकाच ताटात दूधभात खाऊन शाहू महाराजांच्या खरेपणाची साक्ष दिली.

शिवाजी महाराजांचा जन्म एक जहागीरदार पुत्र म्हणून झाला. पुढे त्यांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली. स्वतंत्र देशाचे ते राजे बनले. आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत थोरल्या शाहू छत्रपतींनी सुद्धा शून्यातून राज्यविस्तार करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला सातारा आणि परिसरात पसरलेल्या राज्याची सीमा त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन 1749 पर्यंत बंगाल पासून लाहोरपावेतो आणि दिल्लीपासून ते दक्षिणेत कांचीपुरम पावेतो पसरली होती. यावरून त्यांच्या महान पराक्रमाची कल्पना करता येते.

शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आमूलाग्र बदल केले. आपली राजधानी किल्ल्यावरून जमिनीवर आणणारा मराठ्यांचा हा पहिला छत्रपती होता. सातारा शहराची निर्मिती करून त्याची रचना एखाद्या स्वयंपूर्ण महानगरासारखी त्यांनी केली होती. कितीतरी व्यापारी पेठा शाहू महाराजांनी उभ्या केल्या.

शाहू महाराजांनी आपल्या पदरी हुजुरातीची फौज ठेवण्याचा प्रकार सुरू केला. एकाच वेळेस सातारा शहरामध्ये 35-40 हजारांची खडी फौज असे. तिच्यावर थेट नियंत्रण हे केवळ शाहू छत्रपातींचे असे. त्यामुळे कोणताही मातब्बर सरदार राजधानीच्या आजूबाजूस नसला तरीही राजधानी संरक्षित राही.

उलट, कितीतरी वेळेस थोरल्या शाहू छत्रपतींनी आपल्या लाडक्या सेनापतीला, बाजीराव पेशव्यांना हुजुरातीची फौज युद्धासाठी पाठवून दिली होती.

फत्तेसिंह भोसले, खंडेराव दाभाडे, कान्होजी आंग्रे, कुसाजी भोसले, पिलाजीराव जाधव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, दामाजी गायकवाड यांसारखे कितीतरी पराक्रमी सरदार शाहू महाराजांच्या हाताखाली राहून भारतभर घौडदौड करत होते. शाहू महाराजांच्या पंचहजारी आणि त्यापेक्षा जास्त मनसबदार असणाऱ्या सरदारांची यादी काढायची झाल्यात ती कमीत कमी 300 सेनापतीच्या नावांनी भरून जाते. यावरून शाहू महाराजांच्या बलाढ्य सेनेचा अंदाज आपल्याला येतो.

आपल्या आईची सुटका करण्यासाठी शाहू महाराजांनी थेट दिल्लीवर मोहीम काढली.

वीस-पंचवीस हजारांची फौज घेऊन निघालेला सेनापती खंडेराव दाभाडेंची फौज दिल्लीला पोहोचेपर्यंत लाखभर सैनिकांच्या आसपास पोहोचली. मातोश्री येसूबाईराणीसाहेब यांची तर सुटका केलीच. सोबतच बादशाह फारुखसियार चे मुंडके छाटून आपल्या पित्याच्या हत्येचा बदलासुद्धा शाहू महाराजांनी घेतला.

एवढेच नव्हे, एकाच महिन्यात दिल्लीच्या तख्तावर शाहू महाराजांच्या आज्ञेवरून चार बादशाह बदलण्यात आले. साताऱ्यात राहून दिल्लीची सूत्रे हलवणारा हा मराठ्यांचा पराक्रमी छत्रपती..

शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांचे आरमार अतिशय प्रबळ झाले. कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ‘न भूतो न भविष्यती’ असे विजय मिळवले. एकाच वेळेस इंग्रज, रॉयल नेव्ही आणि पोर्तुगीजांचा पराभव मराठ्यांच्या आरमाराने केला. मादागस्करचा राजा ‘जेम्स प्लांतेन’ ने शाहू महाराजांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मराठ्यांनी सुद्धा त्याच्या देशाचे वेळोवेळी संरक्षण केले.

छत्रपती शाहू म्हणजे दुर्दम्य आशावादाचे प्रतीक होते ,वडिलांचे लढवय्ये गुण आणि आजोबांचा दूरदर्शीपणा याची सांगड घालून त्यांनी भगवा महाराष्ट्रातून भारतभर नेला.

शिवरायांचे स्वप्न मराठ्यांचे राज्य नर्मदा पार असावे असे होते, संभाजी महाराजांचे स्वप्न सर्व दक्षिणी सत्तांनी एकत्र येऊन औरंगजेबाचा पराभव करावा असे होते, राजाराम महाराजांचे स्वप्न थेट दिल्ली वर हल्ला करून पातशाही बुडवायचे होते तर शाहू छत्रपतींचे स्वप्न फक्त अटक जिंकायचे नसून अफगानिस्तान, इराण च्या पुढे जाऊनही युरोपचे प्रवेशद्वार असलेल्या इंस्तम्बुल च्या किल्ल्यावर भगवा फडकविण्याचे होते.

हा दुर्दम्य आशावाद बाळगणारा छत्रपती मराठ्यांना लाभला, म्हणून स्वराज्याचे ‘मराठा साम्राज्यात’ रूपांतर झाले.

शाहू महाराजांवर छत्रपती शिवरायांचा प्रचंड पगडा होता. तत्कालीन अनेक कागदपत्रांमध्ये शाहू महाराजांना ‘थोरल्या महाराजसाहेबांचा’ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार म्हणून संबोधित केले आहे.

शिवरायांनी ज्याप्रमाणे मराठी भाषेस पुनर्जन्म दिला, राज्यव्यवहार कोष या मराठी ग्रंथाची निर्मिती केली अगदीच त्याप्रकारे शाहू महाराजांच्या काळात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार प्रचंड प्रमाणात झाला. शाहूकाळात मराठा साम्राज्य उभे राहून मराठ्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य भारत येथे मजबूत ठाणी उभारली ज्यामुळे तेथील राजभाषा मराठी बनली आणि नंतरच्या काळात बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर, तंजावर इ. अनेक ठिकाणी मराठी भाषेचा मोठा प्रसार झाला.

मराठा आणि मराठी यांची भारतभर ओळख छत्रपती शाहुंमुळे निर्माण झाली. थोरल्या शाहू छत्रपतींनी आपल्या पूर्ण यशाचे श्रेय छत्रपती शिवरायांना देताना म्हंटले

“थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायाचा प्रताप.. त्यांनीच इतके रक्षण करून हे दिवस दाखवले”..

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सर्वात प्रबळ सत्ताधीश होण्याचा मान मिळवणाऱ्या मराठ्यांच्या या ‘भारतवर्ष सम्राटास’ जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..

  • भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.